वृद्धाश्रम नव्हे, केअर सेंटर.....
पूर्वी वृद्धाश्रम म्हटलं की गरीब बिचारी म्हातारी माणसं....घरी नको म्हणून ईथे आलेली..किंवा आणून सोडलेली...असंच मनात येतं असे.. आता मात्र समाज बदलत आहे. तशी परिस्थितीपण बदललेली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे वृद्ध माणसांना घराबाहेर राहावे लागत आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या संस्था निघत आहेत. त्यांना केअर सेंटर असे नांव दिले जातं आहे आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळतात. ते आनंदी कसे राहतील हे पण बघतात.
अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात. काही तिथेच रहायला आले आहेत. तिथे भरपूर झाडं होती, कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता. एका ओळखीच्या आजींचा वाढदिवस होता. आजींना भेटावं व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले. तिथल्या खोल्या बघितल्या. कॉट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. कॉलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.
खोल्याखोल्यांतुन मी चक्कर मारली. स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या...सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला.. बोलायला...उत्सुक होते...एक-एकजण आपली कहाणी सांगत होते. आजी म्हणाल्या..."अगं आमचे हे अचानक गेले...दोन्ही मुलींची लग्न झालेली.. घरात मी एकटी कशी राहणार.. यावर माझ्या मुली म्हणाल्या ”आई तुला वाटेल तसं तु आमच्याकडे येऊन राहत जा. त्यांच्या संसारात माझी लुडबुड नको वाटली बघ..शिवाय संकोचही वाटतो...म्हणून मी ईथे आले. आमचं दादरला घरं आहे....नातवाचं लग्न झालं...माझी खोली त्याला दिली... मी घरच्यांना म्हटलं मला इथे ठेवा...ऊगीचचं लांब कुठेतरी मोठं घर घेऊ नका..शिवाय त्यासाठी कशाला ईतका पैसा घालायचा?
या वयातही मुला बाळांची काळजी, त्यांच्या पैशाचा विचार करणारी एक विचारी आजी मला सांगत होती..."आम्हाला तर मुल बाळचं नाही...भाचे-पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी..साठीला आले. त्यांचाही संसार आता वाढलेला आहे. त्यांचे त्यांना व्याप आहेत. म्हणून आम्ही दोघे ईथे आलो आहोत”
"माझी नातसून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात....दमून जाते बिचारी..माझं अजून एक ओझं तिच्यावर कुठे घालू गं....माझा मुलगा सुन परदेशी गेले आहेत.....लेकीचं बाळंतपण करायला.. म्हणून काही महिन्यांसाठी मी इथे आलो आहे....”
एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते. दुसरे आजोबा सांगायला लागले.. "माझी एकुलती एक मुलगी आहे. ही गेल्यास तीच मला संभाळते. मुलीला चार महिन्यांसाठी ऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले. म्हणून तोपर्यंत मी इथे आलो आहे. ईथे असलो की तीला काळजी नाही. काही झालं तर लगेच डॉक्टर दवाखाना याची सगळी सोय आहे.”
प्रत्येकाकडे एक एक कारण होते.....इथे येण्याचे...मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता. ईतक्यात एक मुलगा सांगत आला ...”चला... चला खाली तयारी झाली आहे ....”
एक आजी मात्र थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या. शांत शांत होत्या. "अग या कालच आल्या आहेत.” एकीनी सांगितलं.
दुसऱ्या आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या "पहिले काही दिवस असंच होतं हं...मग हळूहळू होईल तुम्हाला सवय ..ओळखी होतील...चला आता खाली.” असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या. खालच्या पार्किंगमध्ये थोडी सजावट केली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. आधी सर्वजण उभे राहिले. आणि सगळ्यांनी मिळून,
"निशंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे”
हा स्वामींचा मंत्र म्हटला. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.
आजी जरीची साडी नेसुन आलेल्या होत्या. त्यांनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून "हॅपी बर्थडे टु यु” चा गजर केला...नव्वदीचे आजोबा "जीवेत शरद शतम्...” असा आशीर्वाद देत होते.
डिशमध्ये केक, वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले. गप्पा मारत मजेत खात होते. "झालं नं खाणपीणं....आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीणबाईंनी सांगितले.
एका आजोबांसमोर पेटी आणुन ठेवली. टाळ, चिपळ्या आल्या. गाणी सुरू झाली.....मग मात्र एकच धमाल सुरू झाली. पंच्याऐंशीच्या आजी "सोळावं वरीस धोक्याचं गं..सोळाव वरीस धोक्याचं..” ठेक्यात म्हणत होत्या.
"पाऊले चालती पंढरीची वाट..
सुखी संसाराची सोडुनीया गाठ..”
सुरू झालं.. तसे सर्वजण ऊठले गाणं म्हणतं..टाळं वाजवत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.
मी प्रसन्न मुद्रेने हे बघत होते. अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या.. समंजस आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला... वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्याशाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते.....खरं सांगू? हे वाटतं तितकं सोपं नाही...मोह, माया इतकी लगेच सुटत नाही...भरल्या घरातून इथे यायचं..फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं....आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे इथे आले होते.....
तरीपण....यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते....कारण घर ते घरंच असतं..हे वरवर सोपं दिसलं तरी फार अवघड आहे...अनोळखी लोकांना आपलं मानायचं...त्यांच्याशी जुळवून घ्यायचं तेही या ऊतारवयात....पण हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले....वाटलं...येत जावं इथं अधून मधून...आपलेही पाय जमिनीवर राहतील...घरात राहून आपण छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही....
ईतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला..गाऊन घातलेल्या आजी... "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा......आई मला नेसव शालु नवा...” म्हणत होत्या..माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं....त्या नादमयी वातावरणाला एक छोटीशी.... कारूण्याची झालर आहे हे आतल्या आतं मला कुठेतरी जाणवत होते...मात्र ती झटकून या क्षणी ते आनंद घेत मन रमवतं होते.... त्यांचा ऊत्साह बघुन म्हटलं..
"वाह क्या बात है...
असेच मजेत आनंदात रहा..
परत येईन भेटायला...”
-नीता चंद्रकांत कुलकर्णी