सायन पनवेल मार्गावर केमिकलचा टँकर उलटला  

वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांची झाली गैरसोय  

नवी मुंबई : गुजरात येथून रोहा येथे ज्वलनशील केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन त्यातील केमिकल लिकेज झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे घडली. सुदैवाने यावेळी कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे ऐन सकाळच्या सुमारास सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तुर्भे वाहतुक शाखेने अग्निशमन दल, तसेच हार्डेलिया कंपनीतील तज्ञांच्या मदतीने सदरचा केमिकल टँकर बाजुला काढुन या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु केली.  

या घटनेतील अपघातग्रस्त हायड्रॉलिक केमिकलने भरलेला टँकर गुजरात येथुन रोहा येथे जात होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर टँकर सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील उड्डाणपुलाजवळ आला असताना, भरधाव वेगात असलेल्या केमिकलच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर टँकर रस्त्यावर पलटी होऊन त्यातील केमिकल लिकेज होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात टँकरमधील केमिकलचा धुर पसरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुक बंद केली.  

त्यानंतर वाहतुक पोलिसांनी हार्डेलिया कंपनीच्या तज्ञांना पाचारण करुन टँकरमधील केमिकलचे लिकेज थांबवून अपघातग्रस्त टँकर मधील केमिकल दुसऱया टँकरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन सदर टँकर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने उचलुन बाजुला काढण्यात आला. या प्रकारामुळे सायन पनवेल मार्गावर ऐन सकाळच्या सुमारास नेरुळ एलपी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पनवेल पुणे व त्यापुढे जाणाऱया प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली. मात्र सकाळी 7 नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.  

सायन-पनवेल मार्गावर केमिकल टँकर पलटी झाल्याने काही काळ सायन पनवेल मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱया वाहनांना दुसऱया मार्गाने सोडुन वाहतुक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचप्रमाणे अग्निशमन दल आणि हार्डेलिया कंपनीतील तज्ञांच्या मदतीने सदर अपघातग्रस्त टँकर सुरिक्षतरित्या बाजुला काढण्यात आल्यानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आल्याची माहिती तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

स्पेशल छब्बीस सारखी टोळी तयार करुन लुट करणारी टोळी अटकेत