७५ किलो टोमॅटोची चोरी

एपीएमसी बाजारात चोरट्यांचा चक्क टोमॅटोवरच डल्ला

वाशी : बाजारात सध्या टोमॅटोला सोन्याचा भाव मिळत असल्याने चोरांनी चक्क टोमॅटोवरच डल्ला मारला आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला आवारात टोमॅटो चोरीचा घटना घडली असून, चोरांचा प्रताप सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी ७०-७५ किलो ७ हजार रुपयांचे टोमॅटो चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोने-चांदी प्रमाणे टोमॅटोची देखील चोरी होऊ लागल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टोमॅटोचे उत्पादन कमी असल्याने टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो १०० रुपये तर किरकोळ बाजारात टोमॅटो दराने दीडशे रुपये पार केले आहेत. त्यामुळे टोमॅटोला पेट्रोल-डिझेल पेक्षाही जास्त दर असल्याने टोमॅटो चांगलेच भाव खात आहेत. टोमॅटो दररोज लागणारा जिन्नस असल्याने कितीही महाग झाला तरी गृहिनींना टोमॅटो घ्यावेच लागतात.  मध्यंतरीच्या कालावधीमध्ये टोमॅटो अगदी कवडीमोल दराने विक्री होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे दुर्लक्ष केले. परिणामी सध्या टोमॅटोचे उत्पादन कमी असल्याने टोमॅटोची टंचाई भासत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच टोमॅटो दराने उच्चांक गाठला आहे.  त्यामुळे सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असल्याने आता टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. एपीएमसी बाजारात १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्याच्या गाळ्यावर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल ७०-७५ किलो,  सात हजार रुपयांचे टोमॅटो चोरल्याची घटना समोर आली आहे. टोमॅटोची इतकी दरवाढ झाली आहे की, आता टोमॅटो देखील चोरीला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष