कोळंबी शेती : खाऱ्या पाण्यातला सुवर्णमार्ग
कोळंबीच्या शेतीमुळे तीच जमीन वर्षभर उपयोगात येऊ शकणार आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेतीकडून मत वळवून एक्वा शेतीकडे येत आहेत. त्यासाठी शासकीय योजनांचा उपयोग करून तलाव खोदणे, प्रशिक्षण घेणे, आणि अनुदान मिळवणे शक्य झाले आहे. अर्थात कोळंबी शेती फायदेशीर असली, तरी ती नुसत्या उत्साहावर चालत नाही. पाण्याचं योग्य व्यवस्थापन, रोगराईपासून संरक्षण, योग्य आहार आणि वेळेवर निरीक्षण आवश्यक आहे. चुकीचं व्यवस्थापन केल्यास मोठा तोटाही होऊ शकतो.
पारंपरिक शेतीचा खर्च वाढतोय, पावसावर अवलंबून राहण्याचा धोका आहे आणि शेतीतला नफा कमी झालाय.. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात एक नवा प्रयोग यशस्वी ठरत आहे. तो म्हणजे कोळंबी शेती. खाऱ्या पाण्याचा उपयोग करत कोकणातील शेतकरी आता कोळंबीच्या रूपानं नवा आर्थिक पर्याय शोधत आहेत.
अपृष्ठवंशीय प्राणी वर्गातील आणि बाह्यकवच असणारा हा जीव. कोळंबीच्या तोंडाकडील भाग हा बाहुबलीच्या मुकूटासारखाच भासतो. त्यावरच रत्न जडवल्यासारखे दोन डोळे असतात. हे रत्नासारखे डोळे अंधारातही चमकतात. कोळंबीला दोन लांबलचक मिशा म्हणजेच अँटेना असतात. त्यांना आपण ‘मिश-अँटेना' म्हणूयात. यातील एका मिश-अँटेनाच्या साह्याने सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर दुसऱ्या अँंटेनाच्या साह्याने भक्ष्याचा अंदाज घेतला जातो. तोंडाच्या जवळच हातासारख्या अवयवांच्या तीन जोड्या असतात. आपले भक्ष्य पकडण्यासाठी ते हात वापरले जातात. कात्री वेगाने चालवल्यानंतर जसा आवाज निर्माण होतो तसाच आवाज हे प्राणी आपल्या हातांची वेगाने हालचाल करून निर्माण करतात. (थोडक्यात कोळंबीच्या जगात एका हातानेही टाळी वाजू शकते.) या आवाजाचा वापर ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात असे मानले जाते. आतून शांत वाटणाऱ्या समुद्रात आपल्या हस्तकलेने मोठा ध्वनी निर्माण करण्याची ही कला अनोखीच म्हणावी लागेल.
या हातांना लागूनच शेपटाकडील दिशेला पायांच्या पाच जोड्या असतात. पाण्यातील तसेच चिखलावरील हालचालींसाठी त्यांचा वापर होतो. असे असले तरी पोटावरचे ‘फाईव्ह पॅक' स्नायू आणि शेपूट यांच्या साह्याने झटका देऊन हालचाल करणे हे या जीवांचे खरे वैशिष्ट्य. याच झटक्याचा वापर करून त्यांना पाण्यातील अंतर वेगाने कापता येते. खाडीकिनाऱ्याचा दलदलयुक्त भाग, कांदळवने, सागर किनारे आणि खारजमिनीवरील शेतांमध्येही करपाल आढळते. सामान्यतः कोळंबी प्रजातीतील जीव समूहाने राहतात, परंतु नैसर्गिक क्षेत्रांतील करपालींची संख्या कमी असल्याने इथे हा समूह काहीसा लहान असू शकतो. पाण्याची योग्य क्षारता आणि वाढीसाठी आवश्यक तापमान असलेल्या या जागा त्यांना पोषक ठरतात. मिश्रहारी असलेला हा जीव सभोवताली उपलब्ध असेलेले सूक्ष्म वनस्पतीजन्य-प्राणीजन्य पदार्थ सेवन करतो. त्याच्यापेक्षा लहान सजीवांना तो आपले अन्न बनवू शकतो आणि मोठ्या भक्षकांचे अन्नही बनू शकतो. पुनरूत्पादन प्रक्रीयेत मिलनानंतर मादी करपाल आपली अंडी किनाऱ्यापासून जवळच्या भागांतच सोडते. या अंड्यांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पाच ते दहा लाखापर्यंत असू शकते. ही प्रक्रीया मिलनानंतर अतिशय वेगाने म्हणजे केवळ बारा ते पंधरा तासांत घडते. किनारी भागातील जैवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही या जीवाच्या बाबतीत मात्र बरी स्थिती आहे. कोळंबीचे काही भाईबंद तर आपल्या परिसंस्थेत स्वच्छता अभियान चालवत असल्यासारखे राहतात. विशिष्ट मासे हे स्वच्छता केंद्र शोधत येतात. केंद्राजवळ येऊन शांतपणे पहुडतात. लगेचच सफाईकामगार कोळंब्या त्या माशाच्या तोंडातील अन्नकण, सूक्ष्मजीव यांचा फडशा पाडतात. या समन्वयातून कोळंबीला अन्न मिळते, तर माशांच्या तोंडाची स्वच्छता होते. शरीरांतर्गत हाडे (काटे) नसलेल्या या जीवाचे मत्स्य व्यवसायामध्ये सध्या सव्रााधिक उत्पादन होत आहे. (पहा, बिनकण्याने आणि कायम वाकून राहील्याचे फायदे!).
अन्न म्हणून विचार केल्यास करपाल जातीच्या कोळंबीमध्ये खूप कमी उष्मांक असतात. याऊलट प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर या प्रजातींमध्ये सेलेनियम आणि काही अँटीऑक्सिडंटस् असतात, ज्यामुळे कर्करोगाच्या निर्मितीस कारणीभूत असणाऱ्या मुक्त कणांपासून बचावही होतो. या अलिकडच्या ज्ञात कारणांमुळेच कोळंबी शेतीकडे सर्वांचेच लक्ष गेले आहे. नवी मुंबई, रायगड परिसरामध्ये खाऱ्या पाण्याच्या दलदली, भातखाचरं आणि समुद्रकिनाऱ्यालगतची जमीन पूर्वी निष्क्रिय होती. पण आता त्याच जागा कोळंबी संगोपनासाठी वापरल्या जात आहेत. कोळंबी शेती ही अल्पकालीन, कमी श्रमात जास्त उत्पादन देणारी, आणि सध्या निर्यातक्षम अशी शेती आहे. ही एक्वा-कल्चरची शाखा आहे. या पद्धतीत खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात कोळंबीचे पिलं सोडली जातात. त्यांचं संगोपन केलं जातं. पाण्याचं तापमान, मीठाचं प्रमाण, ऑक्सिजन यावर नियंत्रण ठेवावं लागतं. आज भारतात प्रामुख्यानं व्हॅनामी जातीची कोळंबी मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाते. तीन ते चार महिन्यांच्या आत कोळंबी विक्रीस तयार होते. बाजारात दर चांगले मिळतात. निर्यातक्षम दर्जा असेल तर देशाबाहेर पाठवण्याची संधीही मिळते. त्यामुळे शेतीपेक्षा हा व्यवसाय अनेक पटीनं फायदेशीर ठरतो.
पूर्वी खारेपाटात केवळ भाताची एक हंगामी पिकं घेतली जायची. पण आता कोळंबीच्या शेतीमुळे तीच जमीन वर्षभर उपयोगात येऊ शकणार आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेतीकडून मत वळवून एक्वा शेतीकडे येत आहेत. त्यासाठी शासकीय योजनांचा उपयोग करून तलाव खोदणे, प्रशिक्षण घेणे, आणि अनुदान मिळवणे शक्य झाले आहे. अर्थात कोळंबी शेती फायदेशीर असली, तरी ती नुसत्या उत्साहावर चालत नाही. पाण्याचं योग्य व्यवस्थापन, रोगराईपासून संरक्षण, योग्य आहार आणि वेळेवर निरीक्षण आवश्यक आहे. चुकीचं व्यवस्थापन केल्यास मोठा तोटाही होऊ शकतो. म्हणून या शेतीला व्यवसायिक दृष्टिकोन, प्रशिक्षण आणि तांत्रिक मदतीची जोड लागते. कोकणातल्या तरुणांना गावातच राहून व्यवसाय करण्याची संधी या शेतीमुळे मिळू शकते. थोडक्यात काय, तर कोळंबी शेती म्हणजे खाऱ्या पाण्यातून निर्माण झालेला सोन्याचा मार्ग. योग्य नियोजन, शिक्षण आणि शासनाच्या मदतीने ही शेती ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक पुनरुज्जीवनात मोलाची भूमिका बजावू शकते. - तुषार म्हात्रे