अंमली पदार्थांच्या धोक्याविरुध्द जनजागृतीसाठी केंद्र शासनाचा पुढाकार   ​​​​​​​

राज्यात नशामुक्त भारत पंधरवडा सुरु

नवी मुंबई : २६ जून या आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्त साधून भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुध्द लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त भारत'चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने (एनसीबी) १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने राज्यात नशामुक्त भारत पंधरवाडा उपक्रमांतर्गत व्यापक स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत आणि धोक्यांविरुध्द लढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे असा या नशामुक्त भारत पंधरवाडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने राज्यात नशामुक्त भारत पंधरवाडा उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा ई-प्रतिज्ञा मोहिमा, आदि कार्यक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. राज्यात नशामुक्त भारत पंधरवाडा अंतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी नशामुक्त भारत अभियान समिती तसेच ‘व्यसनमुक्ती केंद्र'च्या सहाय्याने कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने विद्यापीठ, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था अनुदानित संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च महाविद्यालये, अपंग संस्था, आश्रम शाळा, ‘जिल्हा परिषद'चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा, आदि कार्यक्रम आयोजित करावे, असे निर्देश राज्यातील समाज कल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन बैठकीद्वारे दिले आहेत.

सदर बैठकीस समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.  

‘संयुक्त राष्ट्र संघ'च्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार दरवर्षी २६ जून रोजीड्रग ऍब्युज आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा केला जातो. भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुध्द लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त भारत'चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने (एनसीबी) १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे. त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘नशा मुक्त भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मिडीया पलॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात व्यापक स्तरावर पंधरवाडात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत राज्यातील सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत. = सुमंत भांगे, सचिव - सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसीतील एमएच-43 बारवर कारवाई