ज्यांचे त्यांचे उच्च व सर्वोच्च न्यायालय

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयी पारदर्शक पद्धत कोणती असावी म्हणजे सध्या अस्तित्त्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीत सुधारणा घडवून आणावी की त्याच्या जागी नवीन पद्धत आणावी याविषयी चर्चा सुरू आहे. हेतू एकच आणि ते म्हणजे पारदर्शक न्याय मिळण्याची अपेक्षा आणि सुदृढ लोकशाहीसाठी ते अतिशय आवश्यक आहे. अशाच एका जनतेच्या न्यायालयात, अशिक्षित लोकांकडून सुशिक्षित न्याय मिळण्याची सत्यकथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे.

प्रथम त्या न्यायापूर्वीची पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे, तर ती याप्रमाणे. पाच दशकांहून अधिक काळ झाला ती घटना घडून. मी नुकतीच वयाची विशी पार केली होती. त्यावेळी मी माझ्या कुटुंबासमवेत पनवेल कोळीवाड्यात रहात होतो. वडिलांची पनवेलमधील कोळीवाड्यातील शाळेत बदली झाल्यामुळे पनवेलला राहायला आलो होतो. वडिलांनी कोळीवाड्यात शाळेची स्वतंत्र इमारत व्हावी म्हणून तेथील समाजसुधारक स्व. चांगा पदा भोईर यांना सोबत घेऊन तीन-चार ठिकाणी शाळेचे वर्ग भरायचे ती कोळीवाडा शाळा अशा स्वतंत्र इमारतीत भरावी म्हणून तीन-चार वर्षे सतत प्रयत्न करून आणि त्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केले आणि शासकीय मंजूरी मिळवून कोळीवाड्यात स्वतंत्र विद्येचे मंदिर तयार झाले. कोळी समाजातील जास्तीत जास्त मुलांनी शिकावे आणि पिढीजात व्यसनापासून म्हणजे दारू पिण्यापासून दूर रहाव हा त्यामागचा निःस्वार्थी हेतू आणि या माझ्या वडिलांच्या सामाजिक सेवेमुळे संपूर्ण कोळीवाड्यात कडू गुरूजी म्हणून माझ्या वडिलांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. तर ही आहे घटनेपूर्वीची पार्श्वभूमी. आता घटनेकडे वळतो.

    मी ज्या घटनेबद्दल सांगणार आहे ती घडली माझा मित्र दत्ता कोळीच्या बाबतीत, दत्ता कोळी म्हणजे मी वर उल्लेख केलेले समाजसुधारक स्व.चांगा पदा भोईर यांचा पुतण्या ज्यांनी त्यानंतरच्या काळात स्वनिर्मितीने कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबईत गाजवला तो एवढा की आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरेंनीही कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर मारली होती. कोळी हे आडनाव तो आवडीने लावतो. ही घटना घडण्यापूर्वीच दत्ताच्या या काकांचं दुर्दैवाने निधन झालं होतं. त्याकाळी पनवेल नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तलावात मच्छीमारी करण्यासाठी वार्षिक कालावधीसाठी लिलाव होत असे आणि कोळीवाड्यात कोळी पंच मंडळ सोडून कुणीही निदान आपल्या कोळी समाजातील व्यक्तीनी लिलावात भाग घ्यायचा नाही असं ठरवलं होतं. त्यात माझ्या या मित्रानी कोळीवाडा मच्छीमार सहकारी सोसायटीतर्फे स्वतंत्रपणे या लिलावात भाग घेतला. त्यामुळे कोळीवाडा पंच मंडळी चिडली आणि त्यांनी दत्तावर सामाजिक बंदी आणली म्हणजे त्याच्याबरोबर तसेच त्याच्या कुटुंबातील कुणाशीही बोलायचे नाही आणि कसलेही संबंध ठेवायचे नाहीत. त्यामुळे मी त्याचा मित्र म्हणून तो फक्त माझ्या घरीच येऊ शकत होता आणि त्यामध्ये एक विशेष म्हणजे दत्ता रहात होता कोळीवाड्याच्या एका टोकाला म्हणजे  उत्तर दिशेला तर मी रहात होतो ते कोळीवाड्याच्या दक्षिण दिशेला. मी ज्या इमारतीत रहात होतो त्याच्या पुढे एकही कोळी घर नव्हते तर सिंधी समाजाची सात-आठ घरं  होती. दत्ता घरून निघाला की थेट माझ्याकडे यायचा आणि यायला एकच मार्ग तोही पूर्ण कोळीवाड्यामधून आणि त्यात त्याची चाल म्हणजे एकदम ताठ अगदी मान वर करून. त्यामुळे कोळीवाड्यातील पुरुषवर्ग आणि पंच मंडळी खूप भडकली. त्यांनी बघितले की तो माझ्या घरी येतो मग पंच मंडळीने तिथल्या देवीच्या देवळात मीटिंग ठेवली आणि त्या मीटिंगच्या दोन दिवस आधी मला कळवून मीटिंगला हजर राहण्यास सांगितले. मला एक व्यक्ती निरोप घेऊन आली आणि सांगितले की ‘देवीच्या देवळात न्याय आहे आणि रात्री आठ वाजता तुला बोलविले आहे.' मी म्हणालो, ‘ठीक आहे, येईन मी.' माझ्या वडिलांना चिंता वाटायला लागली, ते म्हणाले ‘प्रमोद, तुझ्याबरोबर मीपण मीटिंगला येईन, तू एकटा जाऊ नकोस, ते पंचवीस-तीस जण असणार आणि त्यात बहुतेक प्यायलेले असणार!' पण मी वडिलांना म्हणालो, ‘नाही आप्पा, तुम्ही येऊ नका, मी सांभाळून घेईन.' वडिलांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.

मी त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे मीटिंगला ( त्यांच्या भाषेत न्यायासाठी ) हजर झालो. ‘ये प्रमोद, ये.' कोळी जनतेच्या न्यायालयात माझे असे स्वागत झाले आणि मग त्यांच्या प्रश्नांना सुरुवात झाली ती अशी, (त्यांच्याच भाषेत ) ‘प्रमोद, तू जरी आमच्या कोली समाजाचा नाही तरी आम्ही तुला आमचा समजतो. तुझ्या वडिलांनी आमच्या कोळीवाड्यासाठी खूप केलंय, तू आणि तुझा सगळा कुटुंब आमच्या कोळीवाड्यातल्या सगळ्या सण समारंभ, उत्सवांमध्ये भाग घेता म्हणून आम्ही तुला मानतो, बरोबर आहे की नाही?' याच्यावर मी म्हणालो, ‘बरोबर आहे. म्हणून आम्ही तुला आमच्या मीटिंगला बोलावून घेतले.' मी म्हणालो, ‘मी तुमचा आभारी आहे'. याच्यावर चौघे-पाच जण एकदम जोरात बोलले, ‘मग आम्ही दत्तावर बंदी घातली, आमचा कोळीवाड्यातील एकही माणूस त्याच्याशी बोलत नाही, त्याच्या घरी जात नाही, सगळ्या आमच्या लोकांनी त्याच्याशी संबंध तोडले, पण तो तुझ्या घरी येतो, अगदी मान वर करून, तू कशाला त्याला घरात घेतो?' याच्यावर मी देवळातील देवीला हात जोडले आणि म्हणालो ‘मला सांगा, दत्तावर तुम्ही बंदी आणली त्याच्यासाठी याच देवीच्या देवळात मीटिंग घेतली होती, बरोबर.' त्याच्यावर सगळे जोरजोराने बोलले ‘हो,  हो आम्ही इथेच मीटिंग घेतली.' ‘मग तुम्ही त्या मीटिंगला मला किंवा माझ्या वडिलाना का बोलावलं नाही? मला नाही बोलावलं ठीक आहे; पण माझ्या वडिलांना तरी तुम्ही बोलवायला पाहिजे होतं, तुम्ही माझ्या कुटुंबाला मानता, तुमच्यातले समजता म्हणून विचारतो.'

याच्यावर एकदम शांतता पसरली,  इतका वेळ आरडाओरडा करणारे सर्व ते चाळीस-पन्नास जण शांत झाले,  मी पुढे म्हणालो ‘तेव्हा तुम्ही मला, माझ्या कुटुंबातील कुणालाही बोलावलं नाही.' माझा रामबाण बरोबर लागला होता. त्याच्यावर दोघे-तिघे सोडले तर सर्व माझ्याकडे बघुन बोलले, ‘प्रमोद बोलतो ते बरोबर आहे, आपण त्या मीटिंगला प्रमोदला बोलावलं पाहिजे होतं.' मी मध्येच त्यांची ती माझ्या बाजूने होणारी चर्चा थांबवून पुढे म्हणालो, ‘दत्ता माझ्या घरी येतो, त्यामुळे तुमचं काही नुकसान झाले आहे का? तो माझा मित्र आहे. तो जसा माझ्या घरी येतो तसाच मीसुद्धा आपल्या कोळीवाड्यात ज्यांच्या घरी पूर्वी जात होतो; तसाच दत्तावर बंदी घातल्यानंतरही जातोच आहे.' या माझ्या खुलाशाने नव्वदहून अधिक टक्के जणांचे समाधान झालं होतं. त्यामुळे ते जवळजवळ सर्वच बोलले, ‘प्रमोद तू घरी जा, आम्हाला पटलं तुझी चूक नाही.' असं बोलल्यानंतर मी देवीला आणि जमलेल्या सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो. मनामध्ये आनंद होता. कारण मी त्या दिवशी माझ्या मैत्रीला न्याय मिळवून दिला होता. पण हा जणू काय उच्च न्यायालयाचा न्याय होता, अशीच घटना दुसऱ्या दिवशी सकाळी घडली, कोळीवाड्यातील कोळी स्त्रीयांनी या मीटिंगमध्ये जमलेल्यांची..यात त्यांची पती मंडळी यांची चांगलीच हजेरी घेतली. अगदी त्यांच्या भाषेत सांगायचं तर त्या म्हणाल्या, ‘परमोद भाऊचा काय चुकला, आपल्या सगल्यांची तो काम करतो ते या बापयांना समजत नाय काय'.' हा जणू सुप्रीम कोर्टाचा न्याय होता. मी त्यावेळी रेशन कार्डासाठी अर्ज लिहून देणे,  तो काळ हाती लिखाणाचा होता; त्यामुळे मी त्यांची अर्ज किंवा इतर लिखाणाची कामे करीत असे. काहीही पैसे न घेता, त्याची जाणीव ठेवून समस्त कोळी महिलांनी माझी बाजू उचलून धरली होती. अशिक्षित शिक्षणाने.. पण सुशिक्षित विचारांचा हा त्या महिलांकडून मला न्याय मिळाला होता. कोळीवाडा सोडल्याला मला तीस वर्षे होऊन गेली; पण अजूनही मी अधूनमधून कोळीवाड्यात जातो, आता त्या पंच मंडळीतील कुणीही या जगात नाही.. पण त्या न्यायदानाच्या पंच मंडळीेबरोबर माझे त्यानंतरही चांगले संबंध राहिले. दत्ताही मुंबईत राहायला गेला; मात्र आमची पाच दशकाहून अधिक काळ असलेली मैत्री अजुनही कायम आहे. - प्रमोद कुंदाजी कडू 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चिमणी.....!!