स्थलांतरित अवैधरित्या अमेरिकेत गेले हा गुन्हाच, परंतु हातकड्या-बेड्या घालणे योग्य आहे का?

जे स्थलांतरित आणि गुन्हेगार आहेत त्यांना अमेरिकन सरकारने अवश्य हातकड्या व बेड्या घालाव्यात याचे स्वागतच केले जाईल. कारण बरेचसेे अवैध स्थलांतरित यात गुन्हेगारसुध्दा असु शकतात. परंतु काही स्थलांतरित रोजगार मिळावा या उद्देशाने अवैधरित्या अमेरिकेत गेले. परंतु प्रत्यार्पण करतांना बेड्या घालून गुन्हेगाराची वागणूक देणे ट्रम्प प्रशासनाचे पाऊल चुकीचे आहे. आता सरकारने विचार करावा की भारतातील युवा वर्ग विदेशात अवैधरित्या का जातात ?

अमेरिकेतील भारतीय १८ हजार स्थलांतरितांची आतापर्यंत ओळख पटली आहे. भारतीय स्थलांतरितांना परत आणणारी ही पहिलीच विमानसेवा आहे याबद्दल अमेरिकन प्रशासनाचे स्वागतच. भविष्यात भारतात अशाप्रकारे अनेक विमाने येवू शकतात. त्यामुळे अमेरिकेने हातकड्या आणि बेड्या फक्त अट्टल गुन्हेगारांनाच घालाव्यात. अमेरिकेने पहिल्या बॅचमध्ये १०४, दुसऱ्या बॅचमध्ये ११६ तर तिसऱ्या बॅचमध्ये १५६ स्थलांतरितांना भारतात आणण्यात आले. अमेरिकेने स्थलांतरितांची चौकशी करायला पाहिजे की येणारे स्थलांतरित कोणत्या उद्देशाने अमेरिकेत आलेत. त्यापध्दतीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून परत पाठविणर योग्य राहील. अमेरिकेच्या या वागण्यावरून लक्षात येते की संपूर्ण स्थलांतरितांना एकाच प्रकारची वागणूक दिली जात आहे ही बाब योग्य नाही, अमेरिका सुपर पॉवर असला तरी मनमानी करू शकत नाही.  स्थलांतरीत विदेशात जातात याचाच अर्थ भारतात युवकांसाठी रोजगाराची योग्य संधी उपलब्ध होत नसावी. अमेरिका भारताचा मित्र आहे असे आपण समजतो. परंतु तसे नाही.  अमेरिका हा कोणाचाच मित्र नाही किंवा शत्रृ नाही. कारण अमेरिका हा व्यापारी राष्ट्र आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो काहीही करू शकतो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य २० वर्षे होते परंतु आतंकवाद्यांशी झुंज देवु शकले नाही. शेवटी अफगाण नागरिकांना रक्ताच्या लाथोळ्यात टाकून पळ काढला व अफगाणिस्तानमधील आपले संपूर्ण सैन्य मायदेशी बोलावले. अशाप्रकारेच अनेक देशांना त्यांनी दगासुध्दा दिला व रक्ताच्या थारोळ्यात लोटले.

अमेरिका आणि भारत यांचे संबंध सध्याच्या परिस्थितीत जागतिक पातळीवर चांगले आहेत यात शंका नाही. तरीही स्थलांतरितांना बेड्या घालून भारतात पाठविणे योग्य नाही. कारण जे-जे भारतीय अवैधरित्या अमेरिकेत गेले त्यांना परत भारतात पाठवित आहे. त्याचे भारताकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडुन स्वागतच. परंतु एखाद्या कैद्यासारखी वागणूक देऊन हातकड्या व बेड्या घालने योग्य नाही. आपण पाहीले  की जे १८ हजार अमेरिकेतील स्थलांतरित आहे त्यांनी लाखो रुपये खर्च करून नौकरीच्या निमित्ताने अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केला हेसुद्धा त्यांचे मुर्खपणाचे लक्षणच म्हणावे लागेल. अमेरिकेत जाण्यापेक्षा हाच पैसा स्थलांतरितांनी भारतात खर्च करून एखादा छोटा-मोठा उद्योग टाकला असता तर त्यांच्या लाखो रुपयात वाढ झाली असती व ताठ मानाने जगता आले असते. आज १८ हजार स्थलांतरितांचा पैसाही गेला आणि इज्जतही गेली,  अशी गंभीर परिस्थिती आज स्थलांतरितांची व त्यांच्या कुटुंबीयांची झाली आहे. त्यामुळे १८ हजार स्थलांतरित आपल्या परिवारासह संपूर्ण कुटुंबाचे गुन्हेगार आहेत. कारण आज्या-बापाने कमविलेला घामाचा पैसा या १८ हजार स्थलांतरित युवकांनी क्षणात मातीमोल केला याचे दुःख त्यांचे कुटुंब कदापि सहन करणार नाही एवढा मोठा जब्बर धक्का परिवारासह कुटुंबाला बसला आहे. त्यामुळे युवकांनो, जे आपल्या देशात आहे ते विदेशात कदापि उपलब्ध होणार नाही हेही तितकेच सत्य आहे. भारतातील १८ हजार स्थलांतरित अमेरिकेचे गुन्हेगार आहेच यात दुमत नाही. कारण त्यांनी अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केला आहे. परंतु आता अमेरिकने स्थलांतरितांचे प्रत्यार्पण करतांना सहानुभूती दाखवुन सन्मानाने परत भारतात पाठवावे. कारण असे जर झाले तर संपूर्ण जगात अमेरिकेच्या बाबतीत चांगला संदेश जाईल. सध्याच्या परिस्थितीत जगात रोजगाराच्या बाबतीत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण जगातील अनेक देशांमध्ये गृहयुद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक देशांमधील उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. याचाच परिणाम म्हणजे अनेक देशांनी स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जे काही करायचे आहे ते विदेशात न करता आपल्याच भूमीत केले तर देशाला, परिवाराला व कुटुंबाला याचा भरपूर फायदा होईल व सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येईल. जय हिंद!
-रमेश कृष्णराव लांजेवार,
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर) 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत विशेष लेख वर्ध्याच्या वाङ्‌मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव