21 पोलीस निरीक्षक नवी मुंबईत दाखल होणार

नवी मुंबईतील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नवी मुंबई : राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकाळ पूर्ण झालेल्या 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नवे 21 पोलीस अधिकारी नवी मुंबईत दाखल होणार आहेत. बदली झालेल्या या अधिका-यांना संबधीत घटक प्रमुखांनी त्यांच्या बदलीवर येणा-या अधिका-यांची वाट न पाहता त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे सुचित केले आहे. तसेच जे पोलीस अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करुन देखील वेळेत बदलीवर हजर होणार नाहीत, अशा पोलीस अधिका-यांविरोधात घटकप्रमुखांनी शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश देखील दिले आहेत.  

पोलीस आस्थापना मंडळातर्फे प्रत्येक आयुक्तालयात सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत. या बदली आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 14 पोलीस निरीक्षकांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली आहे. यात विहीत कालावधी पूर्ण न झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार विशेष बाब म्हणून बदली झालेल्यामध्ये पोलीस निरीक्षक सुनिल पाटील (ठाणे शहर), शत्रुघ्न माळी (रायगड) या अधिकाऱयांचा समावेश आहे.  

त्याचप्रमाणे सहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱयांमध्ये पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, नितीन गिते, निशिकांत विश्वकार, भारत कामत, राजु सोनवणे, विजय वाघमारे, संदिपान शिंदे, अर्जुन गरड, विजय कादबाने यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बापुराव देशमुख, प्रमोद पवार यांची मुंबई शहरात तसेच दत्तात्रय किंद्रे यांची पालघरमध्ये बदली करण्यात आली आहे.

तर बदलीमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रिक्त होणाऱया जागी राज्यातील इतर भागातून बदली झालेले 21 नवे अधिकारी नवी मुंबई आयुक्तालयात दाखल होणार आहेत. यात मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, संजय बेंडे, सुनिल वाघमारे, दिपाली पाटील, अजय शिंदे, जितेंद्र मिसाळ यांचा समावेश आहे. तसेच ठाणे शहरातील तुकाराम पवळे, गुलफरोज मुजावर, राजेंद्र कोते, रायगडमधील पोलीस निरीक्षक मारुती सकपाळ, मुंबई लोहमार्गात कार्यरत असलेले प्रविण भगत यांची देखील नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे.  

त्याचप्रमाणे गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षकांचे वाचक राजकुमार कोथमिरे, फोर्स वन मधील पोलीस निरीक्षक बापू ओवे, नंदूरबार जिल्हा जात पडताळणी समितीवरील नितीन ठाकरे, ठाणे ग्रामीण येथील घनश्याम आढाव, कोल्हापूर येथील औदुबंर पाटील, लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख, आबासाहेब पाटील, संजय पाटील, तसेच राज्य गुफ्तवार्ता विभागातील सुरज पाटील यांची त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये कार्यरत असलेले भानुदास खटावकर यांची नवी मुंबईतील प्राथमिक संपर्क केंद्रात बदली करण्यात आली आहे.  

 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे पोलीस उपआयुक्तांचे आवाहन