पुस्तके म्हणजे ज्ञानाचा चिरंतन  ठेवा

आज २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन..आजच्याच दिवशी पॅरिस येथे युनेस्को तर्फे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचा निर्णय झाला. २३ एप्रिल हाच दिवस जगातिक पुस्तक व कॉपी राईट दिन साजरा करण्याचे एक उद्दिष्ट होते. जागतिक ब्रिटिश लेखक  शेक्सपिअर, तसेच मिगुएल सर्व टीस तसेच गार्सिलोसो यांचा २३ एप्रिल हा मृत्यू दिन. यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

या वर्षीचे पुस्तक दिनाचे घोषवाक्य आहे तुमच्या पद्धतीने वाचा खरेतर पुस्तके ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्यातून आपणास नवीन प्रेरणा मिळते. माणसाला सुसंस्कृत करण्यात पुस्तकांची भूमिका फार मोठी आहे. पुस्तकाने माणसाची दृष्टी  उंचावते. वाचनाने ज्ञान प्राप्ती तर होतेच; याशिवाय विचारांची दालनेसुद्धा खुली होतात. आपण कसे जगावे हे पुस्तकाकडून आपण शिकू शकतो. या दृष्टीने सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व मोठे आहे. वैयक्तिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसे खर्चिक पुस्तके खरेदी करू शकत नाहीत. त्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये हा मोठा पर्याय आहे. अनेक शहरात अशी ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रात तर अनेक ग्रंथालयांनी आपली शंभरीसुद्धा ओलांडली आहे.

पालकांनी मुलांना लहानपणापासून पुस्तकांची आवड निर्माण करावयास  हवी. लहान असताना त्यांना प्राणी, पक्षी यांच्या गोष्टी फार आवडतात. त्यातून त्यांचे सामान्य ज्ञान व चौकस बुद्धी वाढीस लागते. थोरांची चरित्रे वाचल्यास त्यांचे मोठेपण आपणास कळून येते. अनेक शाळांमध्ये सुद्धा ग्रंथालये आहेत. त्याचा वापर मुलांनी केला पाहिजे. या दृष्टीने शिक्षकांची भूमिका मोठी आहे. त्यांनी मुलांना वाचनाची गोडी लावावयास हवी. अलीकडे  मुलांच्या हातात मोबाईल नेहमी असतो. त्यामुळे त्यांचे पुस्तकाकडे दुर्लक्ष होते. भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तक संग्रह मोठा होता. अनेक पदव्या मिळवून प्रसिद्ध झालेले श्रीकांत जिचकार यांचासुद्धा पुस्तक संग्रह प्रचंड होता. भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण  यांनासुद्धा पुस्तकांचे  वेड होते. त्यांच्या पुस्तक संग्रहात अनेक पुस्तके होती. नवीन पुस्तक प्रकाशित झाले कि ते राजकारणाच्या धावपळीत सुद्धा ते वाचून काढीत. काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात भिलार येथे सरकारने पुस्तकांचे गाव स्थापना केले आहे. हे आवर्जून पाहावे व पुस्तकांची आवड जोपासावी. या जगातिक पुस्तक दिवशी लोकांना वाचनाची आवड निर्माण करणे. पुस्तकांचा सन्मान करणे व त्यांची जपणूक करणे ही कामे केली जातात. अलीकडे दूरचित्रवाणी, मोबाईल, टॅब, यासारख्या साधनांनी ज्ञानाचे विश्व बदलले आहे. त्यामुळे मुलांचे व पालकाचे लक्ष पुस्तकाकडे कमी आहे कि काय अशी शंका वाटू लागली आहे. पण ते खरे नाही. आजही अनेक साहित्य संमेलनात लाखो रुपयांची पुस्तके खपतात. अनेक वाचक मुलांना पुस्तके घेऊन देतात. अनेक उन्हाळी सुट्टीत अनेक वर्गात पुस्तकांचे महत्व मुलांना सांगितले जाते. एकूणच ग्रंथ चळवळ फोफावली पाहिजे व त्याचे फायदे सर्वापर्यत पोहचेल पाहिजेत असे झाले तरच हा जागतिक दिन खऱ्या अर्थाने साजरा केला असे होईल - शांताराम वाघ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाचन संस्कृती टिकवायलाच हवी