गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची कोपरीगाव ग्रामस्थांची मागणी

कोपरीगाव परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

वाशी : मागील काही दिवसांपासून कोपरीगाव परिसरात मोबाईल, पाणी मोटार चोरी, घरफोडीसह अंमली पदार्थ विक्री आणि इतर विविध स्वरुपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोपरीगाव परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी कोपरी गाव ग्रामस्थांनी ‘एपीएमसी पोलीस ठाणे'च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन केली आहे.


कोपरी गावात सध्या चोरांचा आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या घटकांचा सुळसुळाट झाला आहे. कोपरी गावात मोबाईल चोरी, पाणी मोटार चोरी तसेच इतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात कोपरी गावातील गावदेवी मंदिराचे कुलूप तोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे कोपरी गावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरी गावात पोलीस बंदोबस्तात वाढ करुन चोरांच्या तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशी मागणी ‘कोपरी गाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष परशुराम ठाकूर यांनी कोपरीगाव ग्रामस्थांच्या समवेत ‘एपीएमसी पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांची भेट घ्ोऊन, त्यांना निवेदन देऊन केली आहे. यावर कोपरी गाव ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोपरी गावात योग्य पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांनी परशुराम ठाकूर यांना दिले. तसेच याबाबत उद्या १२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता एपीएमसी पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी कोपरी गाव मराठी शाळेत उपस्थित राहून गुन्हेगारी घटनांमुळे त्रस्त नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कोपरी गावातील अनेक मान्यवरांसह पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, संदीप चौगुले, अमोल कर्डीले आदी उपस्थित होते. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थांच्या धोक्याविरुध्द जनजागृतीसाठी केंद्र शासनाचा पुढाकार   ​​​​​​​