रावणमाड : किनारी भागात उत्पन्नाची संधी
भारतात ‘रावणमाड' म्हणून संबोधला जाणारा वृक्ष आहे ‘इंडियन डूम पाम'. या दुर्मिळ प्रजातीचे नाव ‘हायफीन इंडिका' (Hyphaene Indica). भारतातील ही प्रजाती डॉ.बक्कारी यांनी १९०८ मध्ये शोधून प्रकाशित केली. यासाठी त्यांनी दिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका पोर्तुगीज वसाहतीतील नमुन्यांची नोंद केली. पालघर जिल्ह्यातील ‘शिरगांव भुईकोट किल्ल्याला अगदी लागूनच हे लक्षवेधी रावणमाड दिसून येतात. या सुप्रसिद्ध जागेसह अलिबागमधील नागांव, पालघरमधील डहाणू व दिव-दमण येथील समुद्रकिनारी रावणमाड पाहता येतो.
‘थौत' ही प्राचीन इजिप्तमधील चंद्राशी संबंधित असणारी लेखन, कला व जादूची देवता. इजिप्शियन चित्रांमध्ये हा देव आयबिस नावाच्या लांब चोचीच्या पक्षीरुपात किंवा बबून माकडाच्या रूपात दर्शाविला जातो. यापैकी पवित्र प्राणी मानला गेलेला बबून एका विशिष्ट तालवृक्षाची फळे खात असल्याचा व त्याच झाडाच्या माथ्यावर वस्ती करत असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा तालवृक्ष थौतचा विशेष वृक्ष झाला. मिस्त्र प्रांतातील या वृक्षाशी साम्य असलेले काही मोजके वृक्ष दिव, दमण व पालघरच्या किनारपट्टीलगत आढळून आले आहेत. आपल्या समाजजीवनात रामायण-महाभारत या महाकाव्यांचा मोठा प्रभाव असल्याने, आपल्या देशातील या वृक्षांच्या विशिष्ट रचनेचा संबंध रामायणाशी जोडून त्यांना ‘रावणमाड' किंवा ‘रावणताड' असे संबोधन लाभले आहे. पुरातन कथांची आठवण करून देणारे हे दोन वेगळ्या प्रदेशांतील समानधर्मी तालवृक्ष. संस्कृत ग्रंथांमध्ये ‘ताल' ही संज्ञा ताड, माड, खजूर, सुपारी यांसारख्या झाडांना वापरलेली आढळते. तर इंग्रजीमध्ये त्यांना ‘पाम ट्री' म्हटले जाते. आपण ज्या पाम वृक्षाविषयी चर्चा करतोय त्याचे नाव ‘डूम पाम' (Doum Palm). मूळचा इजिप्तमधील असल्याने तो ‘र्इाजिप्शियन डूम पाम' म्हणून ओळखला जातो. त्याचे शास्त्रीय नाव हायफीन थीबैका (Hyphaene thebaica). तर भारतात ‘रावणमाड' म्हणून संबोधला जाणारा वृक्ष आहे ‘इंडियन डूम पाम'. या दुर्मिळ प्रजातीचे नाव ‘हायफीन इंडिका' (Hyphaene Indica). भारतातील ही प्रजाती डॉ.बक्कारी यांनी १९०८ मध्ये शोधून प्रकाशित केली. यासाठी त्यांनी दिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका पोर्तुगीज वसाहतीतील नमुन्यांची नोंद केली. सध्याच्या काळात हा दुर्मिळ वृक्ष पहायची योग्य जागा म्हणजे पालघर जिल्ह्यातील ‘शिरगांव किल्ला. या भुईकोट किल्ल्याला अगदी लागूनच हे लक्षवेधी रावणमाड दिसून येतात. या सुप्रसिद्ध जागेसह अलिबागमधील नागांव, पालघरमधील डहाणू व दिव-दमण येथील समुद्रकिनारी रावणमाड पाहता येतो.
सामान्यतः नारळ, सुपारी, ताड, खजूर यांसारखे वृक्ष सरळ दिशेने वाढताना दिसतात. परंतु ‘डूम पाम' मात्र दोन शाखांमध्ये विभाजीत होत जातो. या नव्या शाखांना पुन्हा दोन फाटे फुटत राहतात. झाडांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहिल्यावर एका धडावर अनेक डोके असलेल्या रावणाची आठवण होते, यातूनच या वृक्षाला स्थानिक भागात ‘रावणमाड' असे नाव चिकटले आहे. मूळचा रुक्ष व उच्च तापमानात वाढणारा हा वृक्ष पावसाळी वनातील दमट व ओलसर प्रदेशात चांगला फोफावतो. नवीन लागवड बियांनी करता येते. रेतीयुक्त ओलसर चिकण माती व दमट हवा त्याला मानवते. वीस वर्षांच्या कालावधीत तो तीस फुटापर्यंत उंच होतो. या वृक्षाची पाने मोठी, पंख्यासारखी असून फांद्यांच्या टोकांना दाटीवाटीने येतात. व्यावसायिकदृष्ट्या एक उत्पन्नाचे साधन म्हणून या वृक्षाकडे पाहता येता येते. कणसासारख्या दिसणाऱ्या त्याच्या लांब फुलोऱ्यावर लहान पिवळी फुले येतात. याच फुलांपासून चमकदार, पिंगट रंगाची अंडाकृती फळे तयार होतात. फळांमध्ये रसाळ व गोड गर असतो. या फळाचे आवरण तंतुमय व मांसल असते. त्याची चवही गोड असते. आफ्रिकेत फळांचा हा मांसल भाग कुटून पोळ्यांमध्ये घालतात. तसेच मिठाईमध्येही हा भाग वापरला जातो. फळाच्या याच भागाला उकळून काकवी व सरबत करता येते. तर कच्ची फळे कुटून तृणधान्याऐवजी खातात. खोडापासून साबुदाण्यासारखा पदार्थ मिळवता येतो. शेंड्यावरच्या कळ्या व जमिनीखालचा रोपाचा भागही खाद्य असून उंटांना त्याची कोवळी पाने खायला देतात. इतर ताडफळांप्रमाणेच हे फळ लघवी साफ करणारे व कृमिनाशक असते. त्याच्या बिया कुटून जखमांवर बांधून उपचार केले जातात. कातडी वस्तू तयार करताना त्यांना काळा रंग येण्यासाठी डूम पामची पिकलेली फळे इतर काही पदार्थाबरोबर वापरतात. करवंटीपासून कड्या, माळा, तपकिरीच्या डब्या यांसारख्या वस्तू बनवितात. फळाच्या आतील कठीण भागांपासून बटणे, अत्तराच्या डब्या, सुया व कातीव वस्तू करतात. नारळाप्रमाणेच या वृक्षाच्या पानांपासून छपरे, चटया, हॅट, टोपल्या, दोर, तंबू तयार करता येतात. त्याचबरोबर कागदाचा लगदा करण्याकरतादेखील त्याची पाने वापरतात. पानांतील धाग्यापासून दोर व मासेमारीची जाळी बनवितात. त्याचे लाकूड बळकट, घन व जड असते. इतर देशांत त्यापासून खांब, तुळ्या, दरवाजे, लहान होड्या बनवल्या जातात. परंतु भारतात हा वृक्ष अल्पसंख्य असल्याने त्याची वृक्षतोड होत नाही. त्यामुळे त्याच्या प्राप्त लाकडापासून सजावटी सामान, घरगुती भांडी इत्यादींसाठी मात्र उपयोग केला जातो.
युद्धामध्ये रावणाची मुंडकी कित्येकदा छाटूनही तो मरत नव्हता. पण आपल्या रावणमाडाला असे काही वरदान नाही. त्यामुळे त्याच्या फांद्या न छाटलेल्याच बऱ्या. या वृक्षाचे थौत या जादूच्या इजिप्शियन देवतेशी नाव जोडले गेलेय खरे, पण मनुष्याच्या अविचारी कृत्यापुढे त्याचा काहीही उपयोग नाही. या वृक्षाचे महत्त्व व दुर्मिळता ओळखून स्थानिकांद्वारे त्याचे रक्षण केले जात आहे. आता किनारी भागातील व्यवसायाची नवी दिशा ओळखून या वृक्षांच्या संख्येत वाढ करण्याकडे लक्ष द्यायला हवे. - तुषार म्हात्रे