भारतीय एडिसन - डॉ शंकर आबाजी भिसे

शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईत झाला. १८६७ सालापासून यंत्रयुगाला सुरुवात झाली. भिसे हे उपजत शास्त्रज्ञ होते. बालपणीच त्यांचे यंत्रकलेकडे लक्ष होते आणि अल्पवयात शालेय शिक्षण नसूनही त्यांनी जे कलेचे प्रयोग करून दाखवले ते त्यांच्या बुध्दीच्या स्वयंभू मर्मग्राही कुशाग्रतेचे दर्शक ठरतात. मानवी जीवन विविध अंगांनी सुकर, सुगम करणारे शोध लावणाऱ्या शंकर आबाजी भिसे यांचे ७ एप्रिल १९३५ रोजी न्यूयॉर्क येथे निधन झाले.

भिसे घराणे मूळचे मंडणगडचे असले तरी भीमनाथ गोविंद भिसे रायगड जिल्ह्यातील जंजिरा-मुरुड येथे वास्तव्यास होते. आबाजी बळवंतराव भिसे यांचा जन्म १८१८ साली मुरुड येथे झाला. ते शिक्षणासाठी व नोकरीसाठी मुंबईत आले. त्यांना शंकरराव, आत्माराम, मल्हारराव आणि मार्तंडराव हे चार मुलगे आणि बायाजी, धोंडूबाई व वत्सलाबाई अशा तीन मुली होत्या. शाळेतील घोकंपट्टीचा शंकररावांना मनस्वी कंटाळा होता. वडिलांच्या नोकरीत वरचेवर होणाऱ्या बदलीमुळे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होई. या सर्व घडामोडीमुळे शैक्षणिक प्रगती यथातथाच झाली. कल्याण, जळगांव, मुंबई येथे त्यांनी शिक्षण घेतले. मॅट्रिकची परिक्षा पास होऊन नोकरी मिळेपर्यंतच्या काळात भिसे यांनी ऑईल पेंटिंगची व वॉटर कलरची चित्रे काढण्याचा अभ्यास सुरू केला. यात त्यांनी लवकरच प्रावीण्य संपादन केले. त्यांनी शिल्पशास्त्रासंबंधी आणि यंत्रशास्त्रासंबंधी नकाशे काढण्याचा उद्योग सुरू केला.या कार्यात नंतर भिसे यांना आश्चर्यकारक यश लाभून लंडनच्या सोसायटी ऑफ आर्कटिेक्स या संस्थेने त्यांना सोसायटीचे सन्माननीय सभासद करून घेतले. शास्त्रीय विषयाकडे ओढा असल्यामुळे शंकररावांच्या मनात पुण्याला सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा असा विचार होता; परंतु मुलाने वकील होऊन सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. घरगुती मतभेद विकोपाला जाऊन त्यांचे विश्विद्यालयीन शिक्षण घेण्याचे स्वप्न तेथेच विरले. मात्र शास्त्रीय विषयांचा अभ्यास कसोशीने चालूच होता. अपेक्षाभंग झाल्याने स्वतःच्या पायावर उभे रहावे म्हणून शंकररावांनी नोकरी करायचे ठरवले व मुंबईत अकाऊंटंट जनरलच्या कचेरीत १८८८ ते १८९७ पर्यंत नोकरी केली.

वयाच्या दहाव्या वर्षी तारेच्या टोकांना घंटा बांधून आणि अगोदर ठरवून ठेवल्याप्रमाणे त्या घंटेवर ठोके मारून तारेतून बातमी पोहोचविण्याची कल्पना पुरी केली. वयाच्या पंधराव्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुध्द करण्याचे एक उपकरण बनविले. चार दिवे बराच वेळेपर्यंत जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रांवर तयार होत असे. पुढील स्टेशनचे नांव दर्शवणारे स्वयंचलित यंत्र - आगगाडीच्या डब्याला हे यंत्र लावले म्हणजे त्यावरून मागे किती स्टेशने गेली, सांप्रत गाडी कोणत्या स्टेशनात आली आहे, पुढे कोणते स्टेशन येणार आहे आणि तेथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती प्रवाशांना मिळण्याची सोय होणार होती. इंजिन ड्रायव्हर अथवा गार्ड यांच्या मदतीशिवाय आपोआप यंत्र चालावे अशी योजना या यंत्रात होती. या शोधाचे १८९६ साली हिंदुस्थान सरकारकडून पेटंट घेण्यात आले. प्रवासोपयोगी सुरक्षित पेटी या शोधाद्वारे प्रवाशाला आपल्याबरोबर मौल्यवान वस्तू अगदी सुरक्षितपणे नेता येऊन शिवाय झोपण्यासाठी आवश्यक त्या वस्तू त्यात ठेवण्याची सोय होती. या शोधाचे १८९७ साली हिंदुस्तान सरकारकडून पेटंट घेतले.

