ई सिगारेटची विक्री करणारा शॉपचालक अटकेत
26 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट जप्त
नवी मुंबई : नेरुळ मधील सेन्च्युरीयन मॉल मधील शॉपमधुन छुफ्या पद्धतीने ई-सिगारेटची विक्री करणा-या व्यक्तीला नेरुळ पोलिसांनी छापा मारुन अटक केली आहे. प्रकाश लहाने (30) असे या शॉप चालकाचे नाव असून पोलिसांनी सदर शॉपमधुन सुमारे 26 हजार रुपये किंमतीचे ई सिगारेट जप्त केले आहेत. या शॉप चालकाने सदरचे ई-सिगारेट कुठून आणले याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.
नेरुळ मधील सेंचुरियन मॉल मधील दी शिशा शॉपमधून ई सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान बिले व त्यांच्या पथकाने गत गुरुवारी सायंकाळी सेंच्युरीअन मॉलमधील दी शिशा नावाच्या शॉपवर छापा मारला. त्यानंतर पोलिसांनी सदर शॉपची तपासणी केली असता, सदर शॉपमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे व फ्लेवरचे सुमारे 26 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट सापडले. त्यानंतर पोलिसांनी सदर शॉप चालक प्रकाश लहाने याच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल करुन सदरचे ई सिगारेट जप्त केले आहेत.