मन नाही निर्मळ, काय करील गंगा यमुना जल
केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रदुषण समितीने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्या समितीने प्रयागराज व आसपासच्या जवळजवळ ८० ठिकाणाहून पाण्याचे नमुने परिक्षण केल्यानंतर त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आढळून आले. ते पाणी आचमन करणे सोडाच; अंघोळ करण्यासाठीही योग्य नसल्याचे अनुमान तज्ज्ञांनी काढले. मानांकनाप्रमाणे १००% बॅक्टेरियायुक्तापेक्षा अडीच ते तीन हजार पट बॅक्टेरिया आढळल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. नदीचे पाणी वाहते असते, त्यात काहीही थांबून राहत नाही, मग हजारो वर्षापूर्वी नदीत पडलेले अमृत थांबले असेल का?
मकर संक्रांतीपासून प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याची सांगता आता काही दिवसावर येऊन ठेपली आहे. या कुंभमेळ्यात आता पावेतो (सरकारच्या आकड्यानुसार) ५५ कोटी लोकांनी पवित्र स्नान केल्याचे सांगितले जाते. या मेळ्यात बऱ्याच घटना घडल्या, पवित्र स्नानाच्या दिवसात अनेक ठिकाणी चेंगरा-चेंगरीचे प्रकार घडले, त्यात अनेक भाविकांचा जीव गेला, तर अद्यापही १५-२० हजार लोकांचा ठावठिकाणा लागत नाही. त्याची आकडेवारी वा माहिती लोकांना मिळत नाही.
प्रयागराज येथे अद्यापही श्रध्दाळूंचा लोंढा सुरुच आहे. त्यात प्रशासन, लोंढ्याच्या व्यवस्थापनात कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे. सामान्यांच्या गरजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष्य तर, ‘व्हिआयपी' ना खास सुविधा प्रकारामुळे अफरा-तफरीत भर पडल्याचे अनेकांचे मत आहे. या कुंभमेळ्यात, मेळ्याच्या पावित्र्यापेक्षा जास्त चर्चा नागा साधूंचीच होत आहे. नागा सांधूबरोबर नागासाध्वींचीही चर्चा परमोच्च स्थानावर आहे. सोशल मिडियावर अनेक महिला साध्वींच्याच बाता होताना दिसतात.
उत्तर प्रदेश सरकारने या महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थापनेसाठी ८ ते १० हजार कोटी खर्च केल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण, प्रत्यक्षात सामान्य भाविकांना या सोयी-सुविधापासून वंचित ठेवण्यात आल्याने भाविकांत रोष आहे. माघी पौर्णिमेच्या शाही स्नानादरम्यान प्रयागराज व आसपासच्या भागात ३०० किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम लोकांनी अनुभवला आहे. ते पुढे गर्वाने आपल्या पुढील पिढीला सांगितले की, ‘त्यांनी कुंभमेळ्याच्या स्नानासाठी अनेक तास ट्रॅफिक जामचा सामना करुन स्नान केले. पण, ही गर्वाची बाब नाही हे या अंधभक्ताना कोण सांगणार? त्यातच त्यांनी गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केले की, गटारांच्या व इतर केमिकलकयुवत प्रदुषित पाण्यात स्नान केले.
कारण केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रदुषण समितीने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्या समितीने प्रयागराज व आसपासच्या जवळजवळ ८० ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्याचे परिक्षण केल्यानंतर त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आढळून आले. ते पाणी आचमन करणे सोडाच; अंघोळ करण्यासाठीही योग्य नसल्याचे अनुमान तज्ज्ञानी काढले. मानांकनाप्रमाणे १००% बॅक्टेरियायुक्तापेक्षा जास्त म्हणजे अडीच ते तीन हजार पट बॅक्टेरिया आढळल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे.
या तथाकथित पवित्र स्नानाने अनेक श्रध्दाळूंना विविध प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. सामान्य माणसाचे सोडा, जे नागा साधू ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही त्रतूमध्ये विना कपडे, गुहेत वा जंगलात राहतात, मिळेल ते खातात. कोणत्याही सुविधापासून वंचित असतात, एरवी त्यांना कोणताही त्रास वा आजार होत नाही. त्यांनाही या प्रदुषित पाण्याने त्रास होत असल्याचे समोर येत आहे. त्याचे पवित्र कवच म्हणजे, ते स्वतःच्या अंगार चित्तेच्या राखेचा लेप लावतात. ते राखेलाच पवित्र मानतात, त्याचा खाण्यापिण्याचे एक टाईम टेबल असते. ते बहुतेक वेळा दिवसा झोपतात व रात्री ध्यान धारणेत मग्न असतात. त्यातल्या त्यात रात्री १२ ते ३ या वेळेत ते मोठी साधाना करतात व आपल्या सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवतात. त्यांना हिमालयातील योध्देही मानले जाते. ते राखेच्या आसऱ्याने राहात असल्याने त्यांच्या आसपासचा भाग एक रहस्यमय बनून जातो.
या साधूंचे विविध आखाडे आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या रिती व परंपरा आहेत. जसे त्यांच्याकडे आध्यात्मिक सामर्थ्य आहे तसेच ते युध्द कलेतही तरबेज असतात. आदि शंकराचार्यांनी आपले शास्त्र व धर्म वाचवण्यासाठी व त्याच्या रक्षणासाठी या साधूंच्या हातात शस्त्रे दिली. या व्यवस्थेला धर्म सैनिक किंवा योध्दा संन्यासी म्हटले जाते. या सैनिकांनी इंग्रजाचाही विरोध करत त्यांना तोंड दिले होते. आता ते सनातन धर्माच्या रक्षकांची फौज बनले आहेत. हे नागा साधू विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करुन व तपश्चर्या करुन स्वतःला सक्षम बनवतात. त्यांना विविध प्रकारच्या नियमांचे पालन करावे लागते. पहिल्या दोन तीन वर्षात त्यांना आखाड्यांचा इतिहास, त्याच्या परंपरा, त्यांच्या गुरुजनांचे जीवन जगणे समजून घ्यावे लागते. त्यांचे गुरुजन आपला चेला किती सक्षम आहे त्यावर पाळत ठेऊन असतो. आपला चेला कुठल्या मोहमायेत तर जात नाही ना यावरही गुरुची पाळत असते. या सर्व परिक्षणानंतरच त्याला दिक्षा दिली जाते. त्याला पंच परमेश्वर चोटी गुरु, विभूती गुरु, रुद्राक्ष गुरु, भगवा गुरु आणि लंगोटी गुरु दिक्षा देतात. हा काळ नवीन नागासाठी फार खडतर असतो. या काळात गुरुजन त्याला घरवापसीसाठी तीन वेळा संधी देतात. जे टिकून राहतात ते साधू बनतात. त्यासाठी गुरुच्या सल्ल्यानुसार त्यांना पहाटे ४ वाजता गंगास्नान करावे लागते. त्यानंतर त्याची शेंडी कापली जाते, त्यानंतर त्याचे मुंडन होते, १०८ वेळा डुबकी स्नान केले जाते व नंतर त्याला आपल्या १०८ पिढ्यांसह स्वतःचे ‘पिंड' दान करावे लागते. त्यामुळे त्यांना आपल्या शरीरासह कशाचाच मोह राहत नाही. ते कोणत्याही संकटास सामोरे जाण्यास तयार असतात. ते हिमालयातील गुंफामध्येही राहण्यास तयार असतात व राहतात देखील. अशा लोकांनाही प्रदुषणाने सोडले नाही, अनेकांना त्वचा, घसा यांच्या नाना आजारांनी पछाडले आहे. याला जबाबदार कोण?
सरकारला अंदाज होता की, ४०-५० कोटी लोक या पर्वाचा लाभ घेण्यासाठी येतील. सरकारने आपली पाठ थोपटतांना सांगितले की, जरी ४०-५० कोटी लोक येणार नसले तरी, आमची तयारी १०० कोटी लोकांच्या सोयीसाठी सक्षम आहे. पण खरी व्यवस्था ४०-५० लाखांच्याच लोकांची आहे, असे तेथे जाऊन आलेले सांगतात. त्यातही विविध आखाड्यातील लोक, व्हि.आय.पी. लोक, विविध धर्मगुरुचे चेले चपाटे. काही तथाकथित निमंत्रित मंडळी, विविध देशातील निमंत्रित यांच्यासाठी व्यवस्था ठिक पण सामान्यासाठी नेमकं काय?
संसाराचा त्याग करणाऱ्या साधूंची दिनचर्या कठीण असल्याचे बोलले जाते, जे काही प्रमाणात सत्यही आहे. पण त्याहीपेक्षा कठीण आहे तो गृहस्थाश्रम. जो सामान्य माणूस सांभाळत आहे. तो दिवसभर काबाडकष्ट करुन, आपले माता-पिता, पत्नी-मुले यांचे जतन व पालनपोषण करतो. त्यांच्या गरजा पुरवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो, स्वतःसह कुटूंबासाठी कठीणात कठीण समस्येला सामोरे जाऊन समस्येचे समाधान करतो ही साधना किती मोठी आहे. याला तुलनाच नाही.
आता कुंभ मेळ्यानंतर बरेचसे नागा साधू हिमालयातील गुंफामध्ये निघून जातील. दिगंबर साधू समाजात राहतांना शिलाई न केलेले कापड धारण करतात. त्यांची दिनचर्या पहाटे तीन वाजता सुरु होते. ते आपले भोजन स्वतःच बनवितात आणि चोवीस तासामध्ये एकदाच भोजन करतात.
जुना आखाडाचे आंतरराष्ट्रीय प्रववता आणि द्धेश्वर पीठाधीश्वर महंत नारायण गिरी सांगतात की, देशातच नाही तर परदेशातही डॉवटर, इंजिनियर, आय आय टी, वकील व इतर उच्च शिक्षित तरुणही संन्यास घेऊ लागले आहेत. ते सांगतात की, या महाकुंभात नागा संन्यासी होण्यासाठी जुना आखाड्यात ८००० पेक्षा जास्त लोकांनी संन्यास घेतला आहे. त्यातही तरुण-तरुणी मोठ्या संख्येने नागा साधू झाले आहेत. ही साधू मंडळी सांगतात की, त्यांनी आत्मिक समाधानासाठी हा मार्ग निवडला आहे. काही प्रमाणात हे खरेही असेल, पण मुद्याचा भाग असा आहे की, सध्याचे जीवनमान जगणे सर्व सामान्यंना फार जिकिरीचे झाले आहे.
उच्च शिक्षण असूनही मनासारखा जॉब मिळत नाही किंवा मिळाला तरी तो टिकेल याची खात्री नाही. कारण सरकारने टिकणाऱ्या नोकऱ्याच बंद केल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कंत्राटी कामगाराकडून काम करुन घेतले जात आहे.
पूर्वी कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी ‘युनियन' निर्माण केली जात असे. कामगारांची कोणत्याही प्रकारची पिळवणूक होणार नाही याची काळजी युनियन घेत असे, कामाचे तास निश्चित असायचे. जास्त कामासाठी जास्तीचे वेतन दिले जायचे. शिवाय वर्षाकाठी बोनस मिळत असे, आता हे सर्व इतिहास जमा झाले आहे. आता कोणी धन्नाशेट म्हणतो कामगाराने आठवड्याला ७० तास काम करावे कोणी म्हणतो ९० तास काम करावे, हे कामगारांच्या क्षमतेच्या बाहेरचे आहे.
सर्वांकडे स्वतःची अशी पूंजी नाही, ज्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरु करतील. सरकार म्हणते, ‘आम्ही कर्ज देऊ' पण, कर्जासाठी जामिनदार कोठे शोधणार? दुसरा मुद्दा जामिनदार दिला तर व्यवसायास लागणारी सर्व रवकम मंजूर होत नाही. अर्धवट रकमेत काहीच करता येत नाही, त्यामुळे तरुणाई या संसारिक आयुष्यातून बाहेर पडतांना दिसत आहे. त्यांना आयुष्य जगण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे साधूगीरी हा वाटत आहे. खरं तर हा त्यांचा जीवन जगण्याचा पळपूटा मार्ग आहे. पण, करणार काय, सध्या तरुण-तरुणीची, सरकारने गळचेपी केली आहे. त्यांची गत ‘आई खाऊ घालीना, आणि बाप भीक मागू देईना' अशी झाली आहे.
सर्वजण धर्माच्या व पुण्यांच्या लाभासाठी धावत आहेत. ते सारासार विवेकबुध्दी गमावून बसले आहेत. नदीचे पाणी वहाते असते, त्यात काहीही थांबून राहत नाही, मग हजारो वर्षापूर्वी नदीत पडलेले अमृत थांबले असेल का?
मानवाने देशातील सर्वच नद्यांना प्रदूषित केले आहे, त्यांना गंगा-यमुना-सरस्वती या नद्या अपवाद असतील? उलट या नद्यात पवित्रतेच्या नावाखाली अपवित्रताच टाकली जाते. त्यासाठी आत्मनिर्मळ होणे गरजेचे आहे. - भिमराव गांधले