मुशाफिरी
दखल...बेदखल
जे चांगले आहे, छान झाले आहे, सुंदर जमून आले आहे त्याची लागलीच दखल घेऊन पसंतीची पावती देणे यासाठी मूलतःच स्वभावामध्ये उमदेपणा, खिलाडूवृत्ती, दिलदारी, औदार्य लागते. यातून आपले संस्कार, जिंदादिली दिसून येते. त्यातही जे नवेपणाने एखादी गोष्ट शिकताहेत, धावू पाहताहेत, आपला जम बसवू पाहताहेत..त्यांच्या पाठीवर योग्य वेळी शाबासकीची थाप पडली तर त्यांची पुढील कारकीर्दी झळाळून निघण्यास नक्कीच मदत होते, हे सर्वमान्य आहे. एखाद्या चांगल्या कामाची दखल घेणे, कौतुक करणे हे खरे तर इश्वरी काम आहे.
प्रशंसा, स्तुती, कौतुक, प्रसिध्दी, लोकमान्यता, राजमान्यता कुणाला आवडत नाही? खरे तर त्यात न आवडण्यासारखे काहीच नाही. मात्र कौतुक, प्रशंसा, स्तुती तोंडदेखली, वरचरची, आभासी, छद्मी, नकली, बनावटी, मतलबी नसावी; ती अंतःकरणापासून यायला हवी. शिवाय एखाद्याच्या कामाचे कौतुक, प्रशंसा ही वेळीच व्हायला हवी. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या शतकांचे कौतुक आता नव्हे तर लागलीच, त्याचवेळी झाल्याने त्यालाही पुढील खेळासाठी उर्जा, उत्तेजन, प्रोत्साहन मिळून तो आणखी दमदार खेळ्या करण्यासाठी कसा सज्ज झाला हे आपण पाहिले आहे.
चांगले काम असूनही ज्यांच्यावर प्रसिध्दीचा किरणही पडलेला नाही, त्यांना प्रसिध्दी देणे, लोकमान्यता मिळवून देण्यास हातभार लावणे हे पुण्यकर्मच होय. मी गेली अठ्ठावीस वर्षे ज्या प्रसारमाध्यम क्षेत्रात वावरतोय..तिथे तर हे प्रकर्षाने जाणवते. ज्यांना आधीच अमाप प्रसिध्दी, लोकमान्यता, राजमान्यता, व्यावसायिक स्थैर्य लाभले आहे, अशांना पुन्हा प्रसिध्दी देऊन त्यांना काहीच फरक पडत नाही. पण जे आता धडपडताहेत, स्ट्रगलर्स आहेत, जम बसवू पाहताहेत, मागच्या रांगेत आहेत..त्यांना खरी प्रसिध्दीची, दखल घेण्याची गरज आहे..ते आधी करायला हवे. मला आठवते...व्ही. शांताराम दिग्दर्शित १९७२ साली रजतपटावर झळकलेल्या पिंजरा या मराठी चित्रपटाची सर्वच्या सर्व गाणी सुपरडुपर हिट झाली. राम कदम या अष्टपैलु संगीतकाराने अफलातून चाली बांधल्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या काळी पिंजरा मधील गाणी ऐकवली गेली. ‘आली ठुमकत नार लचकत.. ' हे गाणे रामभाऊंनी विष्णू वाघमारे या गायकाकडून गाऊन घेतले. तो आवाज कोरसमध्ये 'जी जी रं जी जी रं जी' असे गाणाऱ्या झिलकऱ्याचा आहे. त्याला पूर्ण गीत गायला लावून रामभाऊ कदमांनी नवा प्रयोग केला. प्रमुख गायकांच्या मागे उभे राहून कानावर पंजा ठेवत तारस्वरात 'जी जी रं' करणाऱ्याला राम कदमांनी एकदम पहिल्या रांगेत आणून बसवलं. याला म्हणतात दखल घेणे, संधी देणे. असे करणारे लोक फार थोडे.
