मानवतावादी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज पृथ्वीचे वय हे साधारणतः ५ कोटी वर्षे आहे, ह्या कालावधीत अब्जावधी माणसं जन्माला आली आणि निघून गेली; परंतु असे फार काही निवडक महामानव आहेत त्यांचे नाव अजूनही अजरामर आहेत. त्यापैकी एक नाव मोठ्या अभिमानाने भारतीयाचे आहे ते म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (सपकाळ). त्यांच्यामुळे विश्वात आपल्या देशाला काही वेगळीच ओळख पटलेली आहे.
चांगल्या राज्यघटनेबाबत विश्वात प्रथम क्रमांकावर नावं निघतं ते म्हणजे आपल्या भारत देशाचं आणि साहजिकच लगेच नाव निघतं ते म्हणजे हे महान घटनाकार कोण? तर ते म्हणजे भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशात महू या गावी रामजी सपकाळ यांच्या पोटी भीमराव जन्माला आले. तो काळ पारतंत्र्याचा काळ होता व आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. १८९३ साली रामजी सपकाळ सैन्यातून निवृत्त झाले. तेव्हा भीमराव केवळ दोन वर्षाचे होते. भीमराव केवळ सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. अस्पृश्य असल्यामुळे भीमाला शाळेत इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं बसवलं जात असे. त्यांच्या स्पर्शाने पाणी अशुद्ध होईल असं मानलं जात होतं. शाळेचा शिपाई नळाची तोटी फिरवेपर्यंत भीमाला वाट पाहत थांबावं लागायचं आणि शिपाई जवळपास नसेल तर तहान न भागवताच भीमाला माघारी जावं लागत असे.एकदा सार्वजनिक नळावर भीमा शांतपणे पाणी पिताना दिसल ेतेव्हा स्वतःच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना मारहाणसुद्धा झाली होती. इतकी मानखंडना भीमरावांना शाळेत सहन करावी लागत होती.
कसा काय वाटेल हा समाज, हा देश त्याचा आहे जो पावलोपावली त्याचा अपमान करतो. हे सर्व प्रश्न जेव्हा भीमराव आई, वडील व नातेवाईकांना विचारत तेव्हा ते सुद्धा निरुत्तर होत व भीमराव हे गोंधळलेल्याच परिस्थितीत राहत. पण भीमरावांनी शिक्षणाची कास सोडली नाही. ते थांबले नाहीव उच्च विद्याविभूषित झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न घाबरणारे, स्पष्ट वक्ते व राष्ट्रभक्त होते. ते इंग्रजांनासुद्धा घाबरत नसत. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीन गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते तेव्हा इंग्रजांची चांगलीच भंबेरी उडाली होती व ते निरुत्तर झाले होते. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं आणि देशाची राज्यघटना कोण तयार करणार? तर सर्वानुमते व सर्वात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नावं पुढे आलं. ह्याला कारण अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल अभ्यास, हुशारी, कुशाग्र बुद्धिमत्ता व त्यांच्या अंगी असलेली मानवता हीच होती. त्यांची नेहमी कणव ही कामगार, शेतकऱ्यांच्या व स्त्रियांच्या बाजूनेच होती. त्यांना नेहमी वाटायचे की सरकार हे कामगारांचे असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहितांना त्यांचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस होता. त्याची प्रगती व्हावी हाच उदात्त हेतू होता. सामाजिक, आर्थिक व राजकीय हे न्यायाचे तीन अत्यावश्यक घटक उद्देशिकेत नमूद केले आहेत. हे तिन्ही घटक परस्पर संबंधित आहेत. त्यांचा मूलभूत आशय समान आहे. राज्यघटनेत मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची व सुरक्षेची योग्य ती काळजी घ्ोतली आहे. घटनेत जसे आपल्याला अधिकार प्राप्त झाले आहेत तसेच कर्तव्येसुद्धा पार पाडावयाची आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार पुरुष आणि स्त्रियांना समान व एकाच वेळी दिला गेला आहे. ह्यासाठी कुठलाही संघर्ष करावा लागला नाही हे खूप मोठी देणं आपल्याला राज्यघटनेने दिले आहे. स्त्रियांना विशेष अधिकार देऊन त्यांच्या उन्नतीसाठी हिंदू कोड बिलाद्वारे डॉ. बाबासाहेबांनी जोरदार प्रयत्न केला होता; परंतु तो इतरांनी पाठिंबा न दिल्यामुळे तेव्हा ते शक्य झाले नाही, पण मग त्याचेच १८ कायदे करून आज स्त्रिया स्वाभिमानाने व ताठ मानेने समाजात उभ्या आहेत व प्रगती करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येते की त्यांचे जीवन हे खूपच कष्टमय होते. ते विद्वान होते, बुद्धिमान सुद्धा होते परंतु त्यांना पावलो पावली अपमान सहन करावा लागला. ते एव्हढे हुशार वदूरदृष्टी असलेले नेते असून निवडणुकीतून निवडून येण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. खऱ्या देशभक्ताप्रमाणे त्यांनी देशाच्या नागरिकांसाठीचे हित साधून घटनेमध्ये सव्रााधिकार मिळवून दिले. कधीही बदल्याची भावना त्यांच्याकडे नव्हती. त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान अतुलनीय आहे. जेव्हा सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर पेचप्रसंग आला होता तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शी तत्वांचा आधार घेऊन तो गंभीर प्रश्न सोडविण्यात आला होता. भारतीय लोकांना डॉ.आंबेडकरांनी इतकं भरभरून काही दिले की अजून आपल्याला त्यांची पूर्ण जाणीवसुद्धा झालेली नाही.महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. - अरविंद मोरे