नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणें

भक्तीहीन जीवन म्हणजे दाण्याचा कण नसलेले रिकामे कणीस, किंवा ओस पडलेले टुमदार शहर, अथवा आटलेले सरोवर. थोडक्यात, जीव नसलेले शरीर. पृथ्वीवर दगड आणि असा जीव यात काहीच फरक नाही.

अहो ज्या नरा रामविश्वास नाही।
तया पामरा बाधिजे सर्व काही।
महाराज तो स्वामी कैवल्यदाता।
वृथा वाहणे देहेसंसार चिंता श्रीराम । ७८।

आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्याचा मनाला छंद लागतो. मन त्यात रमून जाते. कंटाळा येत नाही. श्रम वाटत नाहीत. भगवंताची  आवड निर्माण होऊन त्याचा  छंद  लागला  म्हणजे  आयुष्यातील  सर्व  सुख-दुःखांचा विसर पडतो. फक्त भगवंताचे स्मरण राहते. भगवंत आनंदस्वरूप आहे. त्यामुळे त्याचे  चिंतन करताना मन नित्य आनंदात  राहते. परिस्थिती अनुकूल असेल  किंवा प्रतिकूल असेल, तरी मनावर कोणताही  परिणाम होत नाही. शारीरिक  श्रम जाणवत नाहीत. अडचणी-समस्या  यांनी तो त्रासून-कंटाळून जात नाही. जो आवडीने भगवंताच्या स्मरणात रंगून जातो तो निश्चिंत होऊन  राहतो. परंतु  ज्याचा  "भगवंत आहे आणि  तो सामर्थ्यवान आहे” यावरच  विश्वास नसतो त्याला भगवंताची  आवड  निर्माण होत  नाही. समर्थ अशा माणसाला  "पामर”  म्हणतात. कारण त्याला संसारातील  दुःखांची-आपदांची बाधा  होते. स्वतःकडे अखंड आनंदाचा स्त्रोत असुनही तो आनंदी,  समाधानी राहू शकत नाही. संपत्ती असूनही तिचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याला दैन्यवाणा  म्हणतात.

जो आपल्याजवळ  असलेल्या संपत्तीचा यथोचित  विनियोग करत नाही, स्वतःचे हीत साधून घेत नाही त्याला महामूर्ख  म्हणतात.  समर्थ  म्हणतात, ”सामर्थ्यवान, कृपावंत  भगवंत नित्य आपल्या जवळ  आहे. आपल्या अंतर्यामी  विराजमान  आहे. पण त्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तो विश्वास असला तरी त्याच्या सामर्थ्यावर भरवसा नाही. म्हणूनच त्याच्या कृपेचा उपयोग करून घेता  येत नाही. अशा  पामराला  संसाराची  सतत चिंता वाटत राहते.  प्रपंच  दुःखमूळ आहे. तिथे  शाश्वत आनंदाची  किंवा  समाधानाची शक्यता  नाही. कितीही  चिंता केली  तरी  प्रपंचातील  अडचणी संपून  दुःखाची  संपूर्ण निवृत्ती  झाली असे होत  नाही. म्हणूनच  संसाराची  चिंता वाहणे  हे व्यर्थ  श्रम  आहेत.  संसाराच्या सर्व व्याप-तापातून  मुक्त  करणारा  एक कैवल्यदाता  भगवंत  आहे. तो  कृपाळू आहे, उदार  आहे, भक्तरक्षणासाठी तत्पर आहे. गरज आहे ती मनापासून त्याला साद घालण्याची. कठीण  प्रसंगात आपल्याला आठवण येते ती नातेवाईक, मित्र मंडळी, बँकेतील शिल्लक, सत्ताधीशांचा वशिला  इ. तथाकथित  आश्रयाची. पण चराचराचे नियमन करणा-या, सर्व  सृष्टीचा आश्रय असलेल्या  षडगुणैश्वर्यसंपन्न  परमात्म्याचे  स्मरण आपल्याला  होत नाही.  स्वकर्तृत्वाचा  अहंकार  भगवद्‌स्मरणाच्या आड येतो. देहअहंतेचा  संपूर्ण त्याग करून  भगवंताला  शरण  गेलेला भक्त आपला सर्व  भार त्याच्यावर  टाकून  निश्चिंत  राहतो. आपले विहित कर्म करणे एवढीच  आपली जबाबदारी मानतो. आपली  चिंता  वाहण्यास   भगवंत  समर्थ आहे, तो जे करेल  ते  माझ्या  हीताचे  असेल ह्या  दृढ  श्रध्देमुळे  त्याला प्रपंच दुःखाची  बाधा  होत नाही. याचा अर्थ  तो दुःख किंवा  चिंतेने  सैरभैर  होत नाही. आघाताने  उन्मळून  पडत नाही. परमेश्वर सतत आपल्यासोबत  आहे  या विश्वासाने  तो निःशंक आणि निर्भय  होऊन कर्म  करत राहतो.

