‘रिलायन्स जिओ'मध्ये नोकरीचे आमिष; बेरोजगारांची फसवणूक

रबाले एमआयडीसी पोलिसांकडून सायबर चोरट्यांचा शोध

नवी मुंबई : रिलायन्स जिओ कंपनीमध्ये विविध पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अनेक बेरोजगार तरुण-तरुणींकडून रजिस्ट्रेशन, प्रोसेसिंग फीच्या नावाने लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या टोळीने रिलायन्स जिओ कंपनीचा लोगो आणि बनावट ट्रेडमार्कचा वापर करुन बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी मिळाल्याबाबतचे रिलायन्स जिओचे बनावट आणी खोटी पत्र ई-मेलद्वारे पाठविल्याचे देखील उघडकीस आले आहे. रबाले एमआयडीसी पोलिसांनी रिलायन्स जिओ कंपनीच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर चोरांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

रिलायन्स जिओ कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवुन बेरोजगार तरुण-तरुणींकडून पैसे उकळण्याचे प्रकार काही सायबर गुन्हेगारांनी सुरु केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या काही तरुण-तरुणींनी नवी मुंबईतील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीला संपर्क साधण्यास सुरुवात केल्यानंतर फसवणुकीचे सदर प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. मागील दोन-तीन वर्षामध्ये असे फसवणुकीचे शेकडो प्रकार घडले असून मागील दोन-तीन महिन्यामध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचे ४४ प्रकार घडले आहेत. सदर सायबर चोरटे रिलायन्स जिओ मध्ये कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याबाबत एसएमएस आणि ई-मेल पाठवून बेरोजगार तरुण-तरुणींकड रजिस्ट्रेशन, प्रोसेसिंग फीच्या नावाने हजारो रुपये उकळत आहेत.  

काही तरुण-तरुणींना तर या सायबर चोरट्यांनी नोकरी मिळाल्याबाबतचे रिलायन्स जिओचे बनावट आणि खोटे पत्र ई-मेलद्वारे पाठविले आहेत. तसेच अनेकांना नोकरीला लागल्याचे भासवून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल पाठविण्याच्या बहाण्याने पैसे घ्ोऊन त्याचे इनव्हॉईस देखील पाठविले आहेत. दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या इंटेलिजन्स ॲन्ड सर्वेलन्स कडून याची तपासणी केली असता, सायबर चोरट्यांनी जिओ कंपनीचा बनावट लोगो आणि ट्रेडमार्क तयार केल्याचे आढळून आले. तसेच फसवणूक झालेल्या व्यक्तींना ज्या ई-मेलवरुन नोकरीची पत्रे पाठवण्यात आली आहेत तसेच ज्या मोबाईल फोन वरुन संपर्क साधण्यात आले आहे, ते सर्व बोगस आणि बनावट असल्याचे आढळुन आले आहे.  

सायबर चोरट्यांकडून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीमध्ये नोकरी मिळवुन देण्याचे आमिष दाखवत सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्यात येत असल्याने तसेच सदर कंपनीबद्दल खोटी माहिती पसरवून जनमानसात कंपनीची प्रतिमा मलिन करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीच्या वतीने डेप्युटी मॅनजेर सुधीर नायर यांनी रबालेे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह, आयटी ॲक्ट सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करुन सदर प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

रिलायन्स जिओ कंपनी मधील नोकर भरती कार्यपध्दतीः
रिलायन्स जिओ कंपनीमध्ये कोणालाही नोकरीला ठेवताना कोणत्याही प्रकारचे पैसे मागण्यात येत नाहीत. तसेच नवीन नोकरी देताना उमेदवारांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये बोलावून त्यांची मुलाखत घेऊन तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता बघूनच त्यांना नोकरीवर ठेवण्यात येते. कंपनीकडून कोणत्याही नोकरीची जाहिरात एसएमएस किंवा ई-मेलद्वारे देऊन उमेदवारांशी संपर्क साधण्यात येत नाही. काही व्यवतींकडून लॅपटॉप आणि मोबाईल पाठविण्याच्या बहाण्याने पैसे घेण्यात आले आहेत. मात्र, रिलायन्स जिओ कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आणि मोबाईल देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची ९ वाहनांना धडक