शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज करण्यास १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील गरीब आणि गरजू इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महापालिका मार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्यात येते. त्यासाठी ३१  जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, सदर मुदत वाढवून मिळावी म्हणून ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष तथा माजी महापालिका विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे मागणी केली होती. त्यानुसार
शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता १५  फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका शाळा वगळता नवी मुंबई कार्यक्षेत्रातील इतर शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विविध घटकांतील  गरीब आणि गरजू इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना महापालिका मार्फत दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महापालिका समाज विकास विभागाने केले होते. मात्र, यंदा शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे अनिवार्य करण्यात आले. पण, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालकांची चांगलीच दमछाक होत असून वेळ देखील खर्ची पडत आहे. त्यामुळे अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी  दशरथ भगत यांनी मागणी केली होती.त्यानुसार समाज विकास विभागामार्फत मुदत वाढवून १५ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली आहे.

दरम्यान, शैक्षणिक  शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी याकरिता दशरथ भगत यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी नवी मुंबईत शैक्षणिक शिष्यवृत्ती जनजागृती मोहीम सुरु केली. विविध ठिकाणी नोंदणी मार्गदर्शन अभियान देखील राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह शाळा- कॉलेज प्रशासनाला सदर मोहिमेत सहभागी करुन घेत शिष्यवृत्ती अर्ज भरणे अधिक सुलभ आणि गतिशील कसे करता येईल यासाठी ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या माध्यमातून पुढाकार घेतला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा