मिठाईची जागा ‘केक' घेत आहे का ?

आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेण्यासाठी मिठाई वाटून इतरांचेही तोंड गोड करण्याची पद्धत अगदी पुराणकाळापासून चालत आलेली आहे. पूर्वीचे राजे महाराजे आनंदाच्या क्षणी प्रजेला हत्तीवरून मिठाई वाटत असत. मिठाईचे सतराशे शहाण्णव प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. देवी-देवतांच्या उत्सवांना नैवेद्य म्हणून ५६ भोग देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. उत्तर भारतात ही परंपरा आजही उत्साहाने जपली जाते. मुळात केक कापणे ही आपली संस्कृती नव्हे. भारतीय हिंदू संस्कृतीनुसार शिजवलेल्या अन्नावर शस्त्र फिरवणे अशुभ मानले जाते आणि आनंदाच्या क्षणीच आपण नकळतपणे अशुभ कार्य करतो.

आनंदाचे क्षण हे साजरे करण्यासाठीच असतात. इतरांचे तोंड गोड करून आपला आनंद साजरा केल्याने त्यामध्ये इतरही सहभागी होतात ज्यामुळे वातावरणात आनंद लहरी पसरून वातावरणही आनंददायी होते. त्यामुळे आनंद साजरा करण्याची प्रथा जगभरात सर्वच प्रांतांत दिसून येते.

आजमितीला बहुतांश पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये घालतात. आपले मूल कमावते झाल्यावर स्पर्धात्मक जगात ते मागे राहू नये. इंग्रजीवर त्याचे प्रभुत्व असावे यासाठी हा सारा खटाटोप असतो. केवळ इंग्रजीवर प्रभुत्व राहावे या उद्देशाने मुलांना कॉन्व्हेंट शाळांत घालणारे पालक संपूर्ण शालेय जीवनात पाल्यांवर कोणत्या संस्कृतीचे संस्कार होणार आहेत याबाबत मात्र अनभिज्ञच असतात. बहुतांश कॉन्व्हेंट शाळा या ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवण्यात येत असल्याने या शाळांमधून ख्रिस्ती पंथांचे संस्कारच अधिक केले जातात. या शाळांमध्ये मुलांना कपाळाला तिलक लावण्यास, गळ्यात देवतांचे चित्र घालण्यास मज्जाव केला जातो, मुलींनी कपाळाला बिंदी लावणे, हातांना मेहेंदी लावणे, बांगड्या घालणे यांवर बंदी घातली जाते, मुलींना गुडघ्याच्या वर स्कर्ट घालण्याची सक्ती केली जाते, हिंदू सणांच्या वेळी सुट्टी न देता मुद्दामहून परीक्षा ठेवल्या जातात, गणपती-दिवाळी सणांपेक्षा येथे ख्रिसमस अधिक उत्साहात साजरा केला जातो, आनंदाचे क्षण केक कापून आणि वाटून साजरे केले जातात. पाल्याच्या शिक्षणासाठी कॉन्व्हेंट शाळेची निवड पालकांनीच केलेली असल्याने तेही हे सारे निमूट सहन करतात, मुलांचे मन संस्कारक्षम असल्याने शालेय जीवनात होणारे संस्कारच त्यांच्या अंर्मनात दृढ होतात परिणामी हिंदूंचे सण, प्रथा परंपरा या मुलांना बुरसटलेल्या वाटू लागतात. संस्कृतीप्रेमी संघटनांनी अशा कॉन्व्हेंट शाळांना वेळोवेळी दिलेल्या समज यामुळे काही प्रमाणात फरक पडला असला तरी बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येते.

सध्याचे बॉलिवुड चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक येणाऱ्या वेब सिरीज या सर्वांमध्येही पाश्च्यात्य विकृतीला खतपाणी देणारी दृश्ये सादर केली जातात. यातील नट्या तोकड्या कपड्यांत, मद्यपान करताना वावरताना दिसतात, यातील नट बऱ्याचदा नास्तिक विचारसरणीचा दाखवण्यात येतो. इथे आनंदाचा क्षण मग तो नोकरी लागल्याचा असो किंवा नोकरीत पदोन्नती मिळण्याचा असो, साखरपुडा असो व लग्न असो सर्वच ठिकाणी हे क्षण मद्यपान करून आणि केक कापून साजरे केले जातात. चित्रपट आणि वेब सिरीजचा वाढता प्रभाव आणि शालेय जीवनात होणारे पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार यांचे पडसाद आता दैनंदिन जीवनावरही पडू लागले आहेत. आजचा तरुण आपले आनंदाचे क्षण मिठाई वाटून नव्हे, तर केक कापून साजरा करू लागला आहे. आनंदाचा क्षण मग तो कोणताही असो. घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल असो वा पाहुण्याचे अर्थात बाळाचे बारसे असो सेलिब्रेशन केक कापून केले जाते, नोकरी लागणे, कर्ज मान्य होणे, नोकरीत पदोन्नती मिळणे, नोकरीत मनासारखी बदली मिळणे, नवीन घर घेणे, नवीन गाडी घेणे, स्पर्धा जिंकणे, लग्न ठरवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, लग्न सर्वच आनंदाच्या क्षणी केक आणून ते कापणे आता अनिवार्य होऊ लागले आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ वर्षातून एकदा वाढदिवसाला दिसणारा केक आता आनंदाच्या प्रत्येक क्षणी दिसू लागला आहे. ज्यामुळे आता नाक्यानाक्यावर केकची नवनवीन दुकाने उघडली जाऊ लागली आहेत. आनंदाचे क्षण हे गोडधोड वाटून साजरे करण्याची आपल्या संस्कृतीतील संकल्पनाच आता कालबाह्य होऊ लागली आहे. मुळात केक कापणे ही आपली संस्कृती नव्हे. भारतीय हिंदू संस्कृतीनुसार शिजवलेल्या अन्नावर शस्त्र फिरवणे अशुभ मानले जाते आणि आनंदाच्या क्षणीच आपण नकळतपणे अशुभ कार्य करतो.

 आहारशास्त्रानुसार उत्तम आरोग्यासाठी नेहमी ताजे अन्न खावे. आनंदाच्या क्षणी तर शिळे अन्न मुळीच खाऊ नये. आनंद साजरा करण्यासाठी आणलेला केक खास ऑर्डर देऊन मागवला असला तर त्यासाठी वापरण्यात आलेला ब्रेड आणि क्रीम ताजी असते का ? आनंदाच्या क्षणी आपण केवळ पाश्चात्य संस्कृतीलाच जवळ करत नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीला..जिने सदैव मानवाच्या सर्वांगीण विकासाचाच विचार केला आहे तशा प्रथा परंपरा दैनंदिन जीवनात रुजवल्या आहेत तिचाही अनादर करत आहोत हे आपल्या केव्हा लक्षात येणार? - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुख्यमंत्र्यांनी आखलाय १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा