नकोसे जन्मदाते?

  मुलगी जन्माला येणे हे काही प्रतिगामी, अप्रगत, अल्पशिक्षित समाजांत आपत्ती मानले जात असल्याचे ऐकून आहोत. तिला ‘नकोशी' समजण्याचा प्रघात आहे म्हणे! आता लठ्ठ पगाराची नोकरी, पैसा, आरामदायी आयुष्य, डामडौलाची जीवनशैली, मनासारखी भटकंती, हव्या त्या प्रकारच्या मित्र-मैत्रीणींची निवड, रात्री अपरात्री बाहेर हिंडणे या साऱ्यात जन्मदाते, म्हातारे आई-वडील कुठेच बसत नाहीत. कारण ते या साऱ्याला हरकत घेणार, ओरडणार, नाराजी व्यक्त करणार! ‘त्यापेक्षा ते घरात नकोतच', अशी भूमिका अनेक घरांमधील कर्त्या पिढीकडून घेतली जात आहे काय?

    गेल्या वर्षी विख्यात निर्मात्या सौ. कांचन अधिकारी यांच्या ‘जन्मऋण' या चित्रपटाच्या आगमनापूर्वी त्यांनी आयोजित केलेल्या निवडक पत्रकारांसोबतच्या वार्तालापास हजर राहुन संवाद साधण्याचा योग आला होता. चित्रपटाच्या संगीतकार वैशाली सामंत, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी व स्वतः सौ. कांचन अधिकारी अशा साऱ्यांशीच चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलता आले. अलिकडचे युग असे अवतरले आहे की मातापित्यांच्या एकेकाळच्या परिश्रमांची जाण, कदर, कृतज्ञता त्यांच्या मुलाबाळांना असतेच असे नाही. अशातलाच एक मुलगा त्याच्या आईवडिलांना विमानतळावर एकाकी सोडुन निघुन जातो व मग त्यांची काय अवस्था होते, अशा प्रकारचे ते कथानक होते. हे हल्ली जिकडे तिकडे पाहायला मिळत आहे. कुणी विमानतळावर जन्मदात्यांना सोडुन जातो, कुणी रेल्वे स्थानकात, तर कुणी एस.टी. बस स्थानकात. कधी कधी तर थेट वृध्दाश्रमात किंवा अनाथाश्रमातही! ‘जन्मऋण'ची कथा, गीत, संगीत, अभिनय सारेच उजवे होते. दुदैवाने चित्रपटाला हवे तसे व्यावसायिक यश मिळाले नाही. पण म्हणून म्हातारपणी जन्मदात्यांना टाकुन देणाऱ्या दिवट्या मुलामुलींच्या गैरवर्तनाचे गांभीर्य अजिबात घटत नाही.

   ज्यांना लाडाकोडात वाढवले त्यांनीच जन्मदात्यांची त्यांच्या उतारवयात हेळसांड करणे हे नवे नाही, अनेक वर्षांपासून हे होत आले आहे. मृत्यू पावलेल्या आईबद्दल तिचा लेक समाजमाध्यमांवर ढीगभर मजकुर लिहून तिच्या पश्चात आता आपले आयुष्य कसे पोरके, एकाकी झाले अशा पोस्टी टाकील; पण आता विभक्त, विकेंद्रीत, शहरी, निमशहरी, तथाकथित आधुनिक जीवनशैलीत आईवडीलांना त्यांच्या नशिबावर एकटे सोडुन देण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत. ‘आम्ही दोघं राजा राणी', ‘आम्ही दोघं आमचे दोन किंवा एकच', ‘डबल इन्कम नो किड्‌स' या प्रकारच्या युगात अनेक सुनांना म्हातारे लोक घरात नको असतात; तिच्यापुढे बैल बनलेला मुलगा आपल्या आईवडीलांना सरळसरळ ऑप्शनला टाकायला मागेपुढे पाहात नाही.  बऱ्याचदा लग्नाळू  मुली लग्नाच्या वेळच्या त्यांच्या अटी-शर्तींमध्येच ‘सासू-सासरे नकोत' हा मुद्दा टाकून ठेवतात.  याला अनेकांनी उत्तर देताना  ‘..मग त्यापेक्षा अनाथ मुलाशीच लग्न करा' असा सल्ला दिल्याचे मी अनेकदा ऐकले आहे. काही मुली त्याही पुढे जाऊन ‘माझ्या वैवाहिक जीवनात हे दोन डस्ट बिन्स (म्हणजे सासू-सासरे!) नकोत' असेही म्हणत असल्याची वदंता आहे. लठ्ठ पगाराची नोकरी, पैसा, आरामदायी आयुष्य, डामडौलाची जीवनशैली, मनासारखी भटकंती, हवे त्या प्रकारच्या मित्र-मैत्रीणींची निवड, रात्री अपरात्री बाहेर हिंडणे या साऱ्यात ही म्हातारी माणसे कुठेच बसत नाहीत. कारण ते स्वैराचाराला हरकत घेणार, ओरडणार, टोकणार, नाराजी व्यक्त करणार! ‘त्यापेक्षा ते घरात नकोतच', अशी भूमिका त्यामुळे घेतली जात आहे की काय?

