सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे पोलीस उपआयुक्तांचे आवाहन
पनवेल परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क
नवी मुंबई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तसेच स्टेटस ठेवल्यामुळे सध्या राज्यातील काही जिह्यांमध्ये दंगलीचे प्रकार घडले आहेत. अशाच प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पनवेल परिसरात निर्माण होऊ नये तसेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. या पार्श्वभुमीवर परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींच्या बैठका घेऊन आपत्कालीन परिस्थीतीत त्यांनी कसे काम करावे, कोणती भुमीका घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर शेअर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटसमुळे तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. पनवेल परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी नुकतीच पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आषाढी एकादशी, बकरी ईद व आगामी इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरुपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच सामाजिक एकोपा अबाधित राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी केले.
या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी तसेच सोशल मिडियावर कोणत्याही आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर आढळल्यास त्याबद्दलही पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावणाऱया आक्षेपार्ह पोस्ट्स, मेसेज, स्टेटस शेअर करु नयेत अशा सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर व्हायरल होणारे बनावट मेसेज, व्हिडीओ यावर नियंत्रण ठेवावे. सोशल मिडीयाच्या वापराबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण होण्याकरिता शाळा महाविद्यालय स्तरावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून बैठका आयोजित कराव्यात. तसेच प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे देखील डहाणे यांनी यावेळी सुचित केले.
रोबर शांतता समितीच्या सदस्यांची आपत्कालीन परिस्थितीतील भूमिका समजावून सांगून शहरी परिसरात समितीच्या सदस्यांनी पोलिस ठाणे क्षेत्राचे भान न ठेवता एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीला परिमंडळ-2 कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शांतता समिती सदस्य, सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधी, सर्व जाती धर्मीय सदस्य मोठ्या संख्येन उपस्थित होते.