भोळ्याभाळ्या सकळां कारण । नामचि पावन करीतसे

जो शरणागत भावनेने अत्यंत श्रध्देने दीनदयाळ भगवंताचे स्मरण करतो तो भगवद्‌कृपेने भवसागरातून तरून जातो. म्हणजेचशाश्वत भगवंत आणि अशाश्वत म्हणूनच दुःखदायक प्रपंच यातील फरक समजून घेऊन मनुष्य दुःखस्वरूप प्रपंचापासून अनासक्त होऊन नित्य आनंदस्वरूपात स्थित होतो. हेच मनुष्यजन्माचे अंतिम हीत आहे.

बहुतांपरी संकटे साधनाची।
व्रते दान उद्यापने ते धनाची।
दिनाचा दयाळू मनी आठवावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७४।

भगवंताच्या प्राप्तीसाठी साधने करायची म्हटली तर त्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. शरीराला श्रम होतात. पैसा खर्चहोतो. बरे ,एवढे करूनही मंत्र-तंत्र यात काही चुकले तर फलप्राप्ती दूरच राहते शिवाय दोषही लागतात. त्याचे वेगळे पातकमाथी बसते. म्हणून सर्व संत एकमुखाने "नामसाधना” हाच उपाय सांगतात. दीनदयाळ भगवंताच्या नाम, रूप, गुणांचे स्मरण करण्यासाठी काहीही त्रास करावा लागत नाही. कोणतेही स्थळ, काळ, वय, परिस्थिती, वर्ण, आश्रम, शौच-अशौच, सोयर-सुतक इ.कशाचेही बंधन, मर्यादा नामस्मरणाच्या आड येत नाहीत. ”योग याग विधी येणे नव्हे सिध्दी। वायाचीउपाधी दंभधर्म” असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. (हरिपाठ ५-१) योग, यज्ञयाग, इ.साधने कठीण आहेत. व्यर्थ उपाधी आहेत. त्यापासून खरा देव भेटत नाही. परंतु दंभ आणि अहंकार मात्र उत्पन्न होतो. हे शत्रु चित्त शुध्दीच्या आड येतात आणि अंतिम हीत हाती लागत नाही.

 महिपतीबाबा भक्तलीलामृतात म्हणतात, "योगमार्ग बहुत कठीण। विरळा साधी
लक्षांतून। भोळ्याभाळ्या सकळां कारण। नामचि पावन करीतसे”

सर्वसामान्य लोकांसाठी नामस्मरण हाच राजमार्ग आहे. यज्ञ, दान, तप असे तिन्ही मिळून वैदिक संस्कृती व जीवनपध्दती बनली होती. परंतु काळाच्या ओघात याविधींसाठी आवश्यक असणारे ज्ञान लुप्त झाले. शास्त्र आणि त्याचे विधी-निषेध जाणणारे अधिकारी उरले नाहीत. योग्य मार्गदर्शन करणारे दुर्लभ झाले. त्याचबरोबर ही कर्मे यथासांग करण्यास जी चिकाटी, संयम, श्रम, वेळ, आणि मुख्य म्हणजे श्रध्दा लागते. त्यांचीच लोकांमध्ये वानवा निर्माण झाली. लोकांना जीवनातल्या अडचणी दूर करायच्या असतात, समस्या सोडवायच्या असतात. पण त्यासाठी लागणारे श्रम करायचे नसतात, नियम पाळायचे नसतात. म्हणूनच व्रते, उपासना, इ.साधने करण्यात अडचणी येतात. दानधर्म करायचा तर द्रव्यबळ असावे लागते. त्यात माणसाचे जमाखर्चाचे गणित बिघडते. भगवंत असा दयाळू आहे, कृपावंत आहे, की त्याला मंत्र-तंत्र, कर्मकांड, तुमची धनदौलत, तुमचे श्रम, तुमचा वेळ यातले काहीच लागत नाही. आहे त्या जीवनक्रमात फक्त त्याचे स्मरण केले तरी तो कृपा करतो. प्रेम भाव किंवा पूज्य भाव नसला तरीही कृपा करतो. मग प्रेम आणि अनन्य भाव असेल तर किती असीम कृपा करेल याचा विचार करावा.

 भगवंताचे दर्शन आपल्या अंतर्यामीच होते. देव आपल्यातच आपल्याला भेटतो.अंतःकरणातील अखंड आनंद म्हणजेच देव. निरंतर समाधानाची स्थिती म्हणजेच भगवंत प्राप्ती. पूर्णानंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तेच आपलेही मूळ स्वरूप आहे. ते जाणून घेऊन त्यात स्थित होणे यालाच अंतिम हीतम्हणतात. शरण वृत्ती हे दीनतेचे लक्षण आहे. जो शरणागत भावाने, अत्यंत श्रध्देने दीनदयाळ भगवंताचे स्मरणकरतो तो भगवद्‌कृपेने सर्व संकटे, समस्या, अडचणी, आपदा यांवर मात करून भवसागरातून तरून जातो.

 म्हणजेच शाश्वत भगवंत आणि अशाश्वत म्हणूनच दुःखदायक प्रपंच यातील फरक समजून घेऊन मनुष्य दुःखस्वरूप प्रपंचापासून अनासक्त होतो. अनित्यापासून अनासक्त होऊन नित्य आनंदस्वरूपात स्थित होणे हेच मनुष्यजन्माचे अंतिम हीत आहे. त्यासाठी विनाश्रमाचे, विनाखर्चाचे नामसाधन करावे. पहाटे पहाटे याचा अर्थ लवकरात लवकर रामाच्या चिंतनाला लागावे. आयुष्याची संध्याकाळ होण्याची वाट पाहण्यात नरदेहाचा नाश करू नये.
जय जय रघुवीर समर्थ  
- सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अशाने खरेच पाप धुतले जाईल?