पनवेल मधील गाढेश्वर धरणाच्या प्रवाहात अडकुन पडलेल्या दोघांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका  

 

 गाढेश्वर धरणाच्या प्रवाहात अडकुन पडलेल्या दोघांची पोलिसांकडुन सुखरुप सुटका  

नवी मुंबई : पनवेल मधील गाढेश्वर धरणाच्या परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या व तेथील पाण्याच्या प्रवाहात अडकुन पडलेल्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी सुखरुप बाहेर काढुन त्यांना वाचविण्याचे कार्य केले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून दोन्ही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढल्याने या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  

पावसाळ्यात पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. काही अतिउत्साही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे या भागात दुर्घटना घडत असतात. अशा प्रकारच्या कुठल्याही दुर्घटना होऊ नयेत, यासाठी गाढेश्वर धरणाकडे पर्यटकांनी जाऊ नये यासाठी या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, त्यानंतर देखील रविवारी सकाळच्या सुमारास काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे गेले होते.त्यापैकीच सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण नेरे येथील गाढेश्वर नदीपात्रात उतरले होते.  

मात्र बघता बघता नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने दोघेही पाण्यात अडकुन पडले. दोघेही सदर पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची भिती होती. याचदरम्यान पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक या भागात गस्त घालण्यासाठी आले असताना त्यांना सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण गाढेश्वर नदीपात्रात अडकल्याचे निदर्शनास आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने या दोघांना पाण्याच्या प्रवाहातून सुखरुप बाहेर काढुन त्यांची सुटका केली. यावेळी सोहेल आणि मनोज या दोघांनी पोलिसांचे आभार मानले.  

पर्यटकांनी पनवेल व आजुबाजुच्या परिसरात वर्षासहलीसाठी येताना त्या भागाची संपुर्ण माहिती घ्यावी, पर्यटनस्थळी पोलिसांकडुन सूचना फलक लावण्यात आले असून पर्यटकांनी त्या सूचनांचे पालन करावे तसेच अशा ठिकाणी अतिउत्साह टाळून सतर्क रहावे.  - वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील (पनवेल तालुका पोलीस ठाणे)  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

७५ किलो टोमॅटोची चोरी