मेवाडचे राजा क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह ९ मे - महाराणा प्रताप जयंती
युद्धभूमीवरील राणा प्रतापांचे अवाढव्य अन् भारदस्त रूप पाहिल्याने अकबर बादशहाने आपल्या आख्या जीवनात कधीही राणा प्रतापांसमोर युद्ध करण्याचे धाडस केलं नाही. तथापि त्यांच्या जागी अकबर बादशाह हे नेहमी मोगल सरदार राजे मानसिंह किंवा पुत्र सलीम (जहांगीर) यांना युद्धभूमीवर महाराणासमोर उभे करत असतं. मात्र स्वतः त्यांनी कधीच महाराणांसमोर थेट युद्ध करण्याचं तयारी दर्शवली नाही. यावरून हे सिद्ध होते की, अकबर बादशहाच्या मनात राणा प्रतापांबद्दल केवढं मोठं भय होतं. प्राण गेला तरी बेहत्तर, शत्रुपुढे झुकणार नाही ही राणा प्रतापांची धारणा होती.
मेवाडचे राजा क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह उदयसिंह सिसोदिया म्हणजे वीरता, त्याग, धैर्य, बलिदान, चारित्र्यशिलता, राष्ट्रभक्ती, देशाभिमान याच़ं मूर्तिमंत प्रतिक. अशा महापराक्रमी व अपराजित राजाचा जन्म सिसोदिया राजवंशात ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला, अन् हिंदुत्वाचा रक्षणकर्ता क्रांतीसूर्यच जणू भारतभूमीवर उदयास आला.महाराणा प्रतापसिंह यांच्या पिताश्रीचे नाव राणा उदयसिंह अन् मातोश्रीचे महाराणी जयवंता कुंवर.
बाप्पा रावल, राणा खुमानसिंह, समरसिंह, राणासंग,राणाकुंभ, उदयसिंह यांचा वैभवशाली अशा शौर्याचा वारसा महाराणा प्रताप यांनी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. म्हणूनच ते क्रांतीसुर्य म्हणवले गेले. त्यांचा राज्याभिषेक गोगुंदा येथे संपन्न झाला. मेवाडच्या राजांचे आराध्य दैवत एकलिंग महादेव असून, हे मंदीर राणा बाप्पा रावल यांनी उदयपूर येथे ८ व्या शतकात उभारले. मेवाड व चितोड म्हणजेच अखंड राजपुताना या प्रदेशांना अकबर बादशहाच्या हुकूमतपासून सुरक्षित ठेवण्यासाठी राणा प्रताप यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.प्राण गेला तरी बेहत्तर, पण कोणा शत्रूपुढे झुकणार नाही ही त्यांची भीष्मप्रतिज्ञा होती. पारतंत्र्याच्या साखरभातापेक्षा, मला माझ्या स्वातंत्र्यातली मीठभाकरी, कंदमुळे प्रिय आहेत, असे राणा प्रताप अभिमानाने सांगत असत.
जंगलात वास्तव्याला असताना कोणाचीही लाचारी न पत्करता, घासच्या बियांना कुटून त्याची भाकरी करून ते खात असत. दरम्यान आपल्या कुटुंबियांसाठी त्यांनी कोणापुढे हात पसरविले नाहीत. यालाच खऱ्या अर्थाने स्वाभिमानी बाणा जपणं म्हणतात. यास्तव महाराणा प्रताप यांना जयंती दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!जय राणा!
महाराणा प्रताप यांचं सैन्य दल व युद्धसामग्री अकबर बादशहाच्या तुलनेत अत्यल्प होतं.तरीदेखील महाराणा प्रताप हे सन १५७६ ते १५८६ या दशकात मोगल बादशाह व त्यांच्या सैन्यांशी प्राणपणाने लढले. हळदीघाट अन्खमनौरच्या युद्धांत वनवासी धनुष्यधारींच्या सहाय्याने अकबर बादशाह व त्यांच्या सैन्याला जेरीस आणून त्यांना रणांगणातून माघारी जाण्यास भाग पाडलं. या युद्धादरम्यान वनवासी धनुर्धारींनी राणा प्रतापांना मोलाची मदत केली.पहाडी क्षेत्रात युद्ध करण्याचे तंत्र केवळ वनवासींनाच ज्ञात असल्याने त्यांनी पहाडी युद्धतंत्राबाबत अनभिज्ञ असलेल्या मोगल सैनिकांना रणांगणावरून सळो की पळो करून सोडले.वास्तवात १६ व्या शतकातही गनिमी कावा या युद्धतंत्राचा प्रयोग केला होता की काय असे वाटते. या युद्धादरम्यान पाठीमागून वार करणाऱ्या एका मोगल सरदारावर राणा प्रतापांनी मोठ्या शिताफीने तलवारीचा प्रतीवार करत, त्या सरदाराचं मुंडकं अन् त्याच्या घोड्याचं मुंडकं एकाच वेळी धडापासून वेगळं होऊन रणभूमीवर पडलं. यावरून हे सिद्ध होतं की,राणा प्रतापा़ंच्या तलवारीच्या एका वारमध्ये किती मोठी शक्ती होती. ते खऱ्या अर्थाने बाहुबली होते, हे सिध्दीस येते.
शतकानुशतके भारतीयांच्या हृदयात मानाचं स्थान स्थापित करणाऱ्या महाराणा प्रताप यांनी एक शपथ घेतली होती की, मी बाप्पा रावल यांचा वंशज...माझ्या मातृभूमीला शत्रूपासून मुक्त केल्याशिवाय मी महलात राहणार नाही. सोन्या-चांदीच्या ताटात भोजन करणार नाही. राजमहलामधील शयनगृहात झोपणार नाही.तर वृक्षांची छाया हाच माझा महाल, गवत हाच माझा बिछाना अन् झाडांची पानं हीच माझी भोजनाची भांडी राहतील महत्वाचे म्हणजे राणा प्रतापांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व कोणाच्याही मनाला भावणारं होतं. धिप्पाड शरीरयष्टी (७ फूट उंची तर वजन १२० किलो), श्वेतवर्ण, भेदक डोळे, लांब मिश्या, पिळदार भुजा अन् निधडी छाती अशी त्यांची बलदंड देहयष्टी होती. युद्धाच्या वेळी त्यांच्या अंगावर चिलखत तसेच भाला, तलवार(दोन) या युद्ध साहित्याचे वजन सुमारे २०८ किलो असायचे. यावरून त्यांच्या शारीरिक बळाचा अंदाज येतो. दोन तलवारी बाळगण्याचे कारण म्हणजे एक स्वतःसाठी अन् दुसरी निहत्यारी शत्रुसाठी असायची. म्हणजेच शत्रूकडे जर मुकाबला करण्यास तलवार नसेल, तर त्यावर हल्ला न करता, आधी त्याला तलवार द्यायची अन् नंतर त्याच्याशी युद्ध करायचं, हा त्यांचा क्षत्रिय बाणा होता अन् यालाच खऱ्या अर्थानं शौर्यवान योद्धा म्हणतात.
युद्धभूमीवरील राणा प्रतापांचे असे अवाढव्य अन् भारदस्त रूप पाहिल्याने अकबर बादशहाने आपल्या आख्या जीवनात कधीही राणा प्रतापांसमोर युद्ध करण्याचे धाडस केलं नाही. तथापि त्यांच्या जागी अकबर बादशाह हे नेहमी मोगल सरदार राजे मानसिंह किंवा पुत्र सलीम (जहांगीर) यांना युद्धभूमीवर महाराणासमोर उभे करत असतं. मात्र स्वतः त्यांनी कधीच महाराणांसमोर थेट युद्ध करण्याचं तयारी दर्शवली नाही. यावरून हे सिद्ध होते की, अकबर बादशहाच्या मनात राणा प्रतापांबद्दल केवढं मोठं भय होतं. हा तर खरा करिश्मा होता राणा प्रतापांच्या युद्धकौशल्याचा! या पार्श्वभूमीवरच त्यांना साहसी अन् अपराजित राजा म्हटलं जातं.
हळदीघाटाच्या युद्धात राणा प्रतापचे अंगरक्षक हकीमखां सूर आणि जालौरचा ताजखां या मुस्लिम सरदारांनी तर, चूनावत कृष्ण दास, झाला मानसिंह, झाला बिजा, राणा पुंजा भिल, भीमसिंह रावत सांगा, रामदास, भामाशाह ताराचंद, रामशाह व त्यांचे सुपुत्र शालिवाहन, भगवानसिंह, प्रतापसिंह आदी शूरवीर योद्ध्यांनी मोलाची कामगिरी केली.
दरम्यान राणा भामा शाह यांनी राणा प्रतापांना पडतीच्या काळात सैन्य दलाची नव्याने उभारणी करण्यासाठी अन् राष्ट्र रक्षणार्थ आपली संपूर्ण धनसंपत्ती अर्पण केली. यावरून भामाशाहचे औदार्य अन् निस्सीम राष्ट्रप्रेम दृष्टोत्पत्तीस येते. यास्तव त्यांना आम्ही भारतीय दंडवत प्रणाम करतो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महाराणा प्रतापांचा धारदार भाला,राजपुतांची तळपती तलवार आणि वनवासी सैनिकांच्या तीरकामट्यांच्या वर्षावाने मोगल सैनिकांची दाणादाण उडाली. खरं तर, राणा प्रतापांना त्यांच्या संक्रमण काळात वनवासी समाजाने निष्ठापूर्वक भक्कम पाठबळ दिलं, याची इतिहासात नोंद घेतली गेली. यासाठीच मेवाडच्या राजचिन्हावर राजपूत सैनिक आणि वनवासी सैनिकाची प्रतिमा कोरून दोन्ही समाजातल्या बंधुत्वाचं प्रतिक दर्शवलं, याला मेवाड-चितोडचा इतिहास साक्षीदार आहे.
हळदीघाट व अन्य युद्धांमध्ये संपादन केलेल्या विजयात राणा प्रताप यांच्या चेतक अश्वाचा मोलाचा वाटा राहिला. रणांगणावर संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्या धन्याचे प्राण वाचविणाऱ्या चेतकची स्वामिनिष्ठा अतुलनीय व अवर्णनीय आहे. म्हणूनच राणा प्रताप हे चेतकला आपल्या गळ्याचे ताईत मानत असत. स्वतः जखमी अवस्थेत असूनही चेतकने २० मीटर लांबीच्या नाल्यावरून छलांग मारून धन्याचे प्राण वाचविण्याची महान कामगिरी केली अन् आपली जबाबदारी पूर्ण केल्यावर चेतकने आपले प्राण सोडले. त्यानंतर कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी चेतकचे जारोळ येथे स्मृतीस्मारक उभारले. चेतकची धन्याबद्दलची अपार निष्ठा, निस्सीम भक्ती अन् त्याच्या असामान्य पराक्रमाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.
"अकबराचं मांडलिकत्व पत्करलेल्या गद्दार मानसिंगच्या सोबत पंगतीत कोणीही मेवाडच्या नागरिकानं बसू नये, असे फर्मानच राणा प्रतापांनी काढले होते. गद्दार व विश्वासघातकी माणसांबद्दल राणा प्रतापांना भयंकर चिड होती, हे यावरून प्रकर्षाने दिसते.याउलट एक मुका प्राणी असूनही चेतक अश्वाने आपली निष्ठा, प्रेम व पराक्रम दाखवत धन्याचे प्राण वाचवून आपलं बलिदान दिलं. वास्तवात यालाच आपल्या धन्याच्या प्रती खरी निष्ठा म्हणतात.
राणा प्रताप यांना स्त्रियांबद्दल नितांत आदरभाव होता.युद्धामध्ये ताब्यात घेतलेल्या शत्रूपक्षाच्या माता-भगिनींना त्यांनी सन्मानपूर्वक त्यांच्या राज्यात परत पोहोचविले.स्त्रीसन्मान ह्या भारतीय परंपरेचा त्यांनी अखेरपर्यंत मान राखला.मेवाडचे महाराजा महाराणा प्रताप आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उज्ज्वल कारकीर्दीत स्त्री मग ती राज्यातली असो वा परराज्यातली, तिचा यथेच्छ सन्मान व्हायचा. तिला मातेसमान दर्जा असायचा. यास्तव या द्वय महायोद्ध्यांना त्रिवार मानाचा मुजरा! जय शिव राणा!
मेवाडचे महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेबद्दल माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाला नेहरू आपल्या भारताचा शोध या कादंबरीत म्हणतात,राणा प्रताप हे संकटाचे स्वागत करणारे योद्धे होते.म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर वीरांची पूजा होत राहील, तोपर्यंत राणा प्रतापांचं चिरस्मरण लोकांना राष्ट्रप्रेम व देशाभिमानाचे धडे देत राहील. ”मोडेल पण वाकणार नाही” हा बाणा जीवनभर जपून, राणा प्रतापांनी अकबराचे मांडलिकत्व पत्करलंच नाही. अकबराने अर्ध राज्य देण्याचं आमिष दाखवूनही महाराणा हे आपल्या ध्येयापासून तसूभरही विचलित झाले नाहीत.वास्तवात यालाच म्हणतात, खरा आत्मसन्मान अन् राष्ट्राभिमान!
दरम्यान महाराणा प्रताप हे एके दिवशी शिकारीला गेले असता दुर्दैवाने घोड्यावरून पडून जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली. परिणामीस्वरूप त्यांचे ९ जानेवारी १५९७ रोजी चावंड येथे दुःखद निधन झालं अन् भारतमाता एका राष्ट्रप्रेमी शुर योद्ध्याला कायमची मुकली. राणा प्रतापच्या निधनाची खबर जेव्हा अकबर बादशहाच्या कानी पडली. त्या क्षणीच ते ताडकन सिंहासनावरून उठले अन् निःशब्द होऊन उभे राहिले. त्या दुःखद घडीला त्यांचे डोळे पाणावले होते. अकबर बादशहा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, मेवाडचा राजा महाराणा प्रताप हा अपराजित राजा होता. तो आयुष्यात कोणापुढे झुकला नाही. अशा शुरवीर योद्ध्याला मी सलाम करतो. ज्याच्या शौर्यगाथेची मित्रच काय...शत्रूनेदेखील प्रशंसा केली, अशा महापराक्रमी क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांना आम्ही भारतीय त्रिवार वंदन करतो.जय राजपुताना! जय महाराष्ट्र! -राणा रणवीरसिंह राजपूत