डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व्यवस्थापन
आज बेसुमार वृक्षतोड होत आहे, याचा परिणाम पर्जन्यमानावर होत असताना घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ, ‘सिंंबॉल ऑफ नॉलेज ते अर्थतज्ञ व जलतज्ञ परमपूज्य बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आठवण होते. डॉ. आंबेडकरांनी जलव्यवस्थापनाला केवळ पाणी व्यवस्थापनापुरते मय्राादित न ठेवता, ते देशाच्या आर्थिक विकासासाठी किती आवश्यक असल्याचे सांगितलेले आहे. त्यांनी मांडलेल्या जलविद्युत योजनेनुसार दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुंड धरण आणि सोन नदी प्रकल्प यांसारखे प्रकल्प उभारल्यामुळे पुराच्या पाण्याचा विनियोग तर केला गेला, शिवाय जलविद्युत निर्मितीला चालना मिळाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्रपणे अभिवादन! आज एका बातमीच्या शिर्षकाने माझे लक्ष वेधले. शिर्षक होते, अखेर नियतीने ट्रिगर खेचला.यावरून आपणास काहीही अंदाज करता येणार नाही. पण हे सत्य आहे की, दक्षिण आफ्रिकेची राजधानी, केपटाऊन हे जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज कार्य करीत स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश सरकारमध्येव स्वातंत्र्यानंतर संसदेत केलेल्या कामांची माहिती आपल्याला आहे. तुम्हाला ज्ञात असेल की, डॉ.बाबासाहेब हे फक्त एकांगी व्यक्तिमत्व नव्हते तर, ते चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. ते बॅरिस्टर होते; ते अर्थतज्ञ होते; ते समाजशास्त्र, मानववंश शास्त्रज्ञ व राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. ते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या प्रत्येक समाजातील लोकांसाठी स्फुल्लिंग पेटवणारे द्रष्टे नेते होते व त्याहीपेक्षा ते एक महान जलतज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. आजही त्यांची जलनीती अभ्यासली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खूप संघर्षानंतर १९४२ साली ब्रिटिश विधिमंडळात कामकरण्याची संधी मिळाली. २० जुलै, १९४२ रोजी डॉ. बाबासाहेबांनी मजूर मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा, त्यांच्याकडे श्रम, सिंचन व वीज हे तीन विभाग सोपवण्यात आले होते. १९३५ च्या कायद्यानुसार त्यांच्याकडे असलेल्या श्रम विभागाने सिंचन आणि वीज विकासासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी काय्रान्वित करण्याचे ठरवले. त्यामध्ये एकापेक्षा दोन राज्यांत वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे, राज्यांमधील नद्यांवरपाणी व जल विद्युत उर्जा संपत्ती निश्चित करणे आणि शासकीय व तांत्रिक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सिंचन धोरण काय असावे ई. गोष्टींचा समावेश केला. कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, ही डॉ. बाबासाहेबांची धारणा होती याधोरणाला अनुसरून त्यांनी दामोदर खोरे प्रकल्पाला केवळ पूरनियंत्रणासाठी नव्हे, तर जलविद्युत निर्मिती, सिंचन आणि जलवाहतुकीसाठीही महत्त्वाचे मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही अभियंता नव्हते; पण ते एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. म्हणून त्यांनी १९४२ ते १९४६ या पाच वर्षाच्या काळात जलनीती तयार केली, जी की, भारत देशासाठी दिशादर्शक ठरली. त्यांच्या जलनीती व्यवस्थापनावर दृष्टीक्षेप टाकल्यास आपल्याला त्यांचे कार्य अधिक सुलभ रीतीने कळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जलव्यवस्थापनाला केवळ पाणी व्यवस्थापनापुरते मय्राादित न ठेवता, ते देशाच्या आर्थिक विकासासाठी किती आवश्यक असल्याचे सांगितलेले आहे. डॉ. बाबासाहेबांनी मांडलेल्या जलविद्युत योजनेनुसार दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुंड धरण आणि सोन नदी प्रकल्प यांसारखे प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे पुराच्या पाण्याचा विनियोग तर केला गेला, शिवाय जलविद्युत निर्मितीला चालना मिळाली. डॉ. बाबासाहेबांना नेहमी वाटायचे की, पुराचे पाणी समुद्रात जाता कामा नये. ते साठवले गेले पाहिजे व ते उपयुक्त ठरले पाहिजे. नोव्हेंबर १९४५ मध्ये कटक येथे झालेल्या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अत्यंत मौलिक विचार देशाला दिले होते. ‘पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत, असे गृहीत धरुन सुचवू नका. देशामध्ये एवढे पाणी उपलब्धच नाही की, जे हानिकारक ठरु शकेल. भारतीय जनतेला पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त कष्ट सोसावे लागतात, जास्त पाण्याच्या उपलब्धतेमुळे नाही. पाणी राष्ट्रीय संपदा असल्यामुळे आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण असमतोल आणि अविश्वासार्ह असल्यामुळे पुराच्या जास्त पाण्याविषयी तक्रार करण्यापेक्षा या पुराच्या पाण्याचा मनुष्याच्या विकासासाठी धरणे बांधून कसा उपयोग करता येईल, हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. त्यासाठी जेथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते त्या नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणेच इष्ट ठरेल,' असे विचार त्यांनी मांडले होते. त्यांनी नदीजोड योजनेची कल्पना मांडली, ज्यामुळे विविध नद्यांमधील पाण्याचा योग्य वापर करता येईल. हिराकुंड धरणाचे महत्त्व ओळखून त्यांनी त्या धोरणावर भर दिला. त्यांनी जलविद्युत निर्मितीला महत्त्व देऊन, त्यातून ऊर्जा निर्मिती आणि विकासाला चालना देण्याची कल्पना मांडली. सिंचन योजनांद्वारे शेतीला पाणी उपलब्ध करून देणे आणि शेती विकासाला मदत करणे, यावर त्यांनी भर दिला. जलवाहतुकीला महत्त्व देऊन, त्यांनी जलमार्गाचा वापर वाहतुकीसाठी आणि विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार केला. त्यांनी एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन कसे करावे, यावरही भर दिला.
आजही त्यांची जल नीती व्यवस्थापन आपल्याला चांगली शिकवण उपयुक्त ठरत आहे. सर्वांना ज्ञात आहे की, जगातील ७३.३ टक्के पाणी समुद्रात आहे व फक्त २. ७ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. आपण दुसऱ्या देशांच्या मानाने खूप पाण्यासाठी गर्भश्रीमंत आहोत. तरीही आपण पाण्याचे नियोजन केलेच पाहिजे. नजीकच्या काळात सर्व धरणांतील पाणीपातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे आपणासही सावध राहायला पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवायला पाहिजे. ‘पाण्याची बचत करूया' ह्या नाऱ्याद्वारे समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीनिमित्त अभिवादन असेल. म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर नाही, तर डोक्यात घेण्यासाठी आहेत. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे