१३ चेन स्नॅचींग, ४ वाहन चोरीचे गुन्हे उघड  

२ सराईत चेन स्नॅचर्स जेरबंद  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे  शाखा युनिट-२च्या पथकाने चेन स्नॅचींग करणाऱ्या दोन सराईत लुटारुंना जेरबंद केले आहे. या लुटारुंनी नवी मुंबईसह ठाण्याच्या हद्दीत केलेले १२ चेन स्नॅचींगचे तसेच ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आता या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या लुटारुंच्या कारवाया रोखण्याचे आदेश गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने नवी मुंबई, ठाणे, मुंबई तसेच मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त केली. त्यानंतर या पथकाने घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन, प्राप्त सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींबाबत माहिती संकलित केली.  

यावरुन अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींबाबत अधिक माहिती मिळवून कळंबोलीत घडलेल्या चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यातील आरोपी केवीन उर्फ मोहम्मद सादक जाफरी (२१) याला मुंब्रा कौसा भागातून अटक केली. तसेच सदर गुन्ह्यातील ५० हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांच्याकडून जप्त केले. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने कळंबोली, रबाले, खारघर, कोपरखैरणे आदि भागात ५ चेन स्नॅचींगचे आणि ठाण्यातील नारपोली येथून एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.  

त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने रबाले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हाथी उर्फ कैलासा कमलबहादूर नेपाळी (२४) या सराईत लुटारुचा माग काढून त्याची माहिती मिळविली. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्यावर सतत पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने नेपाळी याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने रबाले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ तसेच वाशी, एनआरआय, तळोजा या हद्दीत प्रत्येकी-१ असे ६ चेन स्नॅचींगचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तसेच त्याने रबाले, सानपाडा आणि कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ मोटारसायकलची चोरी केल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने नेपाळी याला अटक केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

21 पोलीस निरीक्षक नवी मुंबईत दाखल होणार