महेंद्रसिंग धोनी हा महान खेळाडू भारतीय क्रिकेटला लाभला. विविध सामने, विविध विश्वचषक आपण त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत जिंकले. त्याची विशेषतः म्हणजे विजेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी धोनी भारतीय संघातील कनिष्ठ खेळाडूला किंवा त्या त्या दिवशी ज्याची खेळी उत्तम झाली आहे, अशा खेळाडूला पुढे पाठवीत असे. यामुळे त्या खेळाडूचा आत्मविश्वास किती बळावत असेल हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. दडपणाखाली खेळणे, दडपण झुगारुन विरोधी संघाला नामोहरम करणे, संघ संकटात असताना सहाव्या-सातव्या क्रमांकावर येऊन दणकेबाज फलंदाजी करीत संघाला विजयपथावर नेणे, सहकारी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणे, वीस किंवा पन्नास षटके विकेटमागे उभे राहून यष्टिरक्षण आणि केल्यावर पुन्हा खालच्या क्रमांकावर येत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारी स्फोटक फलंदाजी करणे आणि सांघिक भावनेने खेळून जिंकून दाखवणे हे खचितच सोप्पे काम नसते. धोनी हा एकेकाळचा भारतीय रेल्वेमधील कर्मचारी. त्यामुळे त्याला खालून वर जाताना काय यातना होतात, काय कष्ट पडतात याची पुरेपुर जाणीव असल्याने त्याने नेहमीच संघातील कनिष्ठ खेळाडूच्या मानसिकतेचा योग्य तो अभ्यास करुन त्यांना प्रोत्साहन देत त्यांची प्रतिभा उपयोगात आणली होती. चांगल्याला चांगले म्हणण्याची, त्यांची दखल घेत कौतुक करण्याची त्याची सवय देशासाठी उपयोगी ठरली.
प्रसारमाध्यम जगतातला प्रतिनिधी म्हणून सांगतो...आजवर अनेक नामांकित, प्रतिष्ठित, राज्यस्तरीय, देशपातळीवर गाजलेल्या व्यक्तीमत्वांच्या समोर बसून प्रश्न विचारायची, मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली..मिळत आहे. पण अप्रसिध्द, नवख्या, अलिकडेच गाजू पाहात असलेल्या गुणवत्ताधारकांना प्रसिध्दी देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळण्यात एक अनोखे समाधान लाभते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. सध्या ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला' हे बालगीत गाजत आहे आणि त्यावर वेगवेगळ्या रील्स बनवल्या जात आहेत. त्यावेळी ‘माझा बाप्पा किती गोड दिसतो..' हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्याचे कर्तेधर्ते नवी मुंबईतील आहेत. हे गाणे सुरेश वाडकर यांची त्यावेळी सहा वर्षांची असलेली नात दिया वाडकर हिने गायिले होते. मी त्या गाण्याच्या कर्त्याधर्त्यांची मुलाखत घेण्यासाठी संपर्क साधला तर ते म्हणाले की, ‘आपण सुरेश वाडकर यांच्या मुंबईतील स्टुडिओत जाऊ आणि त्यांच्या नातीची मुलाखत घेऊ.' मी म्हटले..‘त्यांच्या नातीची मुलाखत एव्हाना अनेकांनी घेतली आहे. ती वाडकरांची नात असल्याने त्यांना नवी मुंबईतील वृत्तपत्र किंवा चॅनेल यावरील मुलाखतीबाबत फारसे औत्सुक्य असेलच असे नाही. तुम्ही नवी मुंबईकर असल्याने तुमची दखल घेत मुलाखत घेण्यात मला अधिक रुची आहे.'
नातेवाईक, मित्रमंडळींनी कुणी मला जेवायला बोलावले आणि जेवण उत्तम, चविष्ट झाले असेल तर मी ते लगेच त्या घरच्या सुगरणीला समोर जाऊन सांगतो. त्या चवीची दखल घेतो, कौतुक करतो. त्या महिलेने मोठ्या मेहनतीने रांधलेल्या जेवणाचे चिज झाले याची तृप्त भावना तिच्या चेहऱ्यावर झळकलेली पाहणे यातला आनंद मला त्या जेवणाइतकेच अत्युच्च समाधान देऊन जातो. हे तर काहीच नाही. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले धाबे, खाऊ गल्लीतील टपऱ्या, हातगाड्या, हॉटेले, क्षुधा-शांती गृहे येथील चवदार पदार्थ माझ्या पसंतीला उतरले तर बिल देताना काऊंटरवरील-गाडीवरील माणसाला पदार्थ चांगले झाले आहेत असे सांगूनच बाहेर पडतो. माझ्या या सवयीचा मला लेखनातही उपयोग झाला. काही वर्षांपूर्वी दैनिक सकाळ तसेच काही स्थानिक वर्तमानपत्रांतून मुंबई, नवी मुंबई परिसरातील विविध हॉटेलांमधील खाद्यपदार्थांची दखल घेण्याचे सदर मला लिहिता आले. यातील काही हॉटेलमालकांनी त्या लेखांची रंगीत जम्बो झेरोॅवस काऊंटरजवळ फ्रेम करुन लावल्याचा अनुभव मोठा सुखद आहे.
खिलाडू वृत्ती केवळ मैदानावरील खेळाडूंनीच दाखवावी..इतर सर्वसामान्य नागरिकांनी दाखवल्यास पगारातून मोठी रक्कम कापली जाईल असा कोणताच नियम नाही. शुभमन गिलने दणकेबाज खेळी केली आणि समोर विराट कोहली किंवा रोहित शर्मा असले तर ते लगेच गिलला तिथल्या तिथेच प्रोत्साहित करतात, मिठी मारुन त्याच्या खेळीची दखल घेत कौतुक करतात. नागरी जीवन जगत असताना आपल्या अवतीभवती अनेक जण लक्षवेधी, रोचक, मौलिक कामगिरी करत असतात. त्यांना मिठी मारुनच कौतुक केले पाहिजे असे काही नाही. त्यांना संपर्क साधून, संदेश पाठवून, भेट घेऊन चार प्रशंसेचे शब्द बोलूनही हे काम करता येते. पण अनेक दीड दमडी लोक अहंकार, ताठा, खोटी प्रतिष्ठा, फुकाचे ज्येष्ठत्व याच्या आहारी जाऊन दखल घेणे टाळतात, त्यांना ते कमीपणाचे वाटते किंवा ‘आपण याचे कौतुक केल्याने हा मोठा ठरेल आणि खुजे ठरु; कारण आपली कामगिरी काहीच नाही किंवा एकदमच सुमार आहे' अशी भिती वाटून ते गुणवत्ता दाखवणाऱ्याला बेदखल करु पाहतात. पण यातून तेच उघडे पडतात. दुसऱ्याचे भले पाहून असे ‘सायलेंट मोड'मध्ये जाणारे ‘शुभचिंतक' (म्हणजे दुसऱ्याचे ‘शुभ' झाले की ज्यांची ‘चिंता' वाढते ते.. ) हल्ली वाढत्या संख्येने पाहायला मिळतात. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान कार्यालयाला साधे पत्र जरी पाठवले तरी त्याची दखल घेत त्याचे उत्तर आपल्या पत्त्यावर येते, असे कळवणारे आणि त्या पत्राचा फोटो ग्रुपवर मानाने फिरवणारे माझे अनेक मित्र आहेत. यावरुन कळते की मोठ्या मनाच्या व मोठ्या पदावरील माणसांची दखल घेण्याची वृत्ती किती अनुकरणीय आहे ते!
आपल्या देशात दिले जाणारे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, तसेच आर्मी, नेव्ही, मिलिट्री कडून वितरीत केले जाणारे विविध सन्मान हे दुसरे तिसरे काही नसून देशाने त्या त्या व्यवितमत्वांच्या बहुमोल योगदानाची घेतलेली बहुमोल दखलच तर आहे. नोबेल, रॅमन मॅगेसेसे, डॅन डेव्हिड, राईट लाईव्हलीहुड, पुलित्झर, ऑस्कर, इंटरनॅशनल बुकर हे सन्मानही संबंधितांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेतलेली दखलच होय. शिवाय विविध राज्य सरकारे, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपरिषदा याही गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या नागरिकांच्या कामांची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करीत असतात. अनेक समाजसेवी, स्वयंसेवी संस्था, परिषदा, मंडळे ही सुध्दा आपापल्या परीने लोकांच्या कार्याची दखल घेऊन स्वतःहुन पुढे येत त्यांना सन्मानित करुन लोकांना प्रेरणा, प्रोत्साहन, उत्तेजन देण्याचे बहुमोल काम करीत असतात. यातले काहीच ज्यांच्या वाट्याला येत नाही किंवा दखलपात्र काम करतच नसल्याने कुणीच मान देत नाही असे नमुनेही जिकडेतिकडे असतात. त्यांना इतरांच्या सन्मानाने पोटदुखी होऊन ते ‘सायलेंट मोड'मध्ये जात असतील तर अशांचे आपण तरी काय करणार म्हणा!
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै.आपलं नवे शहर.