अज्ञात सायबर चोरटयाविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल

निवृत्त पोलिसाचा मोबाईल फोन हॅक करुन काढली 95 हजाराची रक्कम

 नवी मुंबई : अज्ञात सायबर चोरटयाने कामोठे भागात राहणा-या एका निवृत्त पोलिसाचा मोबाईल फोन हॅक करुन त्यांच्या बँक खात्यातुन 95 हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर काढुन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरटयाविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.    

या प्रकरणात फसवणुक झालेले 59 वर्षीय निवृत्त पोलीस कामोठे भागात कुटुंबासह राहण्यास असून ते सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ग्रॅज्युअटीची 7 लाख 81 हजाराची रक्कम जमा होती. गत ऑगस्ट महिन्यामध्ये हे निवृत्त पोलीस आपल्या घरामध्ये असताना, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर कॉल करुन त्यांच्या बँक खात्यातून 4 हजार रुपये कट होणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी निवृत्त पोलिसांने  सदर व्यक्तीकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवृत्त पोलिसाला सदर कॉलबाबत संशय आल्याने त्यांनी तत्काळ सदर फोन कट केला.  

याचवेळी त्यांच्या खात्यातून 95 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर निवृत पोलिसाच्या मुलाने एटीएमवर जाऊन बँकेचे स्टेटमेंट काढली असता, त्यांच्या खात्यातून युपीआयद्वारे गणेश बिस्वास नामक व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाच्या अकाऊंटवर सदर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे आढळुन आले. या निवृत्त पोलिसाचा मोबाईल फोन हॅक करुन त्यांच्या खात्यातुन सदर रक्कम काढली गेल्याने निवृत्त पोलिसाने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरटयाविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.     

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ई सिगारेटची विक्री करणारा शॉपचालक अटकेत