सिडकोच्या जागेवर डेब्रीज टाकणारे, नैसर्गीक मातीची चोरी करणाऱ्या विरोधात सिडकोची धडक कारवाई  

नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन त्याची चोरी करणा-या विरोधात सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई : सिडकोच्या जागेवर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रीज अनधिकृतपणे टाकून अतिक्रमण करणा-या तसेच नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन त्याची चोरी करणा-या विरोधात सिडकोने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या धडक कारवाईत सिडकोने गत 9 महिन्यामध्ये सिडकोच्या जागेवर डेब्रिज टाकणारे तसेच नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन त्याची चोरी करणा-या एकुण 47 व्यक्तींवर कारवाई करुन त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या कारवाईत 41 ट्रक-डंपर्स, 1 जेसीबी, 1 पोकलन देखील जफ्त केले आहेत.  

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये तसेच त्याच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये काही व्यक्तींकडुन मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रीज अनधिकृतपणे टाकुन सदर जागेवर अतिक्रमण करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी अनधिकृतपणे नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन मातीची चोरी करण्यात येत असल्याने या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सिडको महामंडळातील अभियांत्रिकी विभागाचे अभियंते, अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक, अधिकारी व अभियंते तसेच सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने 20 सफ्टेंबर 2022 पासून विशेष  मोहिम सुरु केली आहे.  


या विशेष मोहीमेदरम्यान, सिडकोच्या पथकाने सिडकोच्या जागेवर डेब्रिज टाकणारे तसेच नैसर्गीक मातीचे (1 कोटी 30 लाख 75 हजार रुपये) उत्खनन करुन त्याची चोरी करणारे अशा एकुण 47 व्यक्तींवर कारवाई केली आहे. यात ट्रक-डंपर्स, जेसीबी, पोकलन वरील चालक, क्लिनर तसेच डेब्रीज टाकण्यास मदत करणाऱयांचा समावेश आहे. या सर्वांवर विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कण्यात आली आहे. या सर्व कारवायांमध्ये 41 ट्रक-डंपर्स, 1 जेसीबी, 1 पोकलन आदी वाहने जफ्त करण्यात आली आहेत.  सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी सिडको)

सिडकोच्या परिक्षेत्रात विकासकामे प्रगतीपथावर असून सिडको परिसरात मानवी आरोग्यास हानीकारक अशा प्रकारचा कचरा, बांधकामाचा राडारोडा, उत्खननातील दगडमाती टाकण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कोणी आढळल्यास सदर व्यक्तींवर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेबसाईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

१३ चेन स्नॅचींग, ४ वाहन चोरीचे गुन्हे उघड