२७ गावातील पाणीप्रश्न सोडवा
डोंबिवली : ‘कल्याण ग्रामीण'चे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी १९ डिसेंबर रोजी अधिवेशनादरम्यान विधानसभेत कल्याण मधील २७ गांव, नवी मुंबई जवळील १४ गाव आणि दिवा शहरातील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. या विभागातील पाणी प्रश्न बिकट असून वितरित पाणी पुरवठ्यामध्ये ३० एमएलडी पाण्याची वाढ करावी, अशी मागणी आ. राजेश मोरे यांनी केली.
दरम्यान, लाडक्या बहिणींचे लाडके ३ भाऊ २७ गवातील पाणी प्रश्न नक्की सोडवतील. तर ‘अमृत योजना'मुळे गांवकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे सांगत आ. राजेश मोरे यांनी याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार देखील मानले.
आमदार मोरे यांनी गावातील पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले होते. मोरे यांनी दत्तजयंती दिनी संदप गावात दर्शन घेतल्यानंतर गावकऱ्यांशी पाणीटंचाईच्या प्रश्नावर चर्चा केली होती. यावेळी ‘अमृत योजना'चे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन मोरे यांच्याशी चर्चा करुन संदप गावातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अशी विंनती आमदार मोरे यांनी केली. कल्याण ग्रामीण भागात २७ गांव, नवी मुंबई जवळील १४ गांव आणि दिवा शहर असा भाग येत असून येथे पाणी प्रश्न बिकट आहे. आमदार मोरे यांनी विधानसभेत पहिल्यांदाच बोलताना पाणी प्रश्नावर प्रकाश टाकला.
सदर गावांसाठी १०५ एमएलडी पाणी पुरवठा मंजूर असताना फक्त ५० ते ५५ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शासनाने यात आणखी भर टाकत अजून ३० एमएलडी पाणी पुरवठा वाढून द्यावा. जेणेकरुन गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. लाडक्या बहिणींचे सरकार मधील लाडके ३ भाऊ आमच्या गावातील पाणी प्रश्न निकाली लावतील, असे आ. राजेश मोरे म्हणाले.
दुसरीकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने ‘अमृत योजना'चे काम सुरु असून गावकऱ्यांना पाण्यासंदर्भात काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे मोरे म्हणाले.