अक्षय तृतीया : दानाला सन्मान देणारा सण

उत्सवाइतकेच सत्पात्री दान हा या सणाचा आत्मा आहे, या दिवशी पाणपोया,घातल्या जातात, अन्नदान, जलदान केले जाते. हे दान, अक्षय तृतीयेचे हे दान, पुण्य अक्षय राहते असा समज आहे. ओंजळभर धान्याच्या दानाने अन्नाची कोठारे रिकामी होत नाहीत, उलटपक्षी आजीच्या प्यालाभर दूधाच्या दानाने  शंकराच्या मंदिराचा गाभारा भरतो असे आपला धर्म सांगतो.     

       अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुध्द तृतीया होय. उन्हाळा दाहक असला तरीही निसर्गाचे चैत्रांगण यावेळी वेगळ्या प्रकारे तत्कालीन फुलांनी आमरायांनी बहरलेली असते. हा शुभ मुहूर्त, साडेतीन मुहुर्तातला एक असल्यामुळे  शुभ कार्यासाठी या दिवसाची आपण वर्षभर नेहमीच वाट बघत असतो. जमिन पलॅट खरेदीसाठी, सोने, हिरे जवाहरात दागिने खरेदी, नववस्त्रखरेदी, नवी सुरुवात नवसंकल्प, सुसंवाद यासाठी हा उत्कृष्ट दिवस आहे.

नेमेची येतो सण, नेमेची होतो सोहळा,
असे काही सणांबद्दल म्हतले जाते, पण या सणाबद्दल असे कधीही म्हटले जात नाही व जाणार नाही.

झपूर्झा पोरी झपूर्झा
या सणाला झपूर्झा पोरी झपूर्झा, जा पोरी जा, पुढे जा, असे भूतकाळ मागे टाकुन भविष्याकडे जा असा संदेश देणारे भौतिक आणि अध्यात्मिक मिश्र स्वरुप असते. शुभ खरेदी इतकेच, या सणाला पित्तरांच्या स्मरणार्थ पूजा तर्पण करणे, अभावाचे जीवन जगणाऱ्यांना सत्पात्री दान करणे, अशा तीन मिती या अक्षयतृतियेत आहेत. धन, अन्न, जल किंवा अन्य अतिरिक्त वस्तुंचे दान करणे, जुन्या न लागणाऱ्या वस्तु देवुन नव्या खरेदीचा मुहुर्त करणे, चैत्रपालवीचे स्वागत करणे अपेक्षित आहे. पानगळ होवुन झाडे नव्या कोवळ्या पालविला जागा करुन देतात, तसे मानवाने, जुने मागे टाकुन, भुतकाळ मागे सोडुन, नव्याचे स्वागत करायचे असते. काळ मोठा द्रष्टा असतो, आपले पुर्वज जाणते होते, साचलेपण सोडुन नव्या चैतन्याकडे जाण्यासाठी त्यांनी या सणाचे प्रायोजन केले आहे. जुने टाकायची ईच्छा कधीच होत नसते, संग्रह वाढतच असतो, त्यामुळे, अतिरिक्त देण्याला सणाचा आधार देवुन दान ही कल्पना त्यांनी संतोष धन मानावे असे सांगुन, दानाची महति मांडली.

चैत्रांगण
हा सण जरी वैषाखात येत असला तरीही सजलेले चैत्रांगण ही या सणाची खास ओळख असते. या दिवसांत वैशाख वणव्याने पृथ्वी होरपळत असते, सर्व सजीवांच्या , शरीरातील पाणी कमी होवुन पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या,मानवाच्या जीवाची काहिली होत असते. स्नेहभोजन, वसंतोत्सव साजरा करुन तनमन शांतवण्याचा तो धर्माचा, त्यांचा सणमार्ग होता.
उन्हाळ्याने शरीरे शुष्क झाली असतांना, अंगणात पाणी शिंपडुन, आमराईत,वातावरण निर्मिति करुन एकत्र जमले असता उन्हाळा सुसह्य होवु शकतो हे त्यांनी जाणले. कौतुक सोहळ्याला गर्दी होवु शकते म्हणुनच वसंतोत्सव आयोजित केले जाऊ लागले. उत्सवात या सणाला, चैत्रांगणात, आंबेडाळ, पन्हे, श्रीखंड, चंदन यांची रेलचेल आरोग्यासाठी आवश्यक असते. अक्षय तृतीयेला हळदीकुंकु कार्यक्रम त्यामुळेच योजिले आहेत.

चैत्रांगण, म्हणजे चैत्र गौरीपुजानापासुन सजलेले ते अंगण होय.सडा टाकुन, पाण्याने थंड केलेल्या अंगणात, तुळशी वृंदावनाभोवती सजावट केली जाते. मोठी रांगोळी काढली जाते. ही रांगोळी खास पारंपरिक असते. शुभचिन्हांची रचना, कमळ, पाने, फुले, मानवी आकृती, घर, शंख अशी प्रतीके या रांगोळीत असतात. त्या मातीच्या जलकुंभांभोवती सतरंज्या अंथरुन बसायची व्यवस्था असते. वाळ्याने सुवासिक केलेले पाणी उदकपात्रांत भरलेले असते. चैत्र पाडव्याला स्थापन केलेल्या चैत्र गौरीचे पूजेचे उद्यापन या तिसऱ्या  तीजेला केले जाते.

चैत्रांगणातील तृतीया

अक्षयतृतीयेला चेेत्रांगणात जमलेल्या स्नेह्यांना भिजवलेले हरभरे, कैरी डाळ, पन्हे, चंदन, पंखा, जलकुंभ तलम वस्त्र अशा वस्तुंचे दान केले जाते, तनमनाला थंडावा लाभावा, हाच हेतू त्यात असतो. वसंतऋतुचे स्वागत, गौरीपुजन, दान, पारंपरिक पध्दतीचे पालन हा मूळ हेतु ठेवुन, हल्ली आधुनिक बदल कार्यक्रमात केले जातात, मात्र अक्षय तृतीयेचा उत्साह कमी होत नाही.
तोषोनि द्यावे पसायदान

उत्सवाइतकेच सत्पात्री दान हा या सणाचा आत्मा आहे, या दिवशी पाणपोया,घातल्या जातात, अन्नदान, जलदान केले जाते. हे दान, अक्षय तृतीयेचे हे दान, पुण्य अक्षय राहते असा समज आहे. ओंजळभर धान्याच्या दानाने अन्नाची कोठारे रिकामी होत नाहीत, उलटपक्षी आजीच्या प्यालाभर दूधाच्या दानाने  शंकराच्या मंदिराचा गाभारा भरतो असे आपला धर्म सांगतो.

आज सकल जणांमध्ये संवाद व्हावा, समाजातील आहे रे गटाने, नाहीरे गटाला काहीतरी सत्पात्री दान करुन, मुख्य प्रवाहात येण्यासाठी हात द्यावा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी हे ओंजळभर दान मी मागत आहे,

भूता परस्परे घडो मैत्र जीवाचे, अशी आपण सारे प्रार्थना करु या
हा होईल दानपसावो,
येणे वरे, ज्ञानदेवो सुखिया झाला
असे सर्वजण या अक्षय तृतीयेला अक्षय सुखी होवु या.  
 -शुभांगी पासेबंद 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अक्षय तृतीया अर्थात आखाजी आणि दंतकथा