असे करुया एप्रिल फूल!
आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण दिवस जगात एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. फूल ( दिदत् ) म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. आपणही या दिवशी कोणाला तरी मूर्ख बनवलेच असेल. दुसऱ्याला मूर्ख बनवून एप्रिल फूल करण्याचा आनंद आपण सगळ्यांनीच लुटला असेल.
एप्रिल फूल या प्रथेची सुरवात कधी झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, त्यातल्या एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होते. त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षाची सुरवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवड्यात होत असे. या आठवड्यात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत आणि १ एप्रिलला नववर्ष साजरे करीत असत. मात्र १५८२ सालापासून फ्रेंच लोकांनी ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले. या कॅलेंडरनुसार १ जानेवारीपासून पासून नववर्षाचा प्रारंभ होतो. हा बदल तेथील ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना माहीत नव्हता. ते १ एप्रिलाच नववर्ष साजरा करीत त्यामुळे या लोकांना तेथील उच्चभ्रू , सुशिक्षित लोक मूर्ख ( दिदत् ) म्हणत. जे लोक १ एप्रिलला नववर्ष साजरा करीत त्यांना फ्रांसमध्ये एप्रिल फूल असे संबोधले जाई. अशा तऱ्हेने १ एप्रिलला एप्रिल फूल करण्याची प्रथा जगभर पसरली.
फ्रेंच लोक भारतात आल्यानंतर भारतातही ही प्रथा सुरू झाली. १ एप्रिलला आपले मित्र, नातेवाईक यांना एप्रिल फूल करण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. काळानुसार बदल होत आता लोक फेसबुक, व्हॉट्सॲप, टि्वटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियांच्या माध्यमातून एकमेकांना एप्रिल फूल करीत आहेत. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना एप्रिल फूल करून त्यातून मिळणारा आनंद हा क्षणिक असला तरी तो आजच्या धकाधकीच्या जीवनात मोलाचा आहे. दुसऱ्यांना एप्रिल फूल बनवताना प्रत्येकाने स्वतःमधील वाईट प्रवृत्तीलाही एप्रिल फूल बनवावे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला लवकर उठून व्यायाम करून एप्रिल फूल करावे. दररोज मोबाईल वापराच्या सवयीला एप्रिल फूल करून एखादे छानसे पुस्तक वाचावे. सर्वांशी जिव्हाळ्याने वागून आपल्यातील अहंकाराला एप्रिल फूल करावे. गरजवंताला मदत करून स्वार्थाला एप्रिल फूल करावे. मोठेपणाला एप्रिल फूल करून लहान मुलांशी खेळावे. स्वतःच्या ‘मी' पणाला एप्रिल फूल करुन आम्ही बनून समाजात वावरल्यास एकमेकांविषयी असलेली कटुता कमी होईल आणि प्रत्येकाला जीवनाचा आनंद घेता येईल. - श्याम ठाणेदार