हरीभक्त तो शक्त कामास मारी
नामाच्या संगतीने भय तर नाहीसे होतेच शिवाय साधकाच्या आंतरिक शक्तीत मोठी वाढ होते. त्याच्याकडेमुळातच असलेली परमशक्ती जागृत होते. तेजस्वी होते. त्यामुळे त्याचा मनोनिग्रह ठाम होतो. आता तो कामनांना बळी पडत नाही.
मुखी राम त्या काम बाधू शकेना।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना।
हरीभक्त तो शक्त कामास मारी।
जगी धन्य तो मारूती ब्रह्मचारी । श्रीराम ८७।
मुखात रामनाम असेल तर मनाला विश्रांतीचा अनुभव येतो. शोक नाहीसा होऊन नित्य आनंदाचा अनुभव येतो. हे कसे साध्य होते ते समर्थ ह्या श्लोकांत सांगत आहेत. नित्य नामस्मरणात दंग असणाऱ्याला कोणतीही कामना बाधत नाही. खरे तर हे हवे, ते नको अशी काहीही कामना त्याच्या मनात उत्पन्नच होत नाही. रामनामाची गोडी लागली म्हणजे "सर्व रामाची इच्छा” असे मानून साधक सतत आनंदात राहतो. "ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान” ही त्याची भुमिका असते. या समाधानाचे रहस्य असे की रामनामाच्या योगाने साधकाला विलक्षण धैर्य प्राप्त होते. ‘गुणे इष्ट धारिष्ट चुकेना याचा अर्थ नामाच्या पाठबळाने आवश्यक ते धाडस, हिंमत हमखास प्राप्त होते. साधकाच्या अंगी त्याला विशिष्ट प्रसंगी हवे असलेले धैर्य उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाही. नामाच्या संगतीने भय तर नाहीसे होतेच; शिवाय साधकाच्या आंतरिक शक्तीत मोठी वाढ होते. त्याच्याकडे मुळातच असलेली परमशक्ती जागृत होते. तेजस्वी होते. त्यामुळे त्याचा मनोनिग्रह ठाम होतो. आता तो कामनांना बळी पडत नाही.
गरज आणि सुखलोलुपता यातील फरक तो जाणतो. विषयांचा उपभोग तो गरजेपुरता आणि प्रारब्ध संपविण्यासाठी घेतो. त्यात लिप्त होत नाही. सुखाच्या अनुभवात रमून रहात नाही किंवा दुःखाच्या अनुभवाने शोकग्रस्त होत नाही. आयुष्यातील सुख-दुःखाकडे तो जीवन यज्ञातील समिधा या दृष्टीने पाहतो. "इदं न मम” म्हणून सुख-दुःख दोन्हीही भगवंताला समर्पित करून मोकळा होतो. अनेक प्रकारच्या कामनांमध्ये कामवासना सर्वात बलवानमानली गेली आहे. कामपूर्तीसाठी माणसाची अवस्था ‘न भयं न लज्जा अशी होते. पण जो मनुष्य हरिनामाच्या आधाराने राहतो तो बलाढ्य कामाला जिंकू शकतो. भगवंताच्या संगतीत राहणाऱ्याला आपोआप वैराग्य प्राप्ती होते. भगवंताची आवड निर्माण झाली की सहजच विषयांची नावड उत्पन्न होते. प्रारब्धाने जे विषयभोग समोर येतात ते गरजेपुरतेच भोगणे, त्यात आसक्त न होणे, हे साधकाचे लक्षण आहे. जो नामाचा अभ्यास करतो त्याला इंद्रियांना आवरण्याचे मानसिक बल प्राप्त होते. इथे समर्थ ‘जितेंद्रियम मारूतीचे उदाहरण देत आहेत. रामभक्त हनुमान एक तर रामकार्यात व्यस्त असतात नाही तर रामनामात तल्लीन असतात. त्यांच्या मनात रामाशिवाय अन्य कोणत्याही विचाराला थारा नाही. रामाशिवाय कोणतीही कामना नाही. राम हेच त्यांचे जीवन आहे. कसलीच अभिलाषा नसल्याने ते कधीच लाचार किंवा दैन्यवाणे होत नाहीत. रामनाम घेत ते अखंड समाधानात राहतात. मात्र रामाचे कार्य करण्यासाठी त्यांच्यापुढे हात जोडून एका पायावर तत्पर असतात. नाम घेतात म्हणून आपले विहित कर्तव्य ते कधीच टाळत नाहीत.
नैष्ठिक ब्रह्मचारी असलेले मारूतीराय स्त्री-पुरूष-प्राणी-पक्षी-फळे-फुले सगळ्यांकडे ”राम” ह्या एकाच दृष्टीने पाहतात. रामाशिवाय अन्य काही पदार्थ त्यांना दिसत नाहीत. हनुमंताची ही विलक्षण भक्तीच त्यांच्या विलक्षण शक्तीचा स्त्रोत आहे. जो आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करतो त्याचा सर्व भार भगवंत घेतो. आपली अमर्याद शक्ती शरणागत, पण प्रयत्नशील भक्ताच्या पाठीशी उभी करतो. मारूतीराय हे शक्ती-भक्ती-युक्ती-विरक्ती यांचे अत्युत्तम आदर्श आहेत. तोच आदर्श ठेवून, त्या दिशेने वाटचाल करून आपणही मारूती प्रमाणे आपले जीवन धन्य करून घ्यावे हे समर्थांचे सांगणे आहे. समर्थ कधीही प्रचितीविना बोलत नाहीत. क्रियेवीण वाचाळता त्यांना मान्यच नाही. रामभक्तीतून प्राप्त होणाऱ्या रामशक्तीचा ,रामानंदाचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला. ते स्वतःही पूर्ण वैराग्यवान रामदास आहेत. त्यांचे जीवनही रामकार्यात समर्पित होते. स्वानुभवी महापुरुष जे बोलतात ते लोकांच्या कल्याणासाठी आणि कल्याणकारकतेच बोलतात. म्हणूनच सर्व संदेह सोडून त्यांचे ऐकावे. नित्य भगवंताचे स्मरण करत रहावे. आणि नरदेहाचे सार्थक करून धन्य व्हावे.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर