कोपरखैरणे मध्ये ५ रिक्षा चालकांवर कारवाई

मीटरप्रमाणे रिक्षा न चालवता मनमानी भाडे आकारणी

नवी मुंबई : कोपरखैरणे आणि घणसोली भागातील काही रिक्षा चालक मीटरप्रमाणे रिक्षा न चालविता मनमानी भाडे आकारुन प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी स्वतः खाजगी वेशात प्रवाशी बनून रिक्षांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या तपासणीत ५ रिक्षा चालक मीटरप्रमाणे रिक्षा न चालविता मनमानी भाडे आकारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या पाचही रिक्षांचे लायसन्स जमा करुन पुढील कारवाईसाठी ‘नवी मुंबई आरटीओ'कडे पाठवून दिले आहेत.  
कोपरखैरणे आणि घणसोली भागातील काही रिक्षा चालक मीटरप्रमाणे रिक्षा न चालविता मनमानी भाडे आकारुन ग्राहकांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी १५ जून रोजी सकाळी कोपरखैरणे आणि घणसोली भागात स्वतः खाजगी वेशात प्रवासी बनून काही रिक्षांची तपासणी केली.  

या तपासणीत ५ रिक्षा चालक मीटरप्रमाणे रिक्षा न चालविता मनमानी भाडे आकारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी या पाचही रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे लायसन्स जमा केले आहेत. तसेच ते नवी मुंबई ‘आरटीओ'कडे पाठवून दिले आहेत. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविता मनमानी भाडे आकारुन प्रवाशांची लूट करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कोपरखैरणे वाहतूक शाखेने कारवाईला सुरुवात केल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.  

दरम्यान, यापूर्वी पनवेल वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली होती. त्यामुळे यापुढील काळात अशा रिक्षा चालकांवर देखील कारवाई केली जाणार असल्याने ऑटोरिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे रिक्षा चालविण्याचे आवाहन कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सिडकोच्या जागेवर डेब्रीज टाकणारे, नैसर्गीक मातीची चोरी करणाऱ्या विरोधात सिडकोची धडक कारवाई