महादोषांचे गिरिवर। रामनामे नासती
खोटे बोलणे, चोरी करणे, दारू पिणे, हिंसा करणे, आणि व्यभिचार हे पाच महादोष सांगितले आहेत. भगवंताने त्यांना नरकाची द्वारे म्हटले आहे. त्यांच्यामुळे मनुष्य अधोगतीला जातो. पण निरंतर नामस्मरणाने महादोषांचा नाश करता येतो.
जयाचेनि नामे महादोष जाती।
जयाचेनि नामे गती पाविजेती।
जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७१।
ज्याच्या नामोच्चाराने जन्मजन्मांतरीचे महाभयंकर दोष दूर होऊन साधकाला सद्गती लाभते आणि ज्याच्या नामस्मरणाने सहजगत्याच पुण्यसंचय होत जातो त्या श्रीरामाचे चिंतन नित्यनेमाने सुप्रभाती करीत जावे. समर्थांनी आधी रामाचे रूप, रामाचे गुण यांचे वर्णन केले. आता ते रामनामाचा महिमा सांगत आहेत. ह्या घोर संसाररूपी अरण्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही षड्रिपूरूपी भयंकर श्वापदे माणसावर नित्य आक्रमण करत असतात. कधीकधी दबा धरुन बसलेली असतात आणि अचानक हल्ला करून मनुष्याला अक्षरशः मातीत लोळवतात. त्याच्या आयुष्याची धूळधाण करतात. हे सहा विकार महादोषांचे मूळ आहेत. खोटे बोलणे, चोरी करणे, दारू पिणे, हिंसा करणे आणि व्यभिचार हे पाच महादोष सांगितले आहेत. भगवंताने त्यांना नरकाची द्वारे म्हटले आहे. त्यांच्यामुळे मनुष्य अधोगतीला जातो. पण निरंतर नामस्मरणाने ह्या महादोषांचा नाश करता येतो. महादोषयुक्त मनुष्य स्वतः तर भ्रष्ट होतोच पण समाजजीवनही भ्रष्ट करतो. मात्र अति मलीन, अति अपवित्र अंतःकरण असलेल्या अशा माणसाचाही उध्दार होऊ शकतो अशी ग्वाही समर्थ या श्लोकांतून देत आहेत. "नाम स्मरे निरंतर। ते जाणावे पुण्य शरीर। महादोषांचे गिरिवर। रामनामे नासती”। श्रीराम । (दाबो४-३-२२)
"तुका म्हणे नाम। ज्याचे नाशी क्रोध काम। हरे भवश्रम। उच्चारिता वाचेशी” नित्यनेमाने भगवंताचे नामस्मरण केले तर अंतःकरणातील मल नाहीसा होतो. नित्य नामस्मरणाने ह्रदयस्थ परमात्मा जागृत होतो. तो कृपावंत भगवंत आपल्यातील दुष्ट प्रवृत्तींना रोखतो, सत्प्रवृत्ती जागृत करतो. विवेक जागृत करतो. आपले मन दुष्कर्म करण्यापासून निवृत्त होते. सत्कर्मात प्रवृत्त होते. जागा झालेला विवेक आपले अधःपतन होण्यापासून रोखतो. भगवंत अशा प्रकारे आपल्याला सावरतो. सांभाळतो. दुष्कर्म सोडून मनुष्य सत्कर्म करू लागतो. त्यामुळे सहाजिकच त्याचा पुण्यसंचय वाढत जातो. पुण्याचा मोठा ठेवा जमा झाल्याने त्याला उत्तम गती लाभते. त्याच्या पुण्याईमुळे फक्त त्याचाच उध्दार होतो असे नाही, तर त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. त्याच्या पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते.
"हरीपाठकीर्ती मुखे जरी गाय। पवित्रचि होय देह त्याचा। मातृपितृभ्राता सगोत्र अपार। चतुर्भुज नर होऊनि ठेले”(ज्ञान.हरिपाठ १७) "जो करी विषयांचे ध्यान। तो होय विषयी निमग्न। जो करी माझे चिंतन। तो चैतन्यघन मीचि होय” (ना.भाव.१४-३४९) सर्व संत अगदी खात्रीने सांगतात की भगवंताच्या केवळ नामोच्चाराने पापांच्या राशी भस्म होतात, अपार पुण्य गाठी जमा होते, स्वतःसोबत गोत्रजांचाही उध्दार होतो. जो हरिचे चिंतन करतो तो हरिमयच होऊन जातो. आपल्या पितरांसह चतुर्भुज विष्णुरूप होऊन राहतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "नाममंत्रजप कोटी जाईल पाप। रामकृष्णी संकल्प धरूनि राहे”(हरिपाठ २७) भगवंताच्या नामात मंत्राचे सामर्थ्य आहे. नाममंत्रजपाने कोटी कोटी पापांचा नाश होतो. म्हणूनच राम कृष्ण हरी ह्या नामाच्या संकल्पाला धरुन राहावे. त्याच्या बळावरच माणसाला सुख समाधान लाभते. मनःशांती लाभते. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, ”नामस्मरणाने महादोष जातात इतकेच नव्हे तर त्यामुळे मनुष्याला प्रगतीचा, उध्दाराचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो.त्या मार्गाने जाण्याची आवड निर्माण होते आणि त्या मार्गाने चालण्याची शक्तीही प्राप्त होते.” प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो उत्तम प्रगती करतो. यासाठीच सदा, नित्यनेमाने नामस्मरण करीत जावे. पहाटेच भगवंताच्या पावन नामाचे मनात चिंतन करून दिवसाची सुरवात करावी.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर