नेरुळमधील क्लिनिकमध्ये काम करणा-या महिलेचा संशयास्पद मृत्यू  

डॉक्टर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल  


नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-4 मधील स्किन सौल या क्लिनिकमध्ये काम करणा-या जरीना रेहमान शा हिच्यावर 10 हजार रुपये चोरल्याचा आरोप करण्यात आल्याने सदर महिलेने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र जरीना हिची स्किन सौल क्लिनिकमधील डॉक्टरने हत्या केल्याचा आरोप मृत जरीनाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच जोपर्यंत डॉ.स्नेहा थडाणी विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जरीनाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भुमिका देखील नातेवाईकांनी घेतली आहे.  
या घटनेतील मृत जरीना शा हि मागील 10 वर्षांपासून स्किन सौल या क्लिनिकमध्ये काम करत होती. शुक्रवारी जरीनाने डॉ.स्नेहा थडाणी हिच्या पर्समधुन 10 हजार रुपयांची चोरी केली होती. सीसीटिव्हीत हा प्रकार कैद झाल्यानंतर डॉ.स्नेहा थडाणी हिने जरीनाला दरडावून एका रुममध्ये बसवून ठेवले. त्यानंतर तिने जरीनाच्या नातेवाईकांना संपर्क साधुन त्यांना जरीनाने 10 हजार रुपये चोरल्याची माहिती देऊन त्यांना क्लिनिकमध्ये बोलावून घेतले. मात्र यादरम्यान, जरीनाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  
त्यामुळे डॉ.स्नेहा थडाणी हिने जरीनाला आपल्या वडिलांच्या कोपरखैरणे येथील साई स्नेहदीप या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र त्यापुर्वीच जरीनाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती जरीनाच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर त्यांनी जरीनाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. जरीनाने जर नेरुळ मधील स्कीन सौल क्लिनिकमध्ये आत्महत्या केली होती, तर तिला नेरुळ मधील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी 8 किमी दुर असलेल्या कोपरखैरणेतील साई स्नेहदीप हॉस्पीटलमध्ये का नेण्यात आले.?  
तसेच या घटनेनंतर नेरुळ पोलिसांना घटनास्थळी बोलवणे आवश्यक असताना पोलिसांना त्याठिकाणी का बोलावण्यात आले नाही.? हा प्रकार संशयास्पद असून जरीनाला नेरुळ मधील स्कीन सौल क्लिनिकमध्ये फाशी देऊन मारण्यात आल्याचा आरोप जरीनाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच जरीनाच्या हत्येचा प्रकार दडपण्यासाठी तिला आपल्या वडीलांच्या कोपरखैरणे येथील रुग्णालयात नेण्यात आल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जरीनाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत क्लिनिक मधील डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.  

या प्रकरणातील मृत जरीना शा हिने आत्महत्या केल्याचे आढळुन आले असून त्यानुसार  डॉ.स्नेहा थडाणी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.  - वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत (नेरुळ पोलीस ठाणे)  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मोबाईल फोन चोरणारे सराईत त्रिकुट जेरबंद