भक्तीहीन जीवन कसे असते हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली  म्हणतात, ”तैसे  भक्तीहीनाचे  जीणे। जो स्वप्नीही परि  सुकृत नेणे। तेणे संसार दुःखासी भाणे।वोगरिले(ज्ञा.९-४४०) भक्तीहीन मनुष्य स्वप्नातही  पुण्यकर्म  करत नाही.त्यामुळे त्याच्यापुढे संसाररूप  दुःखाचे ताट नेहमीच वाढलेले  असते. त्याचे  आयुष्य म्हणजे संसारदुःखाला निमंत्रण  असते. असे मानव दैवहत  म्हणजे  हतभागीच  म्हटले  पाहिजेत. कवि  मोरोपंत  म्हणतात, "हरिहरभक्ती  अनादर  करिती ,धरिती  मनात  पंचदशी। त्यांच्या  ज्ञानाग्नीने  न जळे  एकही  पटप्रपंचदशी" "हरिहरभक्तीचा  तिरस्कार  करणाऱ्यांंनी मनात सतत पंचदशी नावाच्या  वेदांतशास्त्राचे  चिंतन  केले  तरी  त्यांच्या त्या शब्दज्ञानाच्या  अग्नीने  प्रपंचरूप  वस्त्राची  एक दशी  म्हणजे एक दोराही  जळणार नाही. प्रपंचातील  एवढीशीही  चिंता  शमणार नाही. दुःख कणभरही  सरणार  नाही.” माऊली  म्हणतात,  "भक्तीहीन जीवन  म्हणजे दाण्याचा कण नसलेले कणीस, किंवा  ओस पडलेले  टुमदार शहर, अथवा  आटलेले सरोवर. थोडक्यात म्हणजे  जीव नसलेले  शरीर. असा मनुष्य  आणि दगड यात फरक तो काय?”

श्लोक क्र.६५ मध्येही  समर्थांनी म्हटले  आहे, "नको  दैन्यवाणे  जिणे  भक्तिऊणे। अतिमूर्ख  त्या सर्वदा  दुःख दूणे”  यातून मार्ग काढायचा असेल तर भगवंतावर निस्सीम श्रध्दा ठेवून त्यानेच दिलेल्या ज्ञानेंद्रिय-कर्मेंद्रियांचा सदुपयोग करावा, स्वधर्माचे पालन करावे. प्रयत्नांना प्रार्थनेची जोड द्यावी आणि सर्व इच्छा-अपेक्षा-अहंता त्याला अर्पण करून निश्चिंत रहावे. संसाराच्या चिंतेत न राहता भगवंताच्या चिंतनात राहून आनंदाचा अनुभव घ्यावा.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वैश्विक पासपोर्ट म्हणून इंग्रजीः २१ व्या शतकात व्यावसायिक यशासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व