मराठी वृत्त वाहिनीच्या नावाने बार चालकांकडुन खंडणी उकळणारी बोगस पत्रकारांची टोळी नवी मुंबईत सक्रीय
बोगस पत्रकारांच्या टोळीतील एकाला कोपरखैरणे पोलिसांनी केली अटक
नवी मुंबई : बारमधील आक्षेपार्ह व्हिडीओ एका नामवंत मराठी वृत वाहिनीवर प्रसारीत करण्याची धमकी देऊन बार मालकाकडुन खंडणी उकळणाऱया बोगस पत्रकारांच्या टोळीतील एका बोगस पत्रकाराला कोपरखैरणे पोलिसांनी मंगऴवारी रात्री सापळा लावुन अटक केली आहे. राजेंद्र दशरथ साळुंखे असे त्याचे नाव असून पोलिसांनी आता या टोळीतील इतर बोगस पत्रकारांचा शोध सुरु केला आहे.
पोलिसांनी या कारवाईत अटक केलेला राजेंद्र साळुंखे हा वांद्रे येथील निर्मल नगर भागात राहण्यास असून त्याच्या साथीदारांमध्ये सावंत, राजु छगन पटेल, जैन आणि नामवंत वृत्तवाहिनीचा एडिटर असल्याचे सांगणारा बोगस पत्रकारांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री मराठी वृत्तवाहिनीचा एडीटर असल्याचे सांगणाऱया बोगस पत्रकाराने व सावंत या दोघांनी कोपरखैरणेतील नटराज बार ऍन्ड रेस्टॉरंटच्या चालकाला संपर्क साधला होता. तसेच त्यांच्याकडे बार मधील आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे सांगुन सदरचा व्हिडीओ त्याच्या वृत्त वाहिनीवर प्रसारीत करण्याची धमकी दिली होती. तसेच सदर व्हिडीओ प्रसारीत न करण्यासाठी बार चालकाकडे 30 हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्यावेळी बार चालक सुरेश शेट्टी याने घाबरुन या बोगस पत्रकारांना ऑनलाईन 30 हजार रुपये पाठवून दिले होते.
मात्र त्यानंतर बोगस एडीटर व सावंत या बोगस पत्रकारांनी बार चालक शेट्टी यांना संपर्क साधुन त्याच्याकडे आणखी 20 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. सदर रक्कम न दिल्यास त्यांच्याकडे असलेला व्हिडीओ वृत्त वाहिनीवर प्रसारीत करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेट्टी याने त्याच्याकडे बारमधील व्हिडीओची मागणी केली असता, त्यांनी सदरचा व्हिडीओ देण्यास नकार दिला. त्यामुळे शेट्टी याने खंडणीची रक्कम घेण्यासाठी त्यांना बार जवळ येण्यास सांगुन कोपरखैरणे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री 10.30 वाजता बार जवळ सापळा लावून. खंडणीची रक्कम घेण्यासाठी मोटारसायकलवरुन नटराज बारजवळ आलेल्या राजेंद्र साळुंखे याला पकडले. त्यानंतर त्याने सावंत, राजु छगन पटेल व जैन यांच्या सांगण्यावरुन खंडणीची रक्कम घेण्यासाठी आल्याचे सांगितले.
या कारवाईत खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर साथिदारांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व बोगस पत्रकार असून त्यांच्या विरोधात खंडणीसह धमकावणे व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.