   मला आठवते... एके काळी मोठ्ठे कुटुंब एकत्रपणे वास्तव्य करीत असे. त्यात आजी-आजोबा, क्वचित प्रसंगी पणजी-पणजोबा, आत्या, काका-काकी, आतेभावंडे, चुलत भावंडे यांचा राबता असे. प्रसंगी अशा घरात एखादी व्यवती अंध, अपंग, वेडसर वगैरे प्रकारची जन्माला आलीच तर तिचा सर्वजण सांभाळ करीत असत. मामाकडे जाऊन कधीही राहता येत असे. एखाद्या सासुरवाशीणीला तरुणपणीच वैधव्य आले तर माहेरचे लोक तिचा सांभाळ करायला पुढे येत. स्वतःच्या मुलांसह भावाच्या, बहिणीच्या मुलांसाठीही खाऊ, कपडे, दागिने करताना हौसेने घरातले जाणते पुरुष, महिला आघाडीवर असत. घरातील कुणाचेही आजारपण, वृध्दावस्था ही कुणालाही आपत्ती, संकट, ताप, कटकट, पनवती, वैताग वाटत नसे. सेवेसाठी सारेजण झटत. घरातील कुणा ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झालेच तर त्या व्यवतीच्या मुलग्यांसह, भाऊ, भाचवंडे, नातवंडे, पुतणे, पणतू ह्या साऱ्यांना डोक्याचा चमनगोटा करवून घेताना अजिबातच काही वाटत नसे. ...पण लोक पैशांच्या मागे लागले, शिकू लागले, करिअरिस्ट बनू लागले, लठ्ठ पॅकेजच्या नोकऱ्यांकडे आकर्षित होऊ लागले, आपल्या त्याच त्या प्रेमळ आई-वडील आजी-आजोबा, काका-मामा यांच्या शिकवणुकीच्या, संस्कारांच्या, त्यागाच्या जोरावर परदेशी जाऊ लागले आणि मग अलगदच आपल्याच लोकांना, आपल्या गावाला, आपल्या मातृभूमीला  विसरु लागले. तिकडच्या तिकडे परदेशात घर घेऊ लागले, तिकडच्या तिकडेच आपापला जीवनसाथी निवडून ‘दोनाचे चार हात'  करुन घेऊ लागले. ...आणि  आपल्याकडील कौटुंबिक पर्यावरणाला या आर्थिक आणि विदेशी प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण होऊ लागला. एखाद्या जोडप्याचे दोन्ही दिवटे मुलगे परदेशात असतील तर मोठा धाकट्याला सांगतो...‘वडील वारले तेंव्हा मी गेलो होतो इंडियात..आता आई आजारी आहे. आपण भरपूर पैसे देऊन केअर टेकर ठेवले आहेत खरे; पण आईचे काही बरेवाईट झालेच तर यावेळी तू जा. मला लिव्ह मिळणार नाही.' पूर्वी हे केवळ अभिजन कुटुंबांमधून होत असल्याचे पाहायला मिळत असे. पण आता या प्रकारचे प्रसंग बहुजन कुटुंबांमधूनही वारंवार दिसू लागले आहेत. कारण आता कुणीही उठतो आणि परदेशाकडे सुटतो. शिक्षण, प्रशिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा अनेक कारणांनी अन्य देशांत जाणे सोप्पे झाले आहे आणि तिकडेच स्थिरस्थावर होणेही फार साधारण बनले आहे.  

   वेगवेगळ्या महानगरांमधून राहणाऱ्या..पण परदेशात वास्तव्य करत असणारी  मुले-मुली-सुना-जावई असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या राहत्या घरांबाबत मागे एक रिपोर्ट प्रसिध्द झाला होता. त्यानुसार या एकाकी ज्येष्ठ जोडप्यांची उतारवयातील दारुण अवस्था वर्णिली होती.  या ज्येष्ठांपैकी अनेकांच्या मालमत्तांवर त्यांच्याच नातेवाईकांचा डोळा असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. चोर, भामटे, उचले, डाकू, दरोडेखोर, कुरिअरवाले-पार्सलवाल्यांच्या रुपाने त्यांच्या घरी फेरी मारणाऱ्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांचे लक्ष अशा एकट्या पडलेल्या गलितगात्र, थकलेल्या लोकांवर असते. संधी मिळताच त्यांना लुबाडण्याचे, मारहाण करण्याचे प्रसंग घडत असतात. मुंबईत आजही अशी एकाकी बनलेली अनेक पारशी जोडपी आढळतील. वंशशुध्दीच्या भ्रामक समजुतीच्या आहारी जाऊन पारशांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह टाळायचे प्रयत्न केले होते. त्यातून ते आणखीच ‘अल्पसंख्य 'होत गेले व त्यांची पुढची पिढी परदेशात गेल्यावर ‘एकाकी!' आता या अशा एकाकी पारशांच्या जोडीला सर्वच धर्माचे लोक जाऊन बसले आहेत की काय, अशी भयाण स्थिती आहे. कारण वृध्द जोडप्यांत एकमेकांची साथ तरी असते. पण दोघांमधले कुणी एक गेले तर? अशांना त्यांचा मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू बघेलच याचा काहीच नेम नसतो. ‘नटसम्राट' नाटकात वि.वा.शिरवाडकरांनी अशा मुजोर पुढच्या पिढीचे वास्तव आणि दारुण चित्र उभे केले आहे. ‘नातू, नात म्हणजे दुधावरची साय' म्हणून जपणाऱ्या, लाड करणाऱ्या, आपले वय-आजारपण विसरुन त्यांचे कोडकौतुक करत शाळेत ने-आण करणाऱ्या आजी-आजोबांप्रति अलिकडच्या नातवंडांची मोठे-कमावते झाल्यानंतर काय मानसिकता असते? गेले काही दिवस समाजमाध्यमांवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात वृध्द जोडप्याचा दिवटा मुलगा भररस्त्यात आपल्या मातापित्यांना मोटारसायकलवरुन ढकलून उतरवतो व त्यांचे सामान रस्त्यात भर वाहतुकीत फेकून देतो असा तो व्हीडिओ आहे. त्या दिवट्याच्या मुला-मुलींनी आपल्या आजी-आजोबांसाठी टाहो फोडला असेल...की ‘बरे झाले ब्याद गेली' म्हणून ते गप्प बसले असतील?

   वृध्द आजी-आजोबा, माता-पिता, शिक्षक, शेजारी, ज्येष्ठ नातेवाईक ओरडले, काही समजवायला गेले तर त्यांच्यावर घरातील अल्पवयीन नातवंडांनी चाकूहल्ला केला, काठीने झोडपून काढले अशा प्रकारच्या बातम्या वाचायला, पाहायला मिळण्याचे दिवस आता आले आहेत. ‘गावच्या आजीला, काकाला-काकूला भेटायला जाऊ या' म्हणत गावी जाणारी अनेक मुले तिथे जाऊन पु्‌न्हा मोबाईलमध्येच घुसलेली व गावचे ते नातेवाईक मात्र मुकाट्याने त्यांच्याकडे मजबूरी म्हणून पाहताहेत असे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ...आणि तरीही गावची हिच माणसे म्हणतात की या शहरी ‘मुलांचं लग्न बघण्याची इच्छा आहे, त्यांच्या  साखरपुडे-हळदी-लग्नात सारं काम करण्याची इच्छा आहे.. ते एकदा पाहिलं की आम्ही डोळे मिटायला मोकळे!' तरुणाईच्या वृध्दांप्रतिच्या काही आक्षेपार्ह, नकोशा, तुटक वर्तनालाही सुखद अपवाद म्हणून आजकालच्या नव्या पिढीतील अनेक शिलेदारही आपल्या मागील पिढीच्या आजारपणाची, त्यांच्या सुखकर वृध्दावस्थेची, त्यांच्या मानसिकतेची योग्य ती काळजी घेऊन काही व्यवस्था करु पाहतात. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून नियोजन करुन आपल्या लोकांना भेटतात, त्यांना हवं नको ते पाहतात. प्रसंगी केवळ ज्येष्ठांना बरं वाटावं म्हणून स्वतःला मान्य नसलेल्या काही गोष्टी करायलाही तयार होतात. तेंव्हा वाटतं की सगळंच काही संपलेलं नाही.

   याबाबत तुमचं निरीक्षण काय सांगतं?

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै.आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे - महात्मा ज्योतिराव फुले