डोंगरची काळी मैना
एकदा डोंगरदऱ्यांमध्ये चैत्रपालवी फुटली की प्रत्येकाला वेध लागतात ते भाव खाऊन जाणाऱ्या डोंगरच्या काळ्या मैनेचे! हिरव्या हिरव्या काटेरी झुडपात लगडलेली काही कच्ची असलेली हिरवी, पिकलेली लाल आणि तोंडाला पाणी आणणारी गर्द काळी करवंद म्हणजे उन्हाळ्यातलं डोंगराला लगडलेलं एक अनोखं सौंदर्यच म्हणावं लागेल.
आपण माणसं आहोत म्हणून सणवाराला पुरणपोळ्या करून खातो; मग डोंगरातल्या चिमण्या पाखरांचा हाच रानमेवा उन्हाच्या तडाख्यात पुरणपोळ्यांसारखा! अनुभवी माणसं कायम म्हणतात, "ज्या त्या ऋतूत आलेलं फळ खाल्लंच पाहिजे. निसर्ग माणसाच्या शरीराला जेव्हा त्या फळाची वर्षातून गरज असते तेव्हाच ते निर्माण करत असतं म्हणून खात जा.” करवंदात लोहाचं प्रमाण जास्ती म्हणून उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं होणारं जास्तीचं उत्सर्जन आणि शरीराचं तापमान यांचा समतोल राखण्यासाठी करवंदांचा चांगला उपयोग होतो.
डोंगरातल्या आदिवासींपासून तर गाव खेड्यातल्या सर्वांनाच या करवंदांनी चांगलीच भुरळ घातली. एवढ्या कडक उन्हाळ्यात डोंगराच्या कपारीला पाण्याचा एक थेंबही नसताना आलेलं इतकं मधुर फळ का जादू करणार नाही हे नवलच. एकतर डोंगरदऱ्यांमध्ये जवळपास जानेवारी संपला म्हणजे काम आणि पाण्याच्या शोधात माणूस दूरदूर भटकताना दिसतो मग त्यात कसाबसा उदरनिर्वाह करायचा म्हणून बारीक चिल्ल्या पिल्ल्या पोरसोरांसहित सकाळी उठायचं अन् करवंदांच्या जाळ्या धुंडाळत फिरायचं. तोडता तोडता चिकट झालेली बोटं, मधूनच एखादं दुसरं भूक लागली म्हणून तोंडात घालून शांत केलेला अग्नी असं करत दिवस डोक्यावर कधी येतो याचा तपास सुद्धा लागत नाही!
इतका मोठा अजब या मैनेचा प्रवास मी खूपदा अनुभवलाय. करवंदांच्या जाळीकडे जर भर उन्हात कुणाचं लक्ष जर गेलं तर नक्की ती बोलकी काळी छोटी छोटी लगडलेली फळे मैनेसारखी समोरच्याशी बोलतात अन् हापण त्यांना मटकावल्याशिवाय राहत नाही. ती चार-दोन खाल्ल्यावर दुपारच्या उन्हातला गरमपणा आणि थकवा मात्र कुठल्या कुठे निघून जातो कळत सुद्धा नाही. म्हणूनच लहानपणी सायकलवर बसून फिरणारा विक्रेता मे महिन्यात न चुकता ते विकायचा अन्म्हणायचा,”लै गोड, चला घ्या. डोंगरची काळी मैना आली हो. डोंगरची काळी मैना.. ” अन् मग कुठेतरी गल्लीतल्या झाडाच्या सावलीचा आसरा घेत तो झाडाच्या पानांपासून बनवलेल्या द्रोणांमध्ये काळी मैना विकायचा अन् आम्ही तिची चव बराच वेळ चाखत बसायचो. वरून थोडं मीठ जर घेतलं तर मग आणखी दुधात साखर पडल्यासारखी चव वाढणार.
आज संभाजीनगरच्या बाजूलाच जळगाव रोडवर चौका गावाच्या रस्त्याच्या कडेला विकायला आलेली डोंगरची मैना पाहिल्या पाहिल्या तोंडाला चळचळा पाणी सुटलं! शेवटी मोह आवरता आला नाही. घेऊनच टाकली!
- निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी,मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर