पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातील लाखो विद्यार्थ्यांशी ‘परीक्षापे चर्चा'

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षापे चर्चा-२०२३' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी देशभरातून ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपे चर्चा कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी नवी मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परीक्षा संबंधीचे मौलिक विचार ऐकले. माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आदि या मान्यवरांनी देखील पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी केलेला मनमोकळा,
मार्गदर्शनपर संवाद पाहिला. देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी सखोल उत्तरे दिली. कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसे फसवलं? ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल; पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला.

आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये, यासाठी मोदी यांनी क्रिकेटमधील फलदांजाचे उदाहरण दिले. क्रिकेट सामना पाहताना लोक चौकार-षटकार असे ओरडत असतात. पण, फलंदाज काही लोकांचे ऐकून फलंदाजी करत नाही. तो जसा चेंडू येईल तशी फलंदाजी करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या भाषणाने प्रेरणा मिळाली. परीक्षेचा ताणतणाव घेऊ नये. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्याप्रमाणे अभ्यास करावा. -श्रुतिका सोलकर, विद्यार्थिनी (इयत्ता-बारावी).

 इतरजण किती टक्के मिळवतात, यावर लक्ष देण्याऐवजी स्वतःची क्षमता वाढवण्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  नकारात्मकता काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असा सल्ला आदरणीय पंतप्रधानांनी दिला. -राहुल गायकवाड, विद्यार्थी (इयत्ता-दहावी).

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

विवेकानंद संकुल  शाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण