वणवे रोखा निसर्गसंपदा वाचवा!
जंगलांना आगी लागण्याच्या घटना नव्याही नाहीत. गेल्या काही वर्षात वणवे लागण्याचे प्रमाण ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे तो एक नव्या संकटाचा इशारा आहे. नैसर्गिक कारणामुळे जंगलांना वणवे लागण्याच्या घटना तर घडतातातच; पण मानवनिर्मित वणवे लागण्याचा घटनांची संख्याही प्रचंड आहे. दरवर्षी उन्हाळा आला की जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात आणि त्यात बहुमोल अशी निसर्गसंपदा नष्ट होते.
उन्हाळा जसा तापू लागतो तसे वन खात्याच्या जंगलांना आगी लागण्याच्या घटनांत वाढ होते. आताही राज्यात कोठे ना कोठे वन खात्याच्या जंगलांना आगी लागून वणवे पेटल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. काही वेळा या आगी वेळीच आटोक्यात येतात पण बऱ्याचदा या आगी वेळीच आटोक्यात न आल्याने त्या रौद्र रूप धारण करतात आणि त्याचे रूपांतर मोठ्या वणव्यात होते आणि त्यात बहुमोल अशी निसर्ग संपदा जळून खाक होते. दोन वर्षापूर्वी गोव्यातील महादयी वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागली होती. जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पश्चिम घाटाचा हा विस्तिर्ण भाग गोव्याच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीमुळे उध्वस्त झाला होता. मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील वन खात्याच्या जंगलातही वणवे पेटण्याच्या अनेक घटना घडल्या त्यात शेकडो एकर जंगलातील बहुमोल अशी निसर्गसंपदा जळून खाक झाली होती. वणवा पेटला की त्यात निसर्गाची कधीही न भरून येणारी हानी होते. साधारणतः उन्हाळ्यात या आगी लागतात आणि वणव्यांमुळेच या आगी लागतात. सामान्यतः सदाहरित जंगलांमध्ये आगी लागत नाही; आग लागली तरी ती आपोआप विझतेही; मात्र जोराने वारे वाहत असतील तर आग लवकर विझत नाही, उलट ती आणखी वाढते. वनांमध्ये वाळलेले लाकूड, पाने, गवत असे अनेक घटक ठिणगीच्या संपर्कात येताच आग भडकते. मग झाडे पेट घेतात आणि मग मोठ्या वेगाने हा वणवा सर्वत्र पसरतो.
डोंगराळ भागाचा भूगोल आणि भूरचना जटिल असल्यामुळेही वणवे विझवण्यात अनेकदा अडथळे येतात. गोव्यात तेच झाले. दुर्गम परिसर आणि खडे चढण यामुळे तेथील आग विझवण्यात अडचण आल्याचे सांगितले गेले. अर्थात जंगलांना आगी लागण्याच्या या घटना नव्याही नाहीत. गेल्या काही वर्षात वणवे लागण्याचे प्रमाण ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे तो एक नव्या संकटाचा इशारा आहे. नैसर्गिक कारणामुळे जंगलांना वणवे लागण्याच्या घटना तर घडतातातच; पण मानवनिर्मित वणवे लागण्याचा घटनांची संख्याही प्रचंड आहे. दरवर्षी उन्हाळा आला की जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात आणि त्यात बहुमोल अशी निसर्गसंपदा नष्ट होते केवळ जंगलांनाच नाही तर डोंगर, पर्वत, टेकड्यांवरील वृक्ष, वेली देखील या वनव्यांनी नष्ट होतात. विविध महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, राज्य व केंद्र शासन, राजकीय, सामाजिक व सेवाभावी संघटना पावसाळ्यात वृक्षारोपण करतात. पावसाळ्यानंतरही ही वनसंपदा जतन करण्यासाठी या संघटना रोपट्यांना पाणी घालून ते वाढवतात. गाई, गुरे, बकऱ्यांपासून त्यांना जपतात. मात्र उन्हाळ्यात ठिकठिकाणी वणवे लागून व काही समाजकंटकामार्फत वणवे लावून वर्षानुवर्षे वाढवली गेलेली ही बहुमोल निसर्गसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असते. उन्हाळ्यात लागणारे हे वणवे नैसर्गिक असल्याचे भासवले जाते; पण हे यातील बरेचसे वणवे मानवनिर्मितच असतात हे उघड सत्य आहे.
काही समाजकंटक जाणीवपूर्वक शहराजवळच्या डोंगरावरील हिरवाईला वणवे लावून ती नष्ट करतात. चराई करिता चांगले गवत यावे या हेतूने हे वणवे लावले जातात. ( आग लागल्यावर चांगले व भरपूर गवत उगवते हा त्या मागचा उद्देश असतो. ) लाकूडफाटा, कोळसा मिळवण्यासाठी तसेच शेती व शिकारीसाठी जमीन तयार करण्यासाठी या बहुमोल निसर्ग संपदेला आगी लावल्या जातात. या आगीत वृक्ष, वनस्पती, वन्य जीवांची हानी, स्थलांतर यामुळे जे नुकसान होत असते त्याची भरपाई होण्यास खूप वर्षाचा कालावधी जातो. निसर्गाची अपरिमित हानी होते. या आगीमुळे पर्यावर्णाची हानी तर होतेच पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. एकूणच झाडांना लावल्या जाणाऱ्या या आगी म्हणजे राष्ट्रीय हानी आहे. असे असतानाही या मानवनिर्मित वणव्यांकडे केंद्र व राज्याचे वने आणि पर्यावरण खाते, पोलिस खाते दुर्लक्ष करीत असतात. आगी लावणाऱ्या या समाजकंटकांवर पोलीस तसेच प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळेच वणव्यांच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. काही भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामुळे निसर्गाची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे, म्हणूनच सरकारने या वणव्यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. वणवे लावून पर्यावरणाची हानी करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. वणव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळायची असेल तर मानवनिर्मित वणवे रोखायलाच हवे. - श्याम ठाणेदार