लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीतील पात्रे शोषित, दलित जनतेची दुःख- व्यथा जणू प्रत्यक्षात येऊन वाचकांशी बोलतात. जे सामाजिक न्याय हक्कापासून वंचित होते ते स्वतःच्या जगण्याला संचित समजत होते अशा वंचितांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केले. १९५८ साली मुंबईत स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनपर भाषणात ते म्हणाले होते की ‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित, कष्टकरी, मजूर, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे.' समाजातील दलित शोषित जनतेने जात-पात, धर्म, मान-पान यांचा त्याग करून समतेवर आधारित समाज निर्माण करण्यास पुढाकार घ्यावा, असे ते म्हणायचे.

लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या शिक्षणाविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही; पण असं म्हणतात की ते फक्त दीड दिवस शाळेत गेले होते. पुढे हळूहळू बाजारातील दुकानावरील फलक-पाट्या पाहून, वाचून त्यांना अक्षर ज्ञान होऊ लागले. त्यांना बुलबुल, बासरी व हार्मोनियम वाजवायला आवडायचे. ते जितके सुंदर वाद्य वाजवायचे तितके सुंदर ते अभिनय सुद्धा करायचे. तत्कालीन समाजव्यवस्थेतील दलित-वंचित हा जो घटक आहे यांनीच लोककला जोपासली. तमाशा, भारुड यांसारख्या लोककला यांनी जिवंत ठेवल्या. त्यांच्या उदरनिर्वाचे साधन होते. अण्णाभाऊ साठे यांच्या घरी म्हणजे त्यांच्या मावसभावाचा तमाशा असल्याने लहानपणापासून हे सगळे पाहत आले होते, जगत आले होते. पुढे त्यांना शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांची साथ लाभली. या दोन सहकाऱ्यांच्या जोडीने अण्णाभाऊ साठे यांनी क्रांती घडवून आणली. या सर्व प्रवासात त्यांच्यावर श्रीपाद डांगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. सुरुवातीला ते श्रीपाद डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते; नंतर मात्र ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीला अनुसरून दलित-वंचिताच्या उद्धरासाठी कार्य करू लागले.

उपेक्षितांची चळवळः अण्णा मुळात गिरणी कामगार. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित, स्त्री -पुरुष त्यांच्या साहित्यात केंद्रस्थानी होते. ते जन्माने मांग असल्याकारणाने अगदी दीड दिवसाच्या शाळेतही त्यांना त्याचा प्रत्यय आला. पावलोपावली चटके बसले. शहरात आल्यावर हमाली, बूट पॉलिश, घरघडी, हॉटेल बॉय, खाण कामगार अशा सर्व प्रकारची कामं त्यांनी केली.

‘जन्मांना पाहिलं अन कर्मानं साहिलं
उपेक्षितांचं जगणं तुम्ही आजन्म गायलं'

म्हणून त्यांच्या साहित्यकृतीतील पात्रे शोषित, दलित जनतेची दुःख- व्यथा जणू प्रत्यक्षात येऊन वाचकांशी बोलतात. जे सामाजिक न्याय हक्कापासून वंचित होते ते स्वतःच्या जगण्याला संचित समजत होते अशा वंचितांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी केले. १९५८ साली मुंबईत स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनपर भाषणात ते म्हणाले होते की ‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित, कष्टकरी, मजूर, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे.' समाजातील दलित शोषित जनतेने जात-पात, धर्म, मान-पान यांचा त्याग करून समतेवर आधारित समाज निर्माण करण्यास पुढाकार घ्यावा, असे ते म्हणायचे.

साहित्यिक चळवळ : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे विलक्षण प्रतिभेचे कवी, मानवतावादी लेखक, दिन दुबळ्या उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे खऱ्या अर्थाने पहिले दलित साहित्यिक होय. त्यांनी डोंगराएवढं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. १३ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, ३०-३५ कादंबऱ्या, एक प्रवास वर्णन, एक शाहिरी पुस्तक लिहिलेले आहे. त्याचबरोबर नाटक, चित्रपट कथाही लिहिलेल्या आहेत. त्यांचे साहित्य जवळपास २५ -२७ भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. शोषण मुक्ती हा त्यांचा ध्यास होता. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय-अत्याचाराला त्यांनी वाचा फोडली. समाजातील वास्तव दर्शन, मानवी वृत्ती- प्रवृत्तीचे दर्शन घडविले. वाचकांना आकर्षित करण्यापेक्षा विचार प्रवृत्त करावे हे अण्णांनी आपल्या साहित्यातून दाखविले. सुरुवातीच्या उमेदीच्या काळात त्यांनी कृषी गीते, लोकगीते, पोवाडे, गण, पदे लिहिली व ही जनपदे जनमानसांमध्ये गाऊन दाखवली. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर ते कथालेखन करू लागले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इ. नावे घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक महारथी, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे होय. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी उभा -आडवा महाराष्ट्र जागविला, गाजवला, पेटविला. त्यामध्ये शाहीर आण्णाभाऊ साठे यांची लेखणी व शाहीर अमर शेख यांच्या वाणीचा सिंहाचा वाटा होता. शाहीर हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा कणा आहे. आजवर लोकरंजन करणारे शाहीर आपल्या लेखणीतून महाराष्ट्रात आंदोलनात रण माजवीत होते. लोकांना आकर्षित करीत होते. जागं करीत होते. शाहिरांच्या डफाने आणि बुलंद आवाजाने आणि प्रभावी लेखणीने हा लढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता. शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात परिवर्तनाचं रान उठवलं. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

उत्तरार्ध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
‘मरने के बाद भी जिना चाहो तो एक काम जरूर करना
पढनेलायक कुछ लिख जाना.. या लिखने लायक कुछ कर जाना'

 या दोन्ही गोष्टी अण्णाभाऊ साठे यांनी केल्या. वाचण्यासारखं साहित्यही लिहिलं आणि त्यांच्यावर लिहावं असं कार्यही केलं. अण्णाभाऊ जरी दीड दिवस शाळेत गेले तरी डोंगराएवढं साहित्य त्यांनी निर्माण केलं. आज त्यांचं साहित्य पीएचडी पर्यंत शिकवलं जातं आणि त्यांच्या साहित्यावर पीएचडी केली जाते. अण्णाभाऊ साठे म्हणायचे माझी जीवनावर फार निष्ठा आहे. मला माणसं फार आवडतात. हे जग नंदनवन व्हावं, सर्व सुखी व्हावं.आणि त्यांच्याच वाट्याला शेवटच्या काळात दुःख, दारिद्रय नैराश्य आलं. शेवटचा काळ हलाखीचा होता. दारिद्रय व एकाकी आयुष्य वाट्याला आलं. १८ जुलै १९६९ रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. - प्रा. कवीश्वर शंकर कुंडलिक गोपाळे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गेट नंबर पाच