फसवणुकीने दागिने, ऐवज लंपास ; कोपरखैरणे पोलीस हतबल

कोपरखैरणे मध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ 

नवी मुंबई : कोपरखैरणे विभागात गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः महिला आणि जेष्ठ नागरिकांना लक्ष्य करुन, त्यांना आमिष दाखवून हातचलाखीने त्यांचे दागिने लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्यांच्या कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही करावी तसेच कोपरखैरणे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी कोपरखैरणे सेक्टर-१८ मधील ‘भारतीय जनता पार्टी'चे शक्तिकेंद्र प्रमुख वसंत जाधव यांनी ‘कोपरखैरणे पोलीस स्टेशन'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्याकडे केली आहे.

कोपरखैरणे सेक्टर-१८ मधील कमळाबाई चौहान (वय-६०) यांना नुकतेच गुलाबसन्स डेअरीजवळ दोन इसमानी थांबवून एक गुजराती शेठ धान्य आणि साड्या वाटप करीत असून, तुझ्या गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेव, अशी भुलथाप देऊन हातचलाखीने त्यांचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. याच प्रकारे विठाबाई भिलारे (वय-८५) यांचे देखील दागिने भामट्यांनी लुबाडून नेल्याची घटना घडली आहे. कोपरखैरणे सेक्टर-१८ मध्ये राहणारे विजय ताम्हाणे (वय-५६) यांनाही भामट्यांनी भुलथापा देऊन त्यांच्याकडील रोख रक्कम १३०० रुपये आणि दोन तोळ्याची सोन्याची चैन घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

काही महिन्यांच्या अंतराने कोपरखैरणे सेक्टर-१८ मध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या घटना घडून तसेच या घटनाचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलीस तपासात आत्तापर्यंत काही निष्पन्न झालेले नाही. याबाबत कोपरखैरणे सेक्टर-१८ मधील ‘भारतीय जनता पार्टी'चे शक्तिकेंद्र प्रमुख वसंत जाधव यांनी ‘कोपरखैरणे पोलीस स्टेशन'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांची भेट घेऊन कोपरखैरणे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या घटनांना आवर घालण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी देखील कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस बंदोबस्त वाढविण्याबरोबरच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्यांना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्याचे आश्वासन वसंत जाधव यांना दिले आहे. नागरिकांनी देखील त्यांना कुणी संशयास्पद व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना त्याची माहिती द्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी केले आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

‘एमआयडीसी'द्वारे सदर भूखंडाची विक्री