वर्तन : खासगी आणि सार्वजनिक

आताचे जग हे गतिमान आहे. त्यातही तरुण तरुणी अधिक वेगवान आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर तर जगाने कूस पालटली असून एखाद्याच्या खासगी गोष्टीही चटकन सार्वजनिक केल्या जाण्याचा वेग तर अत्यंत वाढला आहे. याला समाजमाध्यमांनी त्यांच्या परीने हातभार लावला आहे. पोलीस, सुरक्षा दले यांना ही माध्यमे अनेक अर्थांनी किफायतशीरच ठरली असून फेमस व्हायच्या नादात कुणी, कसे अलगद अडकून अडचणीत येईल याचा काहीच नेम राहिला नाही. खासगीरित्या वागण्याचे नियम निराळे; पण सार्वजनिक जीवनात वावरताना विविध अवधाने पाळायलाच हवीत.

   एक काळ असा होता, की एखाद्या महिलेला त्रास द्यायचा असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा मानसिक छळ करायचा असल्यास काही टारगट, रोडसाईड रोमिओ, छपरी लोकांकडून त्याच्या/तिच्याबद्दलचा अश्लिल, वाईटसाईट मजकूर सार्वजनिक संडासांच्या आतल्या किंवा बाहेरच्या भिंतींवर लिहुन ठेवला जाई आणि तो लिहीणारे हे विकृत मानसिकतेचे लोक लांबून मजा बघत असत. आता त्यांना तसे करण्याची गरजच उरली नाही. कारण अनेक महिला स्वतःहुनच कसलेमसले कपडे परिधान करत, आपल्या अल्पवयीन मुलींनाही छचोर, उच्छृंखल वाटतील असे कपडे घालून नटवीत, सजवीत असतात आणि जाहीर कार्यक्रमांतून नाचकामांसाठी पाठवीत असतात. विशेष म्हणजे तेथील काही बुभुक्षित पुरुषांच्या नजरेस आपण खाद्य पुरवीत आहोत, आगामी संकटांना आमंत्रित करीत आहोत, हे या बायकांच्या गावीही नसते. काही सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित काही मंचीय कार्यक्रम, गणेशोत्सव मंडळांच्या नृत्ये, वेशभूषा स्पर्धा, विविध स्वयंसेवी संस्था-मंडळांचे वर्धापन दिन-पारितोषिक वितरण सोहळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग येत असतो. ज्या बालिका इयत्ता तिसरी, चौथीत आहेत, ज्यांना अजून प्रणय, शृंगार, मादकता, कामुकता यांचा गंधही नाही व त्या वयात तसले काही समजण्याची गरजही नाही; तरीही त्या त्या मुलींच्या दीडशहाण्या माता त्या मुलींचे ओठ लालचुटुक रंगवतात. पोट, बेंबी, कंबर  दाखवणारे कपडे त्या बालिकांच्या अंगावर चढवून त्यांना नटवून रंगमंचावर धाडतात आणि त्यांचे तेथील आविष्कार कृतकृत्य नजरेने पाहतात. या नालायकपणाला काय म्हणावे? ‘चिकनी चमेली फव्वा चढाने आयी, ‘मेरा पिया घर आया ओ रामजी', ‘बिडी जलाईले', ‘तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं ही' व असली फालतू  गाणी आणि त्याबरहुकुम तद्दन बाजारी हावभाव हे सज्जन, कुटुंबवत्सल परिवारातील सदस्यांसाठी नसतात. अजाण बालक-बालिकांसाठी तर अजिबातच नसतात आणि असल्या हावभावांचे सार्वजनिक ठिकाणचे आविष्करण तर अजिबातच केले जायला नको. पण अनेक ठिकाणी हे असलेच काहीतरी पाहायला मिळते. अनेक चांगले, दर्जेदार, प्रभावी आविष्कारही अशा सार्वजनिक पाहायला मिळतात; नाही असे नाही. पण बाजारी प्रकारांचे प्रमाणच अधिक!

   कसला संबंध कसल्याशी जोडु नये खरंतर! पण अनेक नालायक, स्त्रीलंपट, वखवखलेल्या नजरेने अनेक वासनाविकारी लोक अवतीभवती वावरत असतात. त्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असे कसल्याच प्रकारचे प्रोत्साहन, उत्तेजन मिळू नये यासाठी साऱ्या माता-भगिनींनी झटायला हवे. पण वास्तवात वेगळेच पाहायला मिळते. नुकताच बदलापूर बालिका अत्याचार व हत्याकांड प्रकारातील गुन्हेगाराला पोलीसांनी ठार मारल्यावरुन न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पू्‌र्ण होऊन त्याला रीतसर शिक्षा व्हायला हवी होती, या मागणीपर्यंत ठीक आहे. पण अन्याय करुन मुलींची हत्या करणाऱ्यावरच ‘अन्याय झाला' असे म्हणत गळा काढणाऱ्यांची, अत्याचाऱ्याचीच सार्वजनिकरित्या, प्रसारमाध्यमांवरुन वकीली करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. वाल्मिक कराड हा निष्पाप, निरागस, संतमहात्मा, सज्जन, प्रामाणिक, नाकासमोर चालणारा, कायद्याला धरुन वागणारा महान विभूती असून केवळ काही कोटी रुपयांचीच नामी-बेनामी मालमत्ता असणाऱ्या, केवळ काहीजणांच्या मारहाणीला कारण असणाऱ्या त्या बिचाऱ्याचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कसलाही संबंध नाही म्हणणारे समर्थक आहेतच की! त्याच्या अटकेविरोधात ते घराबाहेर पडून जमाव जमवून ‘रास्ता रोको, शहर बंद'चे कारनामे कसे करतात हे आपण पाहात आलो आहोत. बाहेर असे अत्यंत खराब, प्रदूषित सार्वजनिक वातावरण असताना घरंदाज महिला-मुलींची, त्यांच्या पालकांची जबाबदारी वाढते, समाजाची जबाबदारी वाढते. ‘निकलो ना बेनकाब..जमाना खराब' है अशी पंकज उधास यांनी गायिलेली गझल आहे, ती सद्यस्थितीला बरोबर लागू पडते.

   चांगले वर्तन, चारचौघातील आत्मविश्वासपूर्ण वावर, आदबशीर-आटोपशीर बोलणे, चांगली वस्त्रे परिधान करणे, दर्जेदार आवडी-निवडी जोपासणे यासाठी संस्कारांची आवश्यकता असते व ते संस्कार ज्याला-त्याला आपल्या घरातूनच मिळतात. पण अनेकदा असेही होते की खूप चांगल्या, संस्कारी, सुशिक्षित घरातून आलेल्या व्यवतीही चरित्र्यहीन, जेमतेम दर्जाची, मामुली किंवा कमजोर मनोवृत्तीच्या निघतात. महाराष्ट्रातील एका नामांकित आय ए एस जोडप्याच्या मुलाने नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचे उदाहरण सर्वांना ठाऊक असेलच! एका थोर समाजसेवकाच्या डॉक्टर असलेल्या नातीने विषारी  इंजेक्शन टोचून घेत आपले जीवन संपवल्याची घटना सर्वांना हादरवून गेली होती. विख्यात मराठी गायिकेच्या मुलीनेही बंदी घातलेलं औषध घेऊन आपला जीवनप्रवास संपवला होता. वाशीमधील एका नामांकित महाविद्यालयाच्या तत्कालिन कार्यकुशल, सेवारत प्राचार्यांच्या मुलाला साधे एस एस सी ही होता आले नव्हते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बोलताना त्या प्राचार्यांना न्यूनगंड येई. माझ्या पाहण्यात अशा महिलाही आहेत की त्यांच्या वडिलांचे तसेच पतीचे वेतन, कमाई, मालमत्ता समाधानकारक असूनही त्या महिलांना दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्याचा, ढापण्याचा, पळवण्याचा नाद आहे. त्यांना तसे करा हे ना माहेरच्यांनी शिकवले..ना सासरच्यांनी. पण चोऱ्या करण्याची सवय त्यांना जडली. मात्र त्या सराईत किंवा पेशेवार चोर नसल्याने त्यांच्या चोऱ्या इतर नातेवाईकांच्या, शेजाऱ्यांच्या लक्षात येत. याचे मात्र त्या महिलांना काहीच वाटत नसे. पण त्यांचे पति तसेच इतर नातेवाईकांना याची शरम वाटे. यामुळे होई काय, की दूरचे विवाहसमारंभ तसेच आठवडा किंवा त्याहुन अधिक लांबच्या सहली जेथे मुक्कामाची गरज असे तेथे या महिलांना त्यांचे पति घेऊन जात नसत. कारण चोऱ्या करण्याची, मौल्यवान वस्तू लांबवण्याची अधिक शक्यता अशा ठिकाणी असते. त्यामुळे त्या चोर महिलांच्या घरच्यांवरही सार्वजनिक जीवनापासून काहीसे अलिप्त राहण्याची वेळ आली.

   अनेकदा असेही घडते की स्थानिक विरुध्द बाहेरचे वाद उफाळून येतात. मुंबई कुणाची, नवी मुंबई कुणाची, ठाणे कुणाचे? महाराष्ट्र कुणाचा असे त्या वादांचे स्वरुप असते व यातून पार मारामाऱ्या, मोडतोड, पोलीसी कारवायांर्यंत प्रकार जातो. कल्याणच्या अखिलेश शुक्लाला तर यामुळे सरकारी नोकरीतून निलंबित होत पुढचे दिवस जेलमध्ये काढायची वेळ आली आहे. कुणीही कुठलाही असो, त्याला सार्वजनिक जीवनात निर्धोकपणे वावरता आले पाहिजे. नाहीतर "महाराष्ट्राचा बिहार किंवा युपी झाला" असे म्हणणाऱ्यांना मोकळे रान मिळते. हा वाद महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यांतही आहेच म्हणा! याशिवाय आपल्याच महाराष्ट्रात या जिल्ह्यातले विरुध्द त्या जिल्ह्यातले, मराठवाडावाले विरुध्द विदर्भातले, कोकणी विरुध्द घाटी, हिंदु विरुध्द मुसलमान, खान्देशी विरुध्द अन्य, मुंबईकर विरुध्द पुणेकर..हे तर काहीच नाही..गावातल्या गावातच वरची आळी विरुध्द खालची आळी इतक्या निम्नस्तरावरील वाद, टोकदार अस्मिता, जातकारण, धर्मकारण, प्रादेशिकता पाहायला मिळते. काही महानगरांतून तर गाववाले विरुध्द कॉलनीवाले-सेक्टरवाले असेही वाद सार्वजनिकरित्या उफाळून येतात.

   अनेकदा गावातला भाऊ गावातल्याच त्याच्या सख्ख्या भावाला-वहिनीला-पुतण्याला त्यांच्या आजारपणात भेटायला सुध्दा जात नाही. भावाकडे राहात असलेल्या आपल्या जन्मदात्या माता-पित्याची साधी चौकशी करायला यांना वेळ नसतो. पण हे दोघेही मिळून कॉलनीतल्या अ-मराठीयांसह इतर मराठी कुटुंबांची टवाळी करण्यात मात्र आघाडीवर असतात. बरं हे नोकरी धंद्यासाठी-पोटापाण्यासाठी कुठे जातात? तर कॉलनीतल्याच लोकांच्या कंपनी, उद्योग, व्यवसायात. महानगरातील विविध कंपन्या, मॉल्स, सभागृहे, डिपार्टमेण्टल स्टोअर्स, कॉम्प्युटर क्लासेस, सलून्स, ब्युटी पार्लर्स, आय टी उद्योग, मोठमोठी दुकाने, एमआयडीसीतील युनिट्‌स, मोठमोठाली हॉस्पिटल्स, थिएटर्स कुणाचे? तर बऱ्याचदा गावाबाहेरच्याच लोकांच्या मालकीचे ! गावांतल्या अनेकांचे घर प्रामुख्याने कुणाच्या पैशांवर चालते? तर राज्याच्या व परराज्यातल्या  लोकांनी भाड्याने घेतलेल्या घरांच्या भाड्यावर! तरी त्यांच्याकडे बघण्याची यांची नजर मात्र तुच्छतादर्शक! याला कारण काय? तर निव्वळ अडाणीपणा व काळाची पावले ओळखण्याची नसलेली नजर, सार्वजनिक जीवनात निकोपपणे, खुल्या मनाने, जिंदादिलपणे वावरण्याचा व आपला विभाग सोडून अन्यत्र जाण्याच्या मानसिकतेचा असलेला अभाव किंवा न्यूनगंड! गावाच्या वेशी ओलांडून महानगरात, अन्य जिल्ह्यांत, राज्यात, परराज्यांतही तसेच देश विदेशातही मोठ्या प्रमाणावर (केवळ एक-दोन निवडक उदाहरणांपुरते नव्हे!) सिमोल्लंघन करण्याची, झेप घेण्याची उमेद त्यांच्यात दिसावी यासाठी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपले नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खाजगी असो वा सरकारी शिक्षण संस्थान, शिक्षणाचा दर्जा असावा एक समान (२४ जानेवारी : आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन )