इतिहासात दुर्लाक्षित..पण महत्वपूर्ण किल्ला संतोषगड

 गोमुखी वास्तू रचना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली ही स्वतंत्र देणगी आहे! शत्रू चाल करून येतो! तोफा डागतो; पण दरवाजा दिसत नाही! बुरुजावर तोफा डागल्या तरी काहीही फरक पडत नाही! अशा पहिल्या दरवाज्याजवळ आम्ही जाऊन पोहचलो होतो! संतोषगडाच्या बुरुजाच्या कमानी ध्वस्त झालेल्या दिसल्या! ढासळलेल्या, पडक्या बुरुजपाशी उभे राहात इतिहास शोधून पाहात होतो.

१२ जानेवारीचा दिवस होता! इतिहासातील सुवर्णंपान असलेला दिवस होता! एका विशाल आभाळ हृदयी संस्कार पानाची याद आम्हा महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या हृदयात कोरलेली आहे! छत्रपती शिवरायांना पोलादी संस्कार देणाऱ्या स्वराज्य जननी राजामाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस होता! आऊसाहेबांची जयंती होती! हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार होण्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या, आयुष्यभर अहोरात्र  झिजणाऱ्या, झटणाऱ्या शिवरायांच्या हृदयी वास्तव उभे करणाऱ्या हिंदवी स्वराज्यजनक मातेची, राजमाता जिजाऊ माँंसाहेबांची जयंती होती! राजमातेला कोटी कोटी प्रणाम, वंदन अन हृदयातून अभिवादन करण्याचा दिवस होता! सह्याद्रीच्या कडेकपारी, गड-किल्ल्यांवर, उंच शिखरावर स्व संस्कृतीचा भगवा ध्वज फडकवणाऱ्या विश्व कुटनीतीक योद्धा, जगद्‌विख्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या माँसाहेबांची जयंती होती!
 आमच्या मनातही १२ जानेवारीला इतिहासातील जाज्वल्य राष्ट्र भक्तीची प्रेरणादायी सोनेरी पान उजाडलं होतं! आम्ही मनोमन १२ जानेवारी २०२५ च्या शुभ दिनी गड-किल्ल्यावर जाण्याचा मनोदय पक्का केला होता! मनोमन राजामाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणाशी नतमस्तक झालो होतो! एकमुखी जोशपूर्ण शब्दध्वनी निनादला होता! मानवंदना दिली होती, ‘राजामाता जिजाऊं माँसाहेब की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय!' आम्ही माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्त सळसळणाऱ्या शौर्यप्रतीक शक्तीस्थळी निघालो होतो! सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील ताथवडा गावाजवळ असलेल्या इतिहासात दुर्लाक्षित पण महत्वपूर्ण किल्ला संतोष गडावर जाण्याचं ठरवलं होतं! अन निघालोही होतो! माँसाहेबांच्या जयंती निमित्त धमनीत श्वास भरला होता! साहसी ट्रेकिंगला निघालो होतो!

 हिवाळ्याचे दिवस आहेत! प्रचंड थंडी आहे! रात्री कुडकूड, हुडहूड थंडी अंगाला झोबंते आहे! सकाळी उत्साह घेऊन कामाला लावते आहे! दुपारी उनदेखील घाम काढण्यासाठी आतुर आहेटपण थंडीच्या रेट्यात सध्या तरी उन्हाची डाळ शिजत नाहीये! चौफेर शेती दिसतेय! उभे ऊस, ज्वारीसारखें पिक डोकं वर काढून शेतांची शोभा वाढवताहेत! रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळच्या हूडहूड थंडीत आम्ही ६४ मावळे निघालो होतो! आमच्या दोन बस पुण्याहून निघाल्या होत्या! जातांना वाल्मिकी ऋषींच्या पावन स्पर्शाने पुनीत वाल्हे गावी जाऊन संजीवन समाधीच दर्शन घेतलं! पूर्वेला सकाळचा कोवळा सूर्य नारायण क्षितिजावरून वर येत होता! मनातले नकारात्मक विचार सूर्योदयास गळू लागले होते! आम्ही प्रसन्न,उत्साही, आनंदी अन जोशात होतो! सुंदर सकाळी स्वच्छ निर्मळ विचारांनी मनात प्रवेश केला होता! भूपाळी कानी पडत होती! बस पुढे लोणंद मार्गे पळत होती! घोड्यांच्या टाप्पांनी अंगात शौर्य संचारावं तसंच बसच्या आवाजात आम्हीदेखील निघालो होतो! भयाला दूर लोटून प्रचंड ऊर्जा स्त्रोत अंगी असल्याच्या इराद्याने किल्ला मोहिमेला निघालो होतो! आमचा प्रवास सुरूचं होता! मोहिमेचे कॅप्टन आदरणीय वसंतराव बागूल सर नेतृत्व करीत होते! रस्ता मागे जात होता! आम्ही ऐतिहासिक शिवकालीन वारसास्थळी किल्ल्याकडे निघालो होतो!

चौफेर हिरवीगार शेती दिसत होती, तूरळक झाडांनी वेढलेल्या जंगलातून प्रवास सुरू होता! धुकं कापसासारखं हवेत तरंगत होतं! आम्ही सह्याद्री पर्वत रांगेत उंच डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहचलो होतो! संतोष गडाच्या पायथ्याशी जाऊन पोहचलो होतो! छत्रपती शिवराय आर्ग्याहून आल्या पासून एक एक गड जिंकत राहिले! आदिलशाह कडून जिंकलेला अन स्वराज्याचीं शक्ती, ताकद वाढवणाऱ्या किल्ल्यांपैकी एक असलेला ताथवाड्याच्या अर्थात संतोष गडावर निघालो होतो!

आयुष्यभर तेजपुंज संस्कारप्रकाश देणाऱ्या,स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजमातांच्या जयंतीदिनी आम्ही  संतोषगडावर गेलो होतो! आम्ही ताथवडा गावात पोहचलो! तेथून चालत गडाच्या पायथ्याशी उभे राहून किल्ल्याच्या शिखराकडे पाहत होतो! समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंच असलेला किल्ला आम्हास शिवकालात घेऊन गेला! किल्ला चढून जायला केवळ २०-२५ मिनिटे इतका सहज चढून जाण्यासारखा किल्ला पाहून अंगात वाटले... कितीही अवघड परिस्थिती आली तरी मावळ्यांनी कधीही माघार न घेता जिंकण्यासाठीच जीवाची बाजी लावलेले किल्ले नेहमीच श्वासात, रक्तात स्फूर्ती भरत असतात! आम्ही पायथ्याला माथा टेकवून चढाईला सुरुवात केली होती! ‘चढाई शिवाय लढाई जिंकता येत नसते!' ही छत्रपती महाराजांची शिकवण हृदयात जपून मार्गस्थ झालो होतो! दुरून किल्ल्याची तटबंदी दिसत होती!

आमची चढाई सुरूच होती! धमनीत श्वास वरखाली होत होते! सह्याद्रीच्या छातीवरील भक्कम तटबंधी शक्तीचं प्रतीक आहे! कणखर काळ्या दगडातील तटबंधी स्वराज्याची ताकद होती! घनदाट झाडंझूडपांच्या वेड्यवाकड्या पायऱ्यावजा चढावरून आमची चढाई सुरू होती! आम्ही संतोष गडाच्या पहिल्या दरवाज्या जवळ पोहचलो होतो! गोमुखी वास्तू रचना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली ही स्वतंत्र देणगी आहे! शत्रू चाल करून येतो! तोफा डागतो; पण दरवाजा दिसतं नाही! बुरुजावर तोफा डागल्या तरी काहीही फरक पडत नाही! अशा पहिल्या दरवाज्याजवळ आम्ही जाऊन पोहचलो होतो! बुरुजाच्या कमानी ध्वस्त झालेल्या दिसल्या! ढासळलेल्या, पडक्या बुरुजपाशी उभे राहात इतिहास शोधून पाहात होतो!

जेव्हा शक्ती-युक्ती एकत्र येते, तेथे राष्ट्रभक्ती नांदत असतें! राष्ट्र-राज्यनिष्ठा अर्पण करून प्राण त्यागणारे सैनिक-मावळे राष्ट्राचे अनमोल हिरे असतात! असेच राष्ट्र ताकदवर असते !प्रजा सुखी समाधानी असतें! शत्रू दचकून असतो! नमून असतो! घाबरून असतो! अशा शक्तिशाली हिंदवी स्वराज्याचें संस्थापक छत्रपती शिवरायांच्या भूमीचे आम्ही मावळे आहोत! आम्हाला अभिमान आहे!  आम्ही १२ जानेवारी २०२५ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातला ताथवडेचा किल्ला चढत होतो! संतोषगड चढत होतो! लोणंदहून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या संतोष गडावर आम्ही काठी टेकवून किल्ला चढत होतो! मावळे शत्रूशी लढत किल्ला चढत होते! अंगावर येणारा उभट किल्ला घोड्यावर बसून चढत होते! आम्ही दम घेत, घाम गाळत किल्ला चढत होतो!

 आम्ही पहिल्या अरुंद प्रवेश द्वारापाशी आलो होतो! शत्रूला सहज प्रवेश करता येणार नाही असं हे प्रवेशद्वार भव्य बुरुजात उठून दिसत होतं! बरंचसं बांधकाम शिवकालीन असावं! गेले साडेतीनशे वर्षं संतोषगड पाणी-पावसात, हिवाळा-उन्हाळ्यास तोंड देत स्वतःचं अस्तित्व जपून उभा आहे! पडके बुरुज, तटबंदीच्या साथीने उभा आहे! पिढ्या जातील-येथील! छत्रपती शिवरायांची ही प्राचीन बलस्थाने उभेचं दिसतील! त्या आधी कित्येक शतकं चालुक्य राजवटीत संतोषगड नव्या नवलाईने नटून थटून उभा राहिला असेल! स्वर्णिम क्षण कसा अनुभवला असेल त्यांनी? नंतर कित्येक आक्रमक आले! किल्ल्यावर प्रहार होत राहिले! आम्ही आता दम घेऊन पहिला टप्पा गाठला होता! पहिल्या प्रवेशद्वाराची पडझड झालेली दिसली! कमान नव्हती! बोडक्या दगडी भिंती भक्कमपणे मानवाला अन निसर्गाला तोंड देत उभ्या होत्या!

शतकं मागे जात राहिली! किल्ल्याचा आधार, ताकद देणारे बुरुजाचे दगड ढासळतं राहिले! किल्ल्याच्या उतारावर इतस्ततः इतिहासाची मिटलेली पाने उघडून डोळ्यांनी उघडून पाहात होतो! चालुक्य काळातील वैभव असलेल्या संतोषगडाला शेवटच्या राजसत्तेने तोफांनी उध्वस्त केले होते! इंग्रजांनी उध्वस्त केले होते! अनेक क्रांतिकारक किल्ल्यावर जाऊन लपून छपून ब्रिटिश सत्तेला आव्हान देत होते! इंग्रजानी तोफा डागून प्राचीन भारतीय गडकिल्ले उध्वस्त करून टाकले होते! प्राचीन राजसत्तेचे केंद्र नष्ट करायचा प्रयत्न केला होता! ब्रिटिशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती! आपल्याकडे पारंपरिक आयुद्ध होती! कित्येक शतकांपासून आमच्या हृदयात, काळजात अढळ स्थान बनून राहिलेले किल्ले आमचे देशाचे आत्मा आहेत! किल्ले आमची अस्मिता आहेत! आमच्या काळजात प्राचीन इतिहासातील पानं सतत चेतना देत असतात!जगण्याची उमेद देत असतात!

आम्ही एक एक पावलं पुढे सरकत होतो! ढासळलेली कमान पाहून मन दुःखी, कष्टी झालं होत! प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो होतो! एक एक पाऊल पुढे पडतांना, किल्ला चढतांना पुन्हा दुसरं अरुंद प्रवेश द्वार नजरेस पडलं! पूर्णतः गोमुखी पद्धतीचं बांधकाम दिसलं! भव्य बुरुज वास्तूशास्त्राचा सुंदर अविष्कार होता! चिलखती बुरुज गडाचा आत्मा असतो! कमानीची पूर्णतः झालेली पडझड दिसली! ताथवडेगड ताब्यात घेतल्यावर संतोषगड असे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले असावे!

वेडीवाकडी वळणं पार करीत वर गेल्यावर पुन्हा तिसरे महाद्वार नजरेस पडलं! तीन भागात विभागलेला किल्ल्यावर चढत होतो! बुरुजावरील दगडं ढासळलेली दिसत होती! महाद्वार देखील खूप मोठ्या भक्कम बुरुजात उठून दिसतं होतं! दोन्ही बाजूला पहारा देणाऱ्या सैनिकांच्या देवळ्या दिसल्या! तत्कालीन राजसत्तेच वैभव म्हणून कित्येक शतकं उभा असलेला किल्ला पाहात अंगात वेगळीचं उर्मी संचारली होती! देशप्रेम रक्तात खेळत होत! हिंदवी स्वराज्याच्या खाणाखुणा डोळ्यातून पाहात होतो! कित्येक ठिकाणी ढासळलेली तटबंधी शतकानुशतकं आपलं अस्तित्व टिकवून उभी होती! शिवकालीन किल्ल्यावर जाऊन ‘स्व' चा अर्थ समजून घेत होतो! आम्ही बालेकिल्ल्यावर पोहचलो होतो! उंच पर्वतासभोवती पडक्या स्वरूपातील तटबंधी बांधलेली दिसली होती! महाद्वारातून वरती उंच पठारावर पोहचल्यावर भव्य धान्य कोठार दिसलें! मोठंमोठया तीन खोल्यांमध्ये धान्यसाठा ठेवला जात असावा! वरती कुठलंही छत नव्हतं! सर्वत्र पडझड झालेली दिसत होती! ढासळलेंलं अन पडकं अस्तित्व आम्ही पाहात होतो! इतिहासाचं सोनेरी पान जीर्णाशिर्ण झालेलं पाहात होतो! संतोषगड वर्तमानात पाहात होतो!

 किल्ल्यावर धान्य कोठाराशेजारी सलग कित्येक खोल्या बांधलेल्या दिसल्या! कंबरेइतक्या उंच, ढासळलेल्या दगडी भिंतीतील, पडक्या खोल्या कदाचित पुरातन वाडे असतील! तेथे सैनिक, सरदार व्यापाऱ्यांचं वास्तव्य असावं, राजांचं कधीतरी येणं जाणं असेल! त्या अवशेषातून मोठं गाव वसलेलं दिसतं होतं! त्याला लागूनच राजसदर असावं! राजसदर किल्ल्याचा मुख्य महाल म्हणावं तरी चालेल! येथूनच न्यायनिवाडा अन राज्यकारभार चालत असावा! खूप मोठं अन भव्य असलेलं राजसदर नजरेत भरत होतं! संतोषगड शिवकालीन लष्करीदृष्टया अतिशय महत्वाचा गड मानला जात असावा!

जवळपास त्रिकोणी आकाराच्या ह्या किल्ल्यासभोवती भव्य बुरुज अन तटबंदी बांधलेली दिसली! ही किल्ल्याची मागील बाजू असावी! बुरुजाखालून एक चोरवाट दिसत होती! कदाचित गुमसुम भुयार असावं! आणीबाणी किंवा युद्ध प्रसंगी या भुयाराचा उपयोग होत असावा! भुयाराचं मुख सरळ एका दरीच्या उभट तोंडाशी जाऊन पोहचलेलं दिसलं! शत्रूस कळणारही नाही सरळ खोल दरीतंच पडेल! पुढे एका विशाल बुरुजाखालून दोन गुप्त रस्ते दिसलें ! एकातून निघालो की बुरुजाला वळसा घालून दुसऱ्या गुप्त रस्त्याला जोडलेली दिसली! शत्रूला चकविण्यासाठी या गुप्त वाटांचा उपयोग होतं असावा! आम्ही वास्तुकलेची चमत्कारीक रचना डोळे विस्फारून पाहात होतो!

 किल्ल्यावर बरोबर मध्यावर खूप मोठया झोपाळ्या वडाच्या झाडाखाली प्राचीन खोल दगडी विहीर दिसली! वडाच्या झाडाने झाकलेली चौकोनी आकाराची ही विहीर सुस्थितीत आहे! विहिरीत दगडातच कोरीव पायऱ्या होत्या! पायऱ्या उतरून खाली गेल्यावर खोलवर एक शिवमंदिर दिसलें! एकांत, शांत खोलवर असं हे ठिकाण होतं! मनात भीतीही वाटत होती! पशु किंवा नाग असे प्राणी तेथे राहू शकतात! आम्ही छत्रपती महाराजांचे या पिढीतील मावळे होतो! फिर डरना क्यूँ था?

विहिरीतल्या सपाट कातळावर शिवमंदिरात पिंड होती! मंदिराबाहेर नंदी नजरेस पडला! आम्ही नतमस्तक होत दर्शन घेतलं! खोली विहिरीतल्या मंदिराला लागूनचं पून्हा कातळ कोरीव पायऱ्या होत्या! त्या सरळ विहिरीत जात होत्या! प्रचंड मोठी चौकोनी विहीरचं पाणी दिसलं! विहिरीची खोली सध्या तरी माहीत नाही! तरीही तेथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोरड्या दुष्काळात किल्ल्यावरील याच विहिरीचा पाण्यासाठी उपयोग झाला होता! आता पाण्यावर शेवाळ साचलेलें दिसत होते! पाणीही हिरवगार दिसतं होतं!... दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी उंच किल्ल्यावर शिवकालीन विशाल विहीर खोदून बांधली असावी! येणाऱ्या सर्व संकटाना तोंड देता यावे इतकी विशाल दृष्टी छत्रपती शिवरायांजवळ होती!

  किल्ल्यावर जागोजागी दगडांचे अवशेष पडलेले दिसतात! ऐकावं, पाहावं, सगळं नवल वाटत असतं! चमत्कार वाटत असतं! आपल्या बुद्धी पलीकडे वाटत असतं! समुद्र पार करतांना ‘राम' नाव घेऊन रामायण काळात समुद्र सेतू बांधला असावा! संतोष गडावर देखील छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेले सुवर्ण क्षणांनी दगड रचून पुन्हा किल्ला बांधकाम बांधला असावा! आज तेच पडझड झालेले दगड शिवकालीन वैभवाची साक्ष म्हणून इतस्ततः पडलेले दिसतात! काळ सरकत असतो! काळासोबत माणूस बदलत असतो! आधुनिकता येत असतें! जुने सोनेरी ऐतिहासिक क्षण कधी विसरायचे नसतात!

  बुरुज, राजसदर, प्रवेशद्वार ती दगडं राजांची आठवण करून देत आहेत! आम्ही स्वप्न पाहात जगत असतो! छत्रपती शिवरायांची तळपती तलवार डोळ्यासमोर दिसते आहे! राजे राजसिंहासनावर बसले आहेत! आम्ही त्यांचा त्याग, संपूर्ण आयुष्य लढाया, त्याग, झुंज, प्रजेवर प्रचंड जीव लावण्यातलं प्रेम पाहतो आहोत! वास्तवाला गवसणी घालणारा आयुष्यातला विश्वयोद्धा पाहतो आहोत! शूर पराक्रमी राजा पाहतो आहोत! नेहमीच युद्धाचा प्रसंगाची खडतर वाट डोळ्यासमोर दिसते आहे! आयुष्य शत्रूशी लढण्यात गेलेले राजे डोळ्यासमोर दिसतात! आम्ही साडेतीनशे वर्षानंतर त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या संतोषगडावर गेलो होतो! मन, हृदय सर्वच किल्ल्यावर अर्पून माघारी निघालो होतो! आम्हास हिंदवी स्वराज्य देऊन राजे काळासोबत देहाने दूरच्या प्रवासाला निघून गेलें आहेत! त्यांचं कष्टमय जीवन आपलं व्हावं! जाज्वल्य देशभक्ती नसानसात संचारावी म्हणून मनोमन छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत मानाचा मुजरा देत संतोषगडावरून घरी परतलो होतो! मनात संतोष जरी होता! मन अशांत होतं! - नानाभाऊ माळी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रगल्भ