मेल-एक्सप्रेस गाड्यामध्ये चोरी करणारे त्रिकुट जेरबंद  

मेल-एक्सप्रेसमध्ये हॉकर्सचा धंदा करताना करत होते चोरी  

पनवेल : मेल / एक्सप्रेस गाडयामध्ये चोरी करणाऱया आंतरराज्य टोळीतील त्रिकुटाला लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा विशेष कृती दलाने (एसटीएफ) अटक केली आहे.  रामईश्वर कुमार नन्दलाल साहानी (28), खुबलाल कैलास महतो (28) व बिनोद सोनाराम महतो (28) अशी या त्रिकुटाची नावे असून ते मेल-एक्सप्रेस गाडयामध्ये हॉकर्सचा धंदा करतानाच झोपलेल्या प्रवाशांचे पर्स, मोबाईलवर इतर किंमती वस्तू चोरुन नेत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. या चोरटयानी मेल /एक्सप्रेस गाडयामध्ये केलेले 7 गुन्हे उघडीकस आले असून या गुह्यातील सुमारे 8 लाख 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांनी हस्तगत केला आहे. या त्रिकुटाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गत एप्रिल महिन्यामध्ये या टोळीने एर्नाकुलम निझामुदिन एक्सप्रेसमध्ये मडगाव ते दिल्ली या दरम्यान एका महिलेची दागिने व रोख रक्कम असलेली पर्स चोरली होती. या बाबत अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार या गुन्हयाचा लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा येथील विशेष कृती दलाकडुन (एसटीएफ) समांतर तपास सुरु करण्यात आला होता. त्याअनुषंगाने एसटीएफच्या पथकाकडुन पनवेल स्थानकातून जाणाऱया मेल / एक्सप्रेस गाडयावर गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली. यादरम्यान मेल / एक्सप्रेस गाडीमध्ये  हॉकर्सचा धंदा करणारेच झोपलेल्या प्रवाशांचे पर्स व मोबाईल फोन चोरी करत असल्याची माहिती एसटीएफच्या पथकाला मिळाली.  

तसेच सदरचे संशयीत हॉकर्स हे रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या पथकाने रत्नागिरी येथे जावुन तांत्रिक तपास करुन रामईश्वर साहानी, खुबलाल महतो आणि बिनोद महतो तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर एसटीएफच्या पथकाने चोरीस गेलेल्या माला व्यतिरिक्त इ 4,50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 21 हजार रुपये किंमतीचे घडयाळ, 3 लाख 27 हजार रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन, 52 हजार रुपये किमतीचा टि.व्ही, आणि रोख असा एकुण 8 लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  

या चोरटयानी पनवेल, त्रिसुर, कोकण रेल्वे आणि कोटाव्यम रेल्वे पोलीस ठाणे या भागात केलेले चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून या आरोपीकडुन आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी मुंबई लोहमार्गचे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुददीन शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक दिपक शिंदे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे  आदींच्या पथकाने केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दिघा ते बेलापूर पर्यंत बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहीम उघडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी