अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; झाडे बनताहेत भक्ष

रबाळे एमआयडीसी मध्ये वाढीव बांधकामांसाठी झाडांची कत्तल

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मध्ये वाढीव बांधकामांसाठी झाडांना बंदिस्त करुन त्यानंतर झाडांची कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसत असून, या प्रकाराकडे एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी मधील जागेवर असलेल्या उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठी झाडे लावली आहेत. या झाडांचे संरक्षण आणि झाडांची देखभाल कंपनीने करणे तसेच उद्योजकांनी नियमानुसार दिलेल्या जागेवर बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक उद्योजक वाढीव बांधकामासाठी झाडांना बंदिस्त करीत आहेत. कालांतराने बंदिस्त झाडांची कत्तल करुन वाढीव बांधकामासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रकार रबाले एमआयडीसी मध्ये अनेक उद्योजकांनी केल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण विभाग एमआयडीसी महापे येथील अधिकाऱ्यांद्वारे उद्योजकांनी नियमबाह्य केलेल्या बांधकामावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. उद्योजकांनी झाडाला बंदिस्त करणे, त्यानंतर झाडाची कत्तल करणे एक प्रकारचा मोठा गुन्हा असताना त्याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिसूनही डोळेझाक केल्याचे चित्र दिसते. रबाळे एमआयडीसी मधील उद्योजकांवर एमआयडीसी अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक राहिलेला नसून, अवैध वृक्षतोडीकडे नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमींचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सायन पनवेल मार्गावर केमिकलचा टँकर उलटला