एक चमेली के मंडवे तले
हिंदी चित्रपट क्षेत्रातल्या काही निवडक नामवंतांनी असे भाकीत याआधीच केले आहे की फिल्मी माध्यम एक नशिबाचा खेळ आहे. येथे अनेक आले अन गेलेही! काहींना धनदौलत आणि शोहरत सगळं काही मिळतं. तर काहींना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करूनही अपेक्षित नाव किंवा फेम नाही मिळू शकले. दोन दशक काम करुन, उत्कृष्ट गाणी देऊनही ज्या कलाकारास आपली ओळख सांगावी लागते, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.
”मैं अपने आपसे घबरा गया हुं, मुझे ऐ जिंदगी दिवाना कर दे!” रफी साहेबांनी गायलेले अत्यंत कठीण चाल असलेले गीत ही ज्याची ओळख असेल अशा संगीतकाराचे नाव इक्बाल कुरेशी असे होते. हे आजच्या पिढीला कदाचित माहितही नसावे!
मुंबईत माझे एक सुविद्य वाचक-मित्र श्री. दिनेशजी आहेत. जे ताडदेव येथील शासकीय वाचनालयात कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी "चित्रगुप्त” हा माझा प्रकाशित लेख वाचला अन इक्बाल कुरेशी या गतकाळातील महान संगीतकाराच्या एकूण कारकिर्दीवर सुद्धा लेख लिहावा, असे त्यांनी लेखी सुचविले... संगीतकार इक्बाल कुरेशी यांच्याविषयी तशी माहिती मी काही वर्षांपूर्वी एका मराठी दिवाळी अंकात वाचल्याचे आठवते. शिवाय आजच्या डिजिटल युगात विविध माध्यमातून उपलब्ध माहितीनुसार सदर लेख लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
इक्बाल कुरेशी हे सूर-लय-ताल मिश्रित श्रवणीय गाणी देणारे दोन दशकीय काळातले हिंदी चित्रपट संगीतकार होते. शब्द, धुन आणि गायकीचा पूर्ण अभ्यास असलेले हिंदी गाण्यांचे सुमधुर जादुगार, अशी त्यांची ओळख केली तर ती अतिशयोक्ती ठरू नये. बॉलडान्स नंतर जो नृत्याविष्कार पाश्चात्य संगीतात आला तो ‘चाचाचा' हा होय. अशाच नृत्याची पार्श्वभूमी लाभलेला सिनेमा ‘चाचाचा जुन्या काळातील प्रसिद्ध कलाकार चंद्रशेखर यांनी प्रोड्युस करण्याचे धाडस केले. सोबतीला तत्कालीन नृत्यांगना हेलनची नायिका म्हणून निवड करण्यात आली. आणि हिंदी सिनेमामध्ये एक वेगळी ओळख लाभलेले नाव इकबाल कुरेशी यांना संगीताची जबाबदारी देण्यांत आली. १९६४ मध्ये हा सिनेमा संपूर्ण भारतात वितरित करण्यांत आला. भारतातील तरुणाईला त्यावेळी चाचाचा या पाश्चात्य नृत्याविष्काराची ओळख झाली. मुंबईमध्ये आयोजित डान्स शोज, म्युझिकल शोजमधून या सिनेमाची गाणी श्रोते सहज गुणगुणत असत. त्यावर मुक्तपणे नाचत असत. असा हा सिनेमा गाजला त्याचे प्रमुख कारण त्यातील अप्रतिम गाणी होत. लाजवाब संगीत. सुबह ना आई, शाम ना आई, वो हम ना थे वो तुम ना थे, एक चमेली के मंडवे तले ही आणि अशी अनेक अवीट गोडीची श्रवणीय गीते आजच्या पिढीने जरूर युट्युबर जावून पहावीत. त्यावेळच्या गाण्याचे पिक्चरायझेशन कसे झाले, गाण्याचे शब्द, तसेच त्यावेळच्या महान गायकांचे स्वर इत्यादी अनुभवता येतील. एक चमेली के मंडवे तले हे श्रवणीय युगलगीत रफी - आशा यांनी गायले आहे. मला आठवते..त्यावेळी इराणी हटेलातून ज्युक बॉक्समधून हेच गाणे लोक वारंवार ऐकत असत. अतिशय गोड चाल, मध्यम स्वरूपाचे स्वर, विलक्षण आत्मीयता असे ते गाणे फक्त ऐकत रहावे असे लाजवाब गाणे! आंतरिक सुख देणारे. आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
त्यावेळी इकबाल कुरेशी हे नांव खूप गाजले. त्यांची एकूण सांगितिक बैठक स्वदेशी आणि पाश्चात्य मिश्रित चालीवर आधारित असायची. १९३० सालात छत्रपती संभाजी नगर येथे त्यांचा जन्म झाला. सुमारे १९५८ ते ८६ दरम्यान अशी त्यांची संगीत कारकीर्द असावी. मी पाहिलेला ‘ये दिल किसको दू हा हिंदी सिनेमा व त्यांतील सर्व गाणी त्याकाळी रेडिओवर खूप गाजली होती. आमच्या पिढीला रेडिओ हेच एकमेव माध्यम माहीत होते. त्यावेळी शशी कपूर अजूनही स्ट्रगल नायक म्हणून ओळखले जायचे. माझा आवडता नट. पण का कुणास ठावूक, ज्यावेळी त्याचा तो सिनेमा टॉकीजमध्ये रिलीज झाला खरा; पण तो ज्यास्त काळ नाही चालला. रेडिओवर त्याची गाणी यायची. पण विशेष जाहिरात ऐकल्याचे आठवत नाही. त्याच काळात ‘सवर्णा फिल्म्स मद्रास का शाहकार राजकुमार!' अशी अमीन सयानी यांच्या आवाजात जाहिरात यायची जी आजही तोंडपाठ आहे. पण ये दिल किस्को दु? रेडीओ जाहिरातीमध्ये कमी पडला असावा. शशी कपूर व रागिणी नायक नायिका असूनही ‘ये दिल किस को दु?' हा म्युझिकल सिनेमा असूनही खिडकीवर विशेष यश नाही मिळवू शकला! आज ती सर्व गाणी म्युझिक लिंक...सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. प्रत्येक गाण्याची सिच्युएशन तसेंच देखणे सेट्स पाहून प्रेक्षक स्तिमित होतील. चाचाचा पेक्षा जास्त मनोरंजक सिनेमा आणि त्यातील गाणी सिनेमात विशेष कल्पक सेट्स लावून शूट करण्यात आली होती, ती कलात्मकता पडद्यावर उठुन दिसते. तरीही ‘ये दिल किस्को दु' मूळे इकबाल कुरेशी यांना मिळायला हवी होती ती प्रसिद्धी नाही मिळू शकली. एक उमदा कलाकार विस्मृतीत झाकला गेला.
संगीतकार इक्बाल कुरशी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची प्लेलिस्ट तशी खूप मोठी आहे. मोहम्मद रफी, मुकेश यांच्या स्वरातली सोलो गाणी खूप गाजली आहेत. लता, आशा, सुमन, मुबारक बेगम इत्यादी गायिकांची गाणी ऐकताना हिंदी सिनेमात त्यांनी दाखवलेला मनस्वी वेगळेपणा, विविधा खुलून दिसते. एस. डी. बर्मन हे जसे आपल्या कारकीर्दीत सांगीतिक प्रयोग करत राहिले तसेच किंबहुना थोड्या अधिक प्रमाणात पाश्चिमात्य वाद्यांचा प्रयोग त्याकाळी कुरेशी यांना बेमालूम जमला आहे. कव्वाली, विरह गीत, प्रेम युगलगान, सोलो अशा विविध प्रकारच्या मूडची फिल्मी गाणी त्यांनी स्वरबद्ध केली होती. आज ती गाणी ऐकतांना कुरेशी साहेब यांची कलात्मकता जरी उठून दिसत असली तरीही ती दुर्लाक्षित झाली, ह्याचे मनस्वी दुःख वाटते.
असे असूनही कुरेशी मागे का पडले असावेत? त्याची प्रमुख कारणे माझ्या मते दोन असावीत...त्याकाळी पेपरमध्ये छापून येणारी जाहिरात आणि आकाशवाणीवरील जाहिरात यांमध्ये प्रोडक्शन हाऊस कमी पडले असावे. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे साठच्या आधीच शंकर-जयकिशन बरसात, आवारा, श्री ४२० घेऊन आले, आणि सारा देश त्यांच्या मेलोडीचा आशक झाला होता. त्या तिन्ही फिल्म्सच्या गाण्यांचे आल्बम्स आजही लोकप्रिय आहेत. पुढे ओपी नैयर आले, हुसनलाल भगतराम, नौशाद, मदन मोहन, एसडी बर्मन हे आणि असे बरेचसे संगीकार या क्षेत्रात आवतरले होते. हिंदी चित्रपट संगीताचा तो सुवर्णकाळ समजला जातो. आजही इंडियन आयडॉल म्युझिक प्लॅटफॉर्मवर आजची नवीन पिढी त्याच काळातली गाणी निवडत आहेत. अशा वेळी बी ग्रेडचे सिनेमे बऱ्यापैकी व्यवसाय करत असत. पण मोठे फ़िल्म बॅनर्सवाले कंपू करून राहिले. हळूहळू इकबाल कुरेशी हे नाव मागे पडत गेले. जे पुन्हा प्रयत्न करूनही नाही पुढे येऊ शकले. त्यांच्या चाहत्यांना दुःख ह्याचेच वाटत असावे. आपल्या कारकिर्दीत अपेक्षित यश मिळाले नसेल पण त्यांनी केलेली संगीत क्षेत्रातली श्रवणीय कामगिरी अमर आहे. त्यांची गाणी युट्यूबवर चाहते ऐकत आहेत.
त्यांचे नाव इकबाल. या शब्दाचा अर्थ ‘उत्कर्ष' असा आहे. पैसा, नाव, फेम, पॉप्युलॅरिटी हे सर्व क्षणिक आहे. आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो, हे महत्वाचे! ते या संगीतकाराने जपले. आजही लोकांच्या प्रवृत्तीत विशेष बदल जाणवत नाही. इक्बाल कुरेशी हे नाव सोशल मीडियावर खूप गाजत आहे. गतकाळातील अशा एका महान संगीतकारास व त्यांच्या कारकिर्दीला सलाम!
सुबह ना आयी, शाम ना आयी
जिस दिन तेरी याद ना आयी, याद ना आयी...!
-इक्बाल शर्फ मुकादम