मोबाईल फोन चोरणारे सराईत त्रिकुट जेरबंद
तब्बल 13 लाख 67 हजार रुपये किंमतीचे 105 मोबाईल फोन हस्तगत
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करतानाच मार्केटमध्ये मोबाईल फोनची चोरी करणा-या तिघांना एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमोल किसन पाटील (28), अनिकेत तानाजी पाटील (25) व विनायक सुरेश मोरे (30) अशी या मोबाईल चोरटयाची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 13 लाख 67 हजार रुपये किंमतीचे 105 मोबईल हस्तगत केले आहेत.
गत आठवडयात एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये गेलेल्या नवीनकुमार मिश्रा यांचा मोबाईल फोन अज्ञात चोरटयाने चोरला होता. एपीएमसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या गुह्यातील मोबाईल फोन चोरांची गुफ्त बातमीदारामार्फत माहिती मिळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम व त्यांच्या पथकाने मुंबई, नवी मुंबई परिसरात आरोपींचा सुरु केला होता.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अमोल पाटील, अनिकेत पाटील व विनायक मोरे या तिघांना मुंबई व नवी मुंबई परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीत त्यांनी एपीएमसी मार्केटसह इतर भागात मोबाईल फोनची चोरल्याची तसेच सदर मोबाईल फोन कमी किंमतीत विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांनी विविध भागातून चोरलेले तब्बल 13 लाख 67 हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख (एपीएमसी पोलीस ठाणे)
या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिन्ही चोरटे एपीएमसी मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करत होते. तसेच मार्केटमध्ये विविध कामांसाठी येणारे नागरिक, ट्रक चालक व इतरांचे मोबाईल फोन चोरी करत होते. अशाच पद्धतीने या चोरटयानी अनेक मोबाईल फोन चोरले होते. या चोरटयाकडुन आणखी काही चोरलेले मोबाईल फोन हस्तगत होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.