‘काँग्रेस'च्या मागणीमुळे ‘इंडियन स्वच्छता लीग'चा कार्यक्रम स्थगित
नवी मुंबई ः आज १७ सप्टेंबर रोजी नेरुळ, सेक्टर-२६ येथील गणपतशेठ तांडेल मैदान तसेच सीबीडाबेलापूर येथील सुनील गावसकर क्रीडांगणावर सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग'च्या विशेष कार्यक्रमात शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग न करणेबाबत तसेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम रद्द करण्याची मागणी ‘नेरुळ ब्लॉक काँग्रेस'चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने सदर मागणीची दखल घेत नियोजित ‘इंडियन स्वच्छता लीग'चा कार्यक्रम अतिवृष्टीचे कारण देत स्थगित केला आहे. ‘काँग्रेस'चे नेरुळ ब्लॉक अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेत कार्यक्रम स्थगित केला आहे.
आज १७ सप्टेंबर रोजी नेरुळ, सेक्टर-२६ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात तसेच सीबीडी-बेलापूर मधील सुनील गावसकर क्रीडांगणावर सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होणाऱ्या‘इंडियन स्वच्छता लीग'च्या विशेष कार्यक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार होते. इतर युवकांनीही याप्रसंगी स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने यात सहभागी होण्यासाठी प्रसिध्दी माध्यमांतून तसेच सोशल मिडीयातून नवी मुंबईकरांना आवाहनही केले आहे. कार्यक्रमामध्ये पामबीच रोड तथा राजीव गांधी स्टेडीयम येथे मानवी साखळी आणि इतर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका शाळा आणि इतर खाजगी शाळेतील विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात येणार होते. तर महिला बचत गटाच्या सदस्यांनाही निमंत्रित केले आहे. महिलांना कोरोना संसर्ग होण्याची तसेच पावसात भिजल्यावर साथीच्या आजारांची लागण होण्याची भिती आहे. बचत गटातील महिला आणि विद्यार्थ्यांची मानवी साखळी करुन त्यायोगे जनजागृती करणे प्रशासनाला अभिप्रेत आहे. कुठलीही रॅली, मोर्चा, आंदोलने आणि जनजागृतीपर सभा यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध घातलेला असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
कोरोना महामारी नियत्रंणात असली तरी या महामारीचे अजुनही पूर्णपणे निमर्ुलन झालेले नाही. अशा सार्वजनिक कार्यक्रमातील गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होऊन बचत गटातील महिला तसेच मुलांना संसर्ग होण्याची भिती होती. महत्वाचे म्हणजे गेली काही दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा बघता अशा प्रकारे रॅलीचे आयोजन करणे अत्यंत चूक आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या ‘निश्चय केला नंबर पहिला' राबविताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना वेठीस धरणे योग्य नाही. पावसामुळे नेरुळ मधील गणपतशेठ तांडेल मैदान आणि सीबीडी मधील सुनील गावसकर क्रीडांगण चिखलाने माखलेले आहे. त्या ठिकाणी डासांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कार्यक्रम एक दिवसाचा होईल, प्रशासनाला शाबासकीही मिळेल; पण मुलांना साथीच्या आजाराची लागण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला विचारला होता.
देशामध्ये स्वच्छतेत प्रथम क्रमांक आणण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. परंतु, पहिल्या नंबरसाठी प्रयत्न करताना बाराही महिने आपली नवी मुंबई स्वच्छ कशी राहील याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. या अनुषंगाने नवी मुंबईतील गांव, गांवठाण, झोपडपट्ट्या, वाड्या-वस्त्या, पुलाखालील असंरक्षित वस्त्या यांच्या स्वच्छतेकडे प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे. महापालिका कर्मचारी आणि अधिकारी नवी मुंबईतील शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव न करता विकासामध्ये तसेच समस्या निवारणामध्ये सातत्याने समतोल राखत आहेत. परंतु, प्रशासनाने राज्य आणि केंद्र पातळीवरील वरिष्ठांची शाबासकी मिळविण्यासाठी मुसळधार पावसात आणि कोरोनाच्या सावटात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे उचित नाही. जनजागृतीपर कार्यक्रमाचे महापालिका प्रशासनाने निश्चितच आयोजन करावे. पंरतु, अशा कार्यक्रमासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करु नये. अतिवृष्टी होण्याची शक्यता पाहता महापालिका प्रशासनाने सदर कार्यक्रमच रद्द करावा, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी केली होती.
दरम्यान, रविंद्र सावंत यांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने सदर कार्यक्रम अतिवृष्टीचे कारण देत स्थगित केल्याने महापालिका मुख्यालयात नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी असलेला कार्यक्रम ‘काँग्रेस'च्या मागणीमुळे स्थगित झाला असल्याची चर्चा सुरु आहे.