 पुण्याहून मुंबईस येत असता कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाज्यात चिरडली. असा अपघात टळावा म्हणून शंकररावांनी आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाज्यात मुद्दाम बोट घातले अथवा कोणीही निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. हया दरवाज्याचे तयार केलेले नमुने १८९८ मध्ये मुंबईत भरलेल्या प्रदर्शनात ठेवले होते. त्याला प्रदर्शन समितीकडून बक्षिस मिळाले. पगड्या तयार करण्याचे यंत्र त्यांनी तयार केले. यंत्रामुळे पगड्या हलक्या, मजबूत व टिकाऊ राहून डोक्यास अलगदरित्या बसणाऱ्या अशा तयार होत होत्या. मुख्य फायदे म्हणजे अशी तयार झालेली पगडी थोडक्या खर्चात पुन्हा दुरुस्त करता येत असून किंमत अवघी आठ आण्यापर्यंत पडे.

जाहिरात दाखविणारे यंत्र  -  पुष्कळ जाहिरातीचे एकदम आपोआप प्रदर्शन करणारा दिवा ही युक्ती नवीन होती. यंत्रातील अक्षरे काही सेकंदापर्यंत निरनिराळ्या रंगीबेरंगी व बदलत जाणाऱ्या प्रकाशात दिसत. नंतर थोड्या अवधीत ती जाहिरात बदलून दुसरी जाहिरात दिसण्याची सोय त्यात करण्यात आली होती.अशा जाहिराती आवश्यक तेवढा वेळच दिसत.भिन्न भिन्न रंगात दिसणारी व सजीव प्राण्याप्रमाणे नाचणारी चित्रेही दाखविण्याची योजना या यंत्रात अंतर्भूत होती. केवळ किल्लीने वा विजेच्या साहाय्याने चालणारी अशी दोन्ही प्रकारची रचना या यंत्रात केलेली होती. त्याचा उपयोग रात्री किंवा दिवसा करता येत असे. या यंत्राचा शोध १८९९ च्या दरम्यान लावला.

मलवाहक यंत्र - आपोआप पाण्याचा मोठा प्रवाह पडत शौचकूप साफ व्हावे अशी या यंत्रात रचना होती. हे यंत्र आकाराने लहान असून शौचकूपात आणलेल्या पाण्याच्या तोटीस हे यंत्र लावले असता त्याचे बटण दाबताच त्या यंत्रातून पाणी शौचकूपात फार जोराने वाहत असे व नियमित पाणी निघून जाताच त्या यंत्राचे कार्य बंद होई. या यंत्राचा शोध १९०० साली लावला.

 पिष्टमापक यंत्र - या यंत्राच्या वरच्या भागात एक डबा ठेऊन त्यात पीठ, साखर, चहा ई. जिन्नस भरून ठेवले असता पावशेरापासून वर पाहिजे तितक्या वजनाचा माल फक्त हँडल फिरवले असता वरील राशीतून निघून खाली ठेवलेल्या पिशवीत पडावा व याप्रमाणे माल किती देण्यात आला याची आपोआप नोंद होण्याची सोय या यंत्रात करण्यात आली होती.

सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र - या यंत्राचा आकार लहान असून ते सायकलच्या मधल्या चौकटीतच लावण्याची योजना होती.त्याचा संबंध पुढील हॅण्डलशी ठेवला होता.या यंत्राचा दांडा किंवा बटण दाबताच त्याच्या खाली असलेली एक फ्रेम जमिनीवर आडवी उतरावी; आणि तिच्या योग्य सायकल पाहिजे तेथे उभी राहून तिला आपोआप कुलूप लागावे अशी सोय होती.

 भिसो - टाईप यंत्र - १९०१ च्या दरम्यान या यंत्राचा शोध लावला.भिसो - टाईप पध्दतीत अक्षरांचे सुटे टाईप जुळले जात असतांना दोन शब्दांच्या मध्ये जागा सोडण्याचे कार्य यंत्रात आपोआप होई. जुळलेल्या टाइपांची ओळ झाली की ती , किती व्हायची राहिली आहे हे दाखवणारा एक सूचक या यंत्राला जोडलेलाहोता. पूर्वी उपलब्ध असलेल्या यंत्रातील अनेक तृटी हया यंत्रात नसल्यामुळे हे यंत्र लोकप्रिय झाले.

टाईप पाडणारे यंत्र -  १९१४ साली टाईप पाडणाऱ्या कारखानदारांस विशेष उपयोगी पडणारे यंत्र तयार केले.शंकररावांच्या या यंत्राने मुद्रण क्षेत्रात एक नवीन युग निर्माण केले.हे नवीन यंत्र १९१६ मध्ये बाजारात विक्रीसाठी आले.

 १९१७ मध्ये ‘शेला ' या नावाचे वाशिंग कंपाऊंडचा शोध लावला परंतु आर्थिक स्थिती असमाधानकारक असल्याने भिसे यांनी या शोधाचे सर्व हक्क एका इंग्लिश कंपनीस विकले. या मालामुळे त्या कंपनीला लाखो रुपयांचा नफा झाला. भिसे यांनी ‘बेसलिन' नावाचे औषध शोधून काढले. हे औषध ताप, पायोरिया आणि चामडीचे रोग यावर गुणकारी ठरले. कालांतराने 'बेसलिन'चे नामकरण ‘आटोमिडीन' असे नामकरण करण्यात आले होते. यंत्रशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या अभ्यासाशिवाय विद्युत शास्त्रातही भिसे यांनी प्रगती केली होती. विद्युतशक्तीच्या साहाय्याने हवेतील भिन्नभिन्न वायूंचे पृथःकरण करण्याची योजना हा त्यांचा पहिला शोध. १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी काढली. या शोधाचे पेटंट त्यांनी त्याचवर्षी घेतले.त्यांनी सूर्याकिरणाच्या शक्तीवर चालणाऱ्या मोटरचा शोध १९१८ साली लावला. भिसे यांनी काही लहान यंत्रेही तयार केली.त्यात ‘टिंगी' नावाचे एक लहान यंत्र होते. त्याने अंगरख्याची परीट घडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. याखेरीज डोके दुखत असल्यास शिरा चेपणारे यंत्र तसेच चटण्या वगैरे सहज वाटण्यास जात्यासारखे यंत्र बनवले. भिसे यांनी सुमारे २०० शोध आणि त्यानिमित्त ४० च्या वर  पेटंट घेतली. भिसे यांनी फक्त संशोधन केले नाही तर उद्योग क्षेत्रातही कामगिरी केली.त्यांनी काचेच्या तुकड्यांपासून काचेची भांडी तयार करण्याचा एक लहान कारखाना सुरू केला होता. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्तानात आग्रा येथे आग्रा लेदर फॅक्टरी सुरू केली.

भिसे यांनी संशोधन केले, कारखाने सुरू केले, सामाजिक संस्था स्थापन केल्या. योगध्यान धारणा यांच्यासह विविध विषयांवर व्याख्यानं दिली. विविध विषयांवर लेख लिहिले. ‘ताजमहाल'  ही कादंबरी लिहिली. भिसे यांच्या कार्याची दखल परदेशात मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊन त्यांना विविध पुरस्कारांनी  सन्मानीत करण्यात आले. त्यामानाने भारतात त्यांची फारशी दखल घेतली नाही. शंकर आबाजी भिसे यांचे ७ एप्रिल १९३५ रोजी न्यूयॉर्क येथे निधन झाले. भिसे यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचे तसेच देशाचे नांव उज्वल झाले. त्यांच्या कार्याबद्दलची माहिती व त्यांची महती पुढील पिढीला व्हावी यासाठी जयंत बाळकृष्ण कुळकर्णी यांनी १९६९ साली प्रकाशित केलेले ‘डॉक्टर भिसे व्यक्ती आणि कार्य  हया चरित्राचे नवीन आवृती प्रकाशित करावी, त्याचे विविध भाषेत भाषांतर करावे. त्यांची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने  त्यांना  मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर करावा यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा. ७ एप्रिल हा दिवस पुण्यतिथी तसेच २९ एप्रिल जयंती म्हणून साजरी करावी. - दिलीप प्रभाकर गडकरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 दररोज मोठ्या प्रमाणात मंद विषाचे सेवन  (जागतिक आरोग्य दिन विशेष ७ एप्रिल)