6 लाख रुपये किमतीचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला उच्चशिक्षित तरुण अटकेत 

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-14 मधील पामबीच सर्व्हिस रोडवर एलएसडी पेपर या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी रात्री सापळा लावून अटक केली. मोहमंद फैसल खतीब (27) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळ असलेला 6 लाख रुपये किमतीचा 1 ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला तरुण आर्किटेक्चर मध्ये पदविधर असुन सध्या तो उच्चशिक्षण घेत आहे. तसेच तो सुस्थापित घरातील असुन केवळ पैशांच्या हव्यासापोटी तो सदरचा धंदा करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेला मोहमंद फैसल खतीब हा तरुण सिवुड्स मध्ये राहण्यास आहे. उच्चशिक्षण घेत असलेला हा तरुण एलएसडी पेपर या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची तसेच तो नेरुळ सेक्टर-14 मध्ये पामबीच सर्व्हिस रोडवर एलएसडी पेपर या अंमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीतअली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे व त्याच्या पथकाने नेरूळ सेक्टर -14 मध्ये 31 मे रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सापळा लावून मोहमंद फैसल खतीब याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे एकुण 6 लाख रुपये किमतीचा 1 ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ सापडल्याने पोलिसांनी सदर अमली पदार्थ व मोबाईल फोन जप्त करुन त्याला अटक केली. सदर आरोपी विरुध्द नेरुळ पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

फसवणुकीने दागिने, ऐवज लंपास ; कोपरखैरणे पोलीस